|| वैभव भाकरे

एक कोटी मस्टँग निर्माण करण्याचा टप्पा गाठल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच फोर्डने केली. फोर्डच्या या सर्वात लोकप्रिय स्पोर्ट्स कारची निर्मिती ५४ पासून सुरू आहे.  फोर्डच्या यशस्वी गाडय़ांच्या मांदियाळीत मस्टँगचे स्थान अगदी मानाचे आहे. किंबहुना एवढय़ा वर्षांमध्ये मस्टँग जगभरात स्वत:च एक वेगळा ब्रॅन्ड म्हणून प्रस्थापित झाली आहे. तरुणाईला वेड लावणाऱ्या या परवडणाऱ्या स्पोर्ट्स कारची जादू अजूनही कायम असून भविष्यातही मस्टँगची ‘घोडदौड’ चालूच राहणार आहे याबाबत दुमत नाही.

पारंपरिक गाडय़ा खरेदी करण्याचा ग्राहकांचा उत्साह कमी होत आहे. यासाठी कार कंपन्यांना अनेक कठीण निर्णय घ्यावे लागत आहेत.  फोर्डने त्यांच्या बराचशा सेडान आणि कॉम्पॅक कारची निर्मिती थांबविण्याचा निर्णय घेतला. मात्र मस्टँगची निर्मिती सुरूच राहणार असल्याची घोषणा त्यांनी केल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या. मस्टँगच्या निर्मितीचा निर्णय हा काही भावनिक नाही, तर ही जगातील सर्वाधिक विक्री झालेली स्पोर्ट्स कार आहे.

१७ एप्रिल १९६४ रोजी मस्टँग जगासमोर सादर करण्यात आली. हार्ड टॉप आणि कॉन्वेरटेबल हे दोन पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले. ग्राहकांसह तेव्हाच्या माध्यमांनीदेखील मस्टँगला उचलून धरले. तिचा  सामान्यांची फेरारी असा उल्लेख केला. गाडीची स्टायलिश आणि स्पोर्टी डिझाइन भरपूर लोकप्रिय झाली. पहिल्याच दिवशी कार डीलर्सनी २२,००० मस्टँगच्या ऑर्डर दिल्या. पहिल्या वर्षांत ४,१७,००० मस्टँग विकल्या गेल्या आणि दोन वर्षांत दहा लाख मस्टँगची विक्री झाली.

मस्टँगची मागणी इतकी वाढली की गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी फोर्ड डीलर त्याची दुकाने बंद करून ठेवीत. काही ठिकाणी लॉटरी पद्धतीने गाडीची विक्री करण्यात आली. अमेरिकेतील र्गलड टेक्सासमध्ये १५ ग्राहकांनी एकाच मस्टँगसाठी बोली लावली. आपला चेक वठण्याच्या आधी गाडी कुणा दुसऱ्याला विकली जाऊ  नये म्हणून बोली जिंकणाऱ्या ग्राहकाने गाडीतच झोपून रात्र काढली. दोन दरवाजांची वेगवान मस्टँग किमतीने इतर गाडय़ांहून परवडण्यासारखी होती. हेच सूत्र फोर्डने त्यांच्या प्रत्येक पिढीतील मस्टँगसाठी वापरले. नवीन स्टाइल आणि शक्तिशाली इंजिनमुळे तरुणाईने ह्य गाडीला विशेष पसंती दिली.

  • १९६५ मध्ये शेलबी मस्टँग बाजारात आली. विख्यात रेसकार ड्रायव्हर आणि इंजिनीअर कॅरोल शेलबी यांनी ही डिझाइन केली होती. जी टी ३५० ही जणू सामान्य रस्त्यांवर चालवता येऊ शकणारी रेस कार होती. ही गाडी तयार करताना मूळ मस्टँगमध्ये बरेच बदल आले होते. गाडीची २८९ व्ही ८ इंजिनची क्षमता हि २८१ हॉर्सपॉवर वरून ३०६ हॉर्सपॉवर करण्यात आली.  गाडीत ४ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन होते. चाकांचा आणि टायरचा आकारही वाढवण्यात आला होता. सुरुवातीला  जी टी ३५० ही केवळ पांढऱ्या रंगात उपलब्ध होती.
  • १९६७ मध्ये जी टी ५०० बाजारात आली. अभिमान वाटण्यासारखी माझी पहिली गाडी म्हणून जी टी ५०० चा उल्लेख कॅरोल शेलबी यांनी केला होता. गाडीला ”कोब्रा ले मान्स” ४२७ क्युबिक इंच व्ही  ८ इंजिन होते. सुमारे २००० जी टी ५०० ची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे जी टी ५००  दुर्मीळ मस्टँगपैकी एक आहे.
  • १९७५ मध्ये मस्टँग पुन्हा व्ही ८ इंजिनकडे वळली. ३०२ क्युबिक इंच व्ही ८ इंजिनची केवळ १३० हॉर्सपॉवर एवढी क्षमता होती. या गाडीत  केवळ ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच देण्यात आले होते. पांढरा रंग आणि निळ्या पट्टय़ा, निळा रंग आणि पांढऱ्या पट्टय़ा यासोबत काळ्या रंगावर सोनेरी पट्टय़ा अशा तीन रंगसंगती ह्यात देण्यात आल्या होत्या.
  • १९८४ मध्ये मस्टँगला वीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष व्ही ८ इंजिनची मस्टँग सादर करण्यात आली.
  • १९९३ मध्ये फोर्डच्या नव्या स्पेशल वेहिकल टीमने (एस व्ही टी ) एस व्ही टी मस्टँग कोब्रा बाजारात दाखल केली. गाडीत २३५ बी एच पी निर्माण करणारे विंड्सर ४.९ लिटरचे व्ही ८ इंजिन होते आणि ३८० एन एम ३१०४ होता. गाडी ० ते ६० किमीचा वेग ५.९ सेकंदात गाठत होती.

९०च्या दशकात मस्टँगला बदलाचे वेध लागले १९९४ मध्ये पूर्णपणे नवीन डिझाइन घेऊन चौथ्या पिढीतली मस्टँग बाजारात आली. २००० मध्ये आत्तापर्यंतची सर्वात वेगवान मस्टँग कोब्रा आर आली. कोब्रा आरमध्ये ५.४ लिटरचे ३८५ हॉर्सपॉवर निर्माण करणारे व्ही८ इंजिन होते. गाडीचे वजन वाढवतील असे सर्व भाग गाडीतून काढून टाकण्यात आले होते. याचा अर्थ गाडीत रेडिओ, वातानुकूलन यंत्रणादेखील  नव्हती.  केवळ ३०० कोब्रा आरची निर्मिती झाल्याने ही सर्वात दुर्मीळ मस्टँग ठरली.  १९७९ ते १९९३ दरम्यान लोकप्रिय झालेल्या फॉक्स बॉडी मस्टँगच्या डिझाइनने पारंपरिक मस्टँगच्या डिझाइनपासून फारकत घेतली. ९०च्या दशकात याच फॉक्स बॉडी डिझाइनमध्ये बदल करण्यात आले. २००० सालाच्या मध्यांत फोर्डने पुन्हा आपल्या मुळांकडे वळण्याचा निर्णय घेतला, आणि २००५ मध्ये त्यांनी नवी मस्टँग बाजारात आणली या नवीन संस्करणात ६०च्या दशकातील जुन्या मस्टँगची छाप होती.

गेल्या पाच दशकांपासून तरुणाईला आकर्षित करणाऱ्या  मस्टँगची जादू आजही कायम आहे. अमेरिकेत मस्टँगच्या वेडाला दुसरा पर्याय नाही. गाडी मॉडिफाय करणाऱ्यांची तर मस्टँग अगदी लाडाची आहे. मस्टँगमध्ये मॉडिफिकेशन करणाऱ्यांची संख्या इतकी जास्त होती की आज या गाडीने मॉडिफिकेशनची स्वत:ची वेगळी बाजारपेठ तयार केली आहे.  मस्टॅगच्या भविष्यविषयी म्हणायचे तर गुरुवारीच ‘फोर्डने’ नॅसकार चषक मालिकेत सहभागी होणारी मस्टँगदेखील जगासमोर आणली आहे. त्यामुळे एवढय़ात तरी मस्टँगचा वेग मंदावण्याची शक्यता नाही.

मस्टँग म्हणजे काय?

गाडीला मस्टँग हे नाव फोर्डमधील मुख्य डिझायनर जॉन नझर यांनी दिले.  मस्टँगचे पहिले प्रोटोटाइप तयार करण्यातदेखील नझर सहभागी होते. दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आलेले पी-५१ मस्टँग या फायटर प्लेनचे त्यांना आकर्षण होते. त्यावरून त्यांनी मस्टँग हे नाव सुचवले. परंतु फायटर प्लेनसोबत गाडीचा कोणताही दुवा नसल्यामुळे हे नाव नाकारण्यात आले. मग नझर ह्यांनी सरळ डिक्शनरी घेतली आणि ‘मस्टँग’ म्हणजे  काय याचा अर्थ शोधला, त्यात अमेरिकेतील मैदानी भागातील जंगली घोडा असा त्याचा अर्थ दिला होता. त्यामुळे गाडीचे नाव आणि लोगो दोन्ही ठरले. डिझायनर फिल क्लार्क यांना लोगो म्हणून एक धावणारा घोडा रेखाटायला सांगण्यात आला. नंतर त्यामागे निळा, लाल आणि पांढरा अशा तीन रंगांच्या उभ्या पट्टय़ांची भर पडली.