राजेंद्र भट

हिवाळ्यात आपण गॅलरीत फ्लॉवर आणि एक्झॉटिक भाज्या लावू शकतो. या एक्झॉटिक भाज्यांमध्ये ब्रोकोली, सेलरी, विविध प्रकारचे लेटय़ुस, विविध हब्र्ज आणि झुकिनी घेता येऊ शकते.  यातील बहुतेक पिके शीत कटिबंधातील आहेत. त्यांना थंड हवामान आवडते आणि आवश्यक असते. तापमान वाढल्यास, त्यांच्या गुणवत्तेत बदल होतो. कडवटपणा वाढतो.

फ्लॉवरच्या वाढीसाठी उष्ण हवामान आणि फुलाच्या वाढीसाठी थंड हवामान आवश्यक असते. हे झाड मध्यम आकाराच्या कुंडीत लावावे. थोडय़ा उथळ कुंडय़ा चालू शकतात. मातीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण थोडे अधिक असणे आवश्यक ठरते. बाजारातून बियाणे आणून रोपे लावता येतात. रोपवाटिकेतून रोपे आणूनही लागवड करता येते. गॅलरीत बागकाम करणाऱ्यांसाठी रोपे हा उत्तम पर्याय ठरतो. ही रोपे संध्याकाळी लावावीत. हलके, म्हणजे कुंडीतून बाहेर येणार नाही, एवढेच पाणी द्यावे. पाणी नेहमी संध्याकाळीच द्यावे. फ्लॉवरच्या रोपाची वाढ उष्ण हवामानात चांगली होते. त्यामुळे रोपे १५ सप्टेंबरनंतर लावावीत. त्यामुळे रोपे वाढण्यासाठी आवश्यक असलेली उष्णता मिळते. फ्लॉवरची काढणी जातीप्रमाणे ७० ते ९० दिवसांत होते. त्यांचे अर्धे आयुष्य रोपाची वाढ होते आणि अर्धे आयुष्य फुलाची वाढ होते. चांगली वाढ झाल्यावर म्हणजे साधारण ४०-४५ दिवसांनी आतून फूल येण्यास सुरुवात होते. या काळात थंडी जेवढी जास्त असेल, तेवढा जास्त चांगला फ्लॉवर तयार होतो. फ्लॉवर तयार झाल्यावर तो काढणे आवश्यक असते. तो तसाच ठेवल्यास त्याचा पृष्ठभाग कणी पडल्यासारखा दिसू लागतो. त्यामुळे त्याचा रंग जाण्याचीही शक्यता असते. पांढरा रंग जाऊन पिवळसरपणा येऊ लागतो. काढण्यास उशीर झाल्यास त्यामधून फुलाचे दांडे बाहेर पडू लागतात. फ्लॉवर पानांसकट कापून काढावा. बाजारात जांभळा फ्लॉवर किंवा ब्रोकोली अशा फ्लॉवरच्या जाती उपलब्ध आहेत. त्यांची लागवडही याच प्रकारे केली जाते.