ऋषिकेश बामणे

फुटबॉल म्हटलं तरी अंगावर रोमांच उभा राहतो. मग फुटबॉलचा विश्वचषक असेल तर काय अवस्था? आजपासून सुरू होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकासाठी सर्व सहभागी संघ, खेळाडू, त्यांचे पाठीराखे आणि प्रेक्षक सज्ज झाले आहेत. प्रत्यक्ष मैदानातील थराराची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. पण त्यासोबतच उत्सुकता आहे ती फुटबॉलच्या ऑनलाइन लीगची..

जगभरातील अव्वल ३२ संघांमध्ये जगज्जेतेपदासाठीची शर्यत निर्माण करणारी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. स्पर्धेत सहभागी देशांची संख्या ३२ असली तरी, या त्यांच्यातील चुरस पाहण्याची उत्सुकता अवघ्या जगाला आहे. फुटबॉलचा ९० मिनिटांचा थरार टीव्हीवरून अनुभवताना प्रत्यक्ष मैदानावर असल्यासारखीच आपली अवस्था असते. संघाची क्षेत्रस्थिती, व्यूहरचना कशी असावी, यावर मित्रमंडळींमध्ये तावातावाने चर्चा सुरू असते. एखाद्या सामन्यानंतरही विश्लेषण करण्यात आपण रंगून जातो. अशा वेळी आपल्यालाच संघाची व्यूहरचना, खेळाडू ठरवण्याची संधी मिळाली तर..?

प्रत्यक्ष मैदानावर हे शक्य नसलं तरी, सध्याच्या ‘व्हच्र्युअल’ अर्थात आभासी जगात ते सहज शक्य आहे. स्पर्धेत खेळणाऱ्या विविध संघांमधील हवे ते खेळाडू निवडून त्यांचा ‘व्हच्र्युअल’ संघ बनवायचा आणि या खेळाडूंच्या स्पर्धेतील सामन्यांमधील कामगिरीनुसार गुण जमवायचे, असा हा व्हच्र्युअल खेळ. आयपीएल किंवा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान अशा ‘फँटसी लीग’चा अनुभव आपण घेतला असेलच. पण त्याही आधीपासून फुटबॉलमध्ये हा ‘खेळ’ रुजला आहे. आजपासून सुरू होत असलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने अशा ऑनलाइन स्पर्धावर एक दृष्टिक्षेप.

फँटसी प्रीमियर लीग

भारतातील फुटबॉलचे वाढते आकर्षण पाहूनच या काल्पनिक क्रीडा लीगची सुरुवात करण्यात आली. युरोप आणि अमेरिकेतील २० क्लब या लीगमध्ये सहभागी होतात. या लीगमध्ये जवळपास पाच लाखांहून अधिक खेळाडूंचा सहभाग असून कोणीही येथे मोफत आपले नाव नोंदवू शकतो. प्रत्येक जण १५ खेळाडूंना १ लक्ष डॉलर्समध्ये आपल्या संघात घेऊ  शकतो. याहू आणि ईएसपीएन या समूहाने मिळून या लीगसाठी आकर्षक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व काल्पनिक लीगमध्ये फँटसी प्रीमियर लीग अव्वल क्रमांकावर विराजमान आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गुगल प्ले स्टोरमधून आतापर्यंत जवळपास लाखोंच्या घरात या लीगचे अ‍ॅप अनेकांनी आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घेतले आहेत.

स्टारपिक

‘स्टारपिक’ हा भारतीय ऑनलाइन फँटसी प्लॅटफॉर्म असून यामध्ये फुटबॉल, क्रिकेटव्यतिरिक्त आणखी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळ खेळता येऊ  शकतात. ‘यूएफ ईकबर्ग’ हे या संस्थेचे संस्थापक असून त्रिगम मुखर्जी हे सहसंस्थापक आणि मुख्य विपणन अधिकारी आहेत. फेब्रुवारी २०१८ पासून कार्यरत असलेल्या या क्रीडा मंचावर आपले नाव नोंदवून आपल्याला मिळालेल्या रकमेतून दोन्ही संघांच्या खेळाडूंमधून सर्वोत्तम ११ खेळाडू निवडायचे असतात. या स्पर्धेतील विशेष बाब म्हणजे १४ जूनपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामना खेळणाऱ्यांमधून स्पर्धेच्या शेवटी भाग्यवान विजेत्याला पुढील वर्षी होणाऱ्या इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगचा एक सामना प्रत्यक्ष मैदानात पाहता येणार आहे. गुगल प्ले स्टोरवर या लीगचे मोबाइल अ‍ॅप उपलब्ध आहे.

ड्रीम इलेव्हन

तीन कोटींहून अधिक अधिकृत स्पर्धकांचा समावेश असलेल्या ‘ड्रीम ११’ या काल्पनिक लीगची ख्याती जगभर पसरलेली आहे. २०१२ पासून सुरू झालेल्या या लीगमध्ये क्रिकेट, फुटबॉलव्यतिरिक्त आणखी खेळांचाही समावेश आहे. मँचेस्टर युनायटेड क्लब आणि भारतीय क्रिकेट संघाचा निस्सीम चाहते असलेले हर्ष जैन हे या लीगचे संस्थापक आहेत. या लीगमध्ये स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे, पैशांशिवाय अ‍ॅप डाऊनलोड केल्यास १०० डॉलर इतका बोनसही मिळतो.

आणखी काही काल्पनिक क्रीडा लीग

फिफा २०१८, टेस (टी.ई.एस.) यासारखी आणखी अनेक संकेतस्थळे काल्पनिक क्रीडा स्पर्धेसाठी प्रसिद्ध आहेत. खेळाडूंना संघात घेण्याचे व स्पर्धेचे नियम जवळपास सर्वाचेच सारखे असले तरी लोकप्रियतेच्या आधारावर त्यांचे क्रमांक वर-खाली आहेत. डिजिटलचे वाढते वेड पाहूनच या सर्व संस्थांनी हे पाऊल उचलले असून येणाऱ्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या सर्व पातळ्या गाठून फुटबॉलचा ज्वर संपूर्ण भारतभर पसरलेला आपल्याला पाहायला मिळेल.

स्टारपिकमध्ये आम्ही प्रेक्षकांना सर्वात प्रथम त्यांचे नाव नोंदवण्यास सांगून एक लक्ष इतकी डिजिटल किंमत त्यांना पुरवतो. यामध्ये एक सामान्य माणूस आपल्या खेळकौशल्याचा कशा प्रकारे वापर करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरते. या संकेतस्थळावर तंत्रज्ञानाचाही योग्य उपयोग करण्यात आला असून अनुकूल वापरकर्ता हे सूत्र लक्षात ठेवूनच खेळताना कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतो. आम्हाला तंत्रज्ञान सेवा पुरवणारी संस्था ही युरोपमधली असल्याने त्यांना सर्व अद्ययावत माहिती असते आणि यामुळे आमच्या संकेतस्थळावर तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळत आहोत, असे वाटेल.

त्रिगम मुखर्जी, (स्टारपिक काल्पनिक क्रीडा लीगचे साहाय्यक संस्थापक)

ऑनलाइन खेळ खेळणाऱ्या काही खेळाडूंचे मत –

ऑनलाइन संकेतस्थळावर फुटबॉल खेळण्यात एक वेगळीच मजा येते. यामुळे फुटबॉलमधील उत्साह तर वाढतोच, शिवाय आकर्षक बक्षिसेही मिळतात. मला ड्रीम इलेव्हन (११) या संकेतस्थळावर खेळायला फार आवडते.

अभिषेक कड्डी, मुंबई

ऑनलाइन फुटबॉल खेळणे हे जितके सोपे वाटते तितकेच कठीणही आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या खेळकौशल्याचा योग्य वापर करून खेळाडू निवडावे लागतात.

भूषण वारगे, मुंबई

मला फिफाच्या अधिकृत संकेतस्थळावर फुटबॉल खेळायला आवडते. त्याशिवाय ‘टीईएस २०१८’ या काल्पनिक क्रीडा लीगमधील सोप्या तंत्रज्ञानामुळे व विविध पातळींमुळे खेळताना फार अडचणी जाणवत नाहीत.

ओझेर शेख, मुंबई

मला विशेषत: ‘बार्कलेयस प्रीमियर लीग’ खेळायला फार आवडते. त्यामध्ये वापरण्यात आलेले ग्राफिक्स आणि सोप्या, सुलभ निर्देशनामुळे खेळताना त्रास जाणवत नाही.

क्षितिज मोरे, मुंबई