थंडीत कुडकुडताना निखाऱ्यावर भाजलेलं गरमागरम कणीस खाण्यातला आनंद काही औरच! हे कणीस नेहमीच सुंदर रंग आणि पोत असलेल्या सालीत लपेटलेलं असतं. कचऱ्याच्या टोपलीत जाणारी ही सालं वापरून अगदी झटपट सुंदर फुलं बनवता येतात. घरात ताजी फुलं किंवा फुलझाड ठेवणं हे कोणालाही आवडतंच. पण त्याची निगा राखणं बहुतेकांना जमत नाही. अशांसाठी सजावटीचा हा उत्तम पर्याय.

साहित्य

कणसाची सालं, खराटय़ाच्या (झाडू) काडय़ा, हिरवी क्रेपटेप, अ‍ॅक्रेलिक रंग, रंगकामाचं साहित्य.

कृती

  • कणसासोबत असलेली छोटी आणि मोठी पानं वेगळी करा आणि त्यांच्या पट्टय़ा कापा.
  • सर्व पट्टय़ांची बाहेरची बाजू उलटी करून टोकाला टोक जोडून घ्या.
  • त्याच्या पाकळ्या बनवा, त्या अ‍ॅक्रेलिक रंगांनी रंगवा
  • रंग नीट वाळू द्या.
  • रंग वाळेपर्यंत झाडूच्या काडीला हिरवी क्रेपटेप गुंडाळून घ्या.
  • वाळलेल्या पाकळ्या क्रेपटेपच्या साहाय्याने काडीभोवती गोलाकारात चिकटवा.
  • अशा प्रकारे तुमच्या फुलदाणीच्या आकारानुसार आवश्यक असतील तेवढी विविधरंगी आणि विविध आकारांची फुलं तयार करा.
  • ही फुलदाणी टीपॉयची शोभा तर वाढवेलच, शिवाय येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यासाठी कौतुकाचा विषयही ठरेल.

apac64kala@gmail.com