हेमंत बावकर

जागतिक दर्जाच्या फोक्सवॅगन आणि फोर्ड या कंपन्यांनी भारतात आपला जम बसविण्यास साधारण दशकभरापूर्वी सुरुवात केली. मात्र, भारतीय रस्ते आणि वातावरणाशी जुळवून घेताना या कंपन्यांना काहीशी कसरतच करावी लागत आहे. फोक्सवॅगन अ‍ॅमिओ आणि फोर्डची अस्पायर या कॉम्पॅक्ट सेदान प्रकारातील दोन्ही कारचा घेतलेला आढावा.

फोर्ड आणि फोक्सवॅगन या कंपन्यांच्या कार दणकट बांधणीसाठी ओळखल्या जातात. उच्च दर्जाची सुरक्षा प्रणाली, तंत्रज्ञान ग्राहकांना पुरवितात. फोक्सवॅगन अ‍ॅमिओ पेट्रोल १.२ आणि फोर्डची अस्पायर या दोन्ही कार एक्सप्रेस हायवे, मेगा हायवे, खडबडीत आणि खड्डय़ांचे अशा सर्व रस्त्यांवर जवळपास ५०० किमी चालविल्या. या दोन्ही कार बाजारात नव्या स्वरूपात येणार असल्या तरीही सध्याच्या कारमध्ये आम्हाला जाणवलेल्या त्रुटी आणि त्यांच्या येणाऱ्या कारमध्ये कंपन्या त्या दूर करण्याचा प्रयत्न करतील.

फोक्सव्ॉगन अ‍ॅमिओ एक्सप्रेस हायवेवर खूप स्थिर जाणवली. तसेच वळणांवरील नियंत्रण आणि ब्रेक प्रणालीमध्ये फोर्डच्या अस्पायरपेक्षा सरस आहे. अ‍ॅमिओ तीव्र वळणावरही वेगात असताना आरामात वळते. अस्पायरमध्ये मात्र वळणावर आतील चालक आणि पॅसेंजरना थोडा तोल गेल्यासारखा भास होतो.

तुरळक ट्रॅफिक असताना छोटय़ाशा चढणीलाही अ‍ॅमिओ तिसऱ्या गिअरमध्ये पिकअपसाठी संघर्ष करत होती. गिअर एकदम हलका असला तरीही पाचव्या, चौथ्या गिअरला गाडीची ताकद संपल्यासारखे जाणवत होते. मात्र अस्पायर या बाबतीत सरस ठरली.

कोणती चांगली?

वायपर, इंडिकेटर कंट्रोल्स

भारतात उजव्या बाजूला स्टीअरिंग असते व चालकाच्या डाव्या बाजूला गिअर. यामुळे उजवा हात स्टीअरिंगवर असल्याने वारंवार द्यावे लागणारे इंडिकेटर, लाइट अपर-डिपरचा नॉब उजव्या बाजूलाच असणे आवश्यक असते. मात्र,  अ‍ॅमिओमध्ये ते डावीकडे ठेवल्याने गिअर बदलावा लागत असताना इंडिकेटर देणे बऱ्याचदा त्रासदायक ठरते. फोर्डच्या कारमध्येही पूर्वी अशीच रचना होती. मात्र, भारतीय गरज ओळखून त्यांनी ती बदलली. अ‍ॅमिओमध्ये अ‍ॅटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर्स असल्याने पावसाच्या प्रमाणानुसार कमीजास्त वेगात फिरतात. तसेच स्टीअरिंगवर म्युझिक सिस्टम, कॉल रिसिव्ह, कमांडची बटने आहेत. अ‍ॅमिओमध्ये टच स्क्रीन आहे. मात्र, अस्पायरमध्ये तिचा अभाव जाणवला. अ‍ॅमिओमध्ये ब्लुटुथद्वारे मोबाइल कनेक्ट केला असता काही वेळ म्युझिक सिस्टम सुरू होती. मात्र, नंतर केवळ फोन कॉलच जात-येत होते. ब्लुटुथ कनेक्टिव्हिटीची समस्या जाणवली.

लाइट

अस्पायरपेक्षा अ‍ॅमिओची लाइट खूप प्रभावी आहे. अस्पायरच्या दोन्ही लाइट्सच्या मध्ये काळा स्पॉट येत असल्याने थोडी अस्पष्ट आणि अंधारी वाटते. तसेच दोन्ही कारमध्ये बीम हाइट अ‍ॅडजेस्टमेंट प्रणाली आहे. अ‍ॅमिओच्या लाइटची उंची थोडी कमी आहे.

सस्पेन्शन

आपल्याकडील रस्त्यांचे प्रकार बघता कारचे सस्पेन्शन चांगले असणे आरामदायक प्रवासासाठी महत्त्वाचे असते. अ‍ॅमिओने यामध्ये अपेक्षाभंग केला. एक्स्प्रेस वेवर सस्पेंन्शन ठीकठाक जाणवत होते. मात्र, स्पीडब्रेकर, खड्डे आणि खडबडीत रस्त्यांवर अ‍ॅमिओ सपशेल अपयशी ठरली. या रस्त्यांवरून जाताना आम्हाला जोरदार दणके आणि हिंदोळे जाणवत होते. याबाबतीत अस्पायर खूपच सरस दिसून आली. अस्पायरमध्ये फार कमी खड्डे जाणवतात. अ‍ॅमिओमध्ये निम्म्या अंतरावर अंगदुखीचा त्रास जाणवू लागला होता, तर अस्पायरच्या मागील दरवाजांमधून आवाज येत होता.

स्पेस

लगेज स्पेसच्या बाबतीत अ‍ॅमिओने फोर्डला मागे टाकले आहे. मागे साहित्य ठेवण्यासाठी अ‍ॅमिओमध्ये जागा मोठी मिळते. मात्र, ही जागा वाढविताना कुठे तरी मागील सीटवरील पॅसेंजरसाठी असलेली लेग स्ेपस कमी केली आहे. यामुळे मागे बसणाऱ्या प्रवाशांना काहीसे गैरसोयीचे होते. मागील प्रवाशांसाठी एसी व्हेंट दिलेला आहे. पाण्याच्या बाटल्या ठेवायला कारमध्ये पुढील दरवाजावर दोन व मागे मध्यभागी एकच होल्डर दिला आहे. गिअरच्या पुढे डॅशबोर्डमध्ये अर्धा लिटरच्या दोन बाटल्या बसू शकतात. अस्पायरमध्ये तर केवळ पुढील दरवाजांमध्येच एक लिटरच्या दोन आणि अर्धा लिटरच्या दोन बाटल्या ठेवू शकतो. मात्र, लेग स्पेस चांगली आहे.

मायलेज

अ‍ॅमिओपेट्रोल आणि अस्पायरपेट्रोल या दोन्ही कारची तुलना करता अ‍ॅमिओ कमी मायलेज देते. आम्हाला ५०० किमीसाठी एसी सुरू ठेवून ११-१२ किमी/ प्रति लिटर दिले, तर अस्पायरने १५-१६ दिले.

आमचे मत

नियंत्रण आणि ब्रेकिंग प्रणाली पाहता अ‍ॅमिओ, तर सस्पेंशन आणि पिकअप पाहता फोर्डची अस्पायर आम्हाला चांगली वाटली. दोन्ही कारचे उत्पादन बंद केलेले असले तरीही त्यांचे नवे रूप बाजारात दाखल होणार आहे. अ‍ॅमिओ १.२ लिटर पेट्रोल इंजिन पिकअपसाठी संघर्ष करत असताना नव्या कारमध्ये त्याची क्षमता कमी करून १ लिटरवर आणणे थोडेसे अविचारी वाटते. मजबुतीच्या बाबतीत दोन्ही कार समान पातळीवर आहेत. मात्र, मेन्टेनन्स आणि सव्‍‌र्हिसिंगच्या खर्चाबाबत फोक्सव्ॉगन थोडी खर्चीकच वाटते. यामुळे फोर्डची अस्पायर आम्हाला अधिक सरस वाटली.

कार‘विश्व’ ब्रेझा आता एजीएसमध्येही उपलब्ध

मुंबई : मारुती सुझुकीची एसयूव्ही प्रकारातील कार व्हिटारा ब्रेझा आता अ‍ॅटोमॅटिक पर्यायांमध्येही उपलब्ध झाली आहे. ब्रेझाला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवे रुपडे देण्यात आले असून त्यामध्ये डय़ुअल एअर बॅग्ज, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, ईबीडीसह एबीएस आणि अतिवेगाचा इशारा देणारी यंत्रणाही उपलब्ध आहे. तसेच अलॉय व्हील्सही नवीन रचनेचे देण्यात आले आहेत.

शहरामध्ये अ‍ॅटोमॅटिक वाहनांना जास्त पसंती मिळत आहे. यामुळे ब्रेझामध्ये एजीएस प्रणाली देण्यात आली आहे. ब्रेझाच्या व्हीडीआय, झेडडीआय, झेडडीआय प्लस आणि झेडडीआय डय़ुअल टोन अशा चार प्रकारांमध्ये एजीएस प्रणाली पर्यायी म्हणून देण्यात आली आहे. तसेच आकर्षक दिसण्यासाठी पुढील ग्रिल व मागील दारेही क्रोम ग्रिलमध्ये देण्यात आली आहेत.

एस क्रॉसच्या विक्रीत वाढ

मारुती सुझुकीने आपल्या नेक्सा या ब्रॅण्डच्या अंतर्गत वेगळ्या ग्राहकांसाठी एक आकर्षक प्रीमियम कारची श्रेणी सुरू केली. यामध्ये एस क्रॉस ही आकर्षक एसयूव्ही येते. २०१७मध्ये या मॉडेलमध्ये बदल करीत तिला अधिक आकर्षक बनविण्यात आले. स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञान वापरत डीडीआयएस २०० हे इंजिन यामध्ये आहे. २०१७-१८ मध्ये ३०९२३ गाडय़ांची विक्री करण्यात आली. ही वाढ ४४.४ टक्के होती. २०१६-१७ मध्ये हा आकडा २१,४१७ होता. ऑगस्ट २०१५ मधल्या पदार्पणापासून मारुती सुझुकीने आजवर ७६,४०० हून अधिक एस-क्रॉस विकल्या आहेत.