22 October 2019

News Flash

व्हिंटेज वॉर : वैर ताकदीचे

या दोन्ही गाडय़ांचा सर्वाधिक संघर्ष अमेरिकेच्या रेसट्रॅकवर दिसून येत होता.

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे vaibhavbhakare1689@gmail.com

फोर्ड मस्टँग आणि शेव्हर्ले कमेरो यांना अमेरिकेत मसल कार या नावाने ओळखले जाते; पण या दोन्ही गाडय़ांमधील वैर हे गाडय़ांच्या शैलीविरोधात होते. मस्टँग तयार करण्याची कल्पना फोर्डचे व्यवस्थापक ली लाकोका यांची होती. १९६४ मध्ये ही गाडी बाजारात आली आणि धुमाकूळ घालू लागली. पहिल्याच वर्षांत विक्रीचा ४१८,८१२ हा विक्रमी आकडा गाठला. मस्टँगच्या तुफान लोकप्रियतेची सर्वाधिक झळ ही शेव्हर्लेला बसली.

१९६४ मध्ये बाजारात दाखल होऊन अचानक लोकप्रिय झालेल्या मस्टँगला उत्तर म्हणून कोरवेर आणि नोवाकडून शेव्हर्लेला अपेक्षा होती. मात्र या दोन्ही गाडय़ा मस्टँगची शैली आणि तिच्या व्ही-८ इंजिनच्या क्षमतेची बरोबरी करू शकल्या नाही. मस्टँगच्या वाढत्या लोकप्रियतेला उत्तर म्हणून शेव्हर्लेने १९६७ मध्ये बाजारात कमेरो दाखल केली. मस्टँगचे वर्चस्व मोडीत काढण्याच्या उद्देशाने तयार केली असूनही कमेरोला स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व होते. ती मस्टँगची नक्कल अजिबात नव्हती. ऐटबाज आणि मोहक मस्टँगशी सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेली कमेरो ही तिच्या डिझाइनने आक्रमक होती.

या दोन्ही गाडय़ांचा सर्वाधिक संघर्ष अमेरिकेच्या रेसट्रॅकवर दिसून येत होता. पारनेली जोन्स यांची बॉस ३०२ मस्टँग आणि मार्क डोनोह्य़ू यांची कमेरो झेड २८ यांच्यातील हे वेगाचे युद्ध लक्ष वेधून घेणारे ठरत होते. तर अमेरिकेच्या रस्त्यांवर या गाडय़ांच्या इंजिनमध्ये बदल करून बेकायदा शर्यती लावण्याचा सपाटा तेव्हा तरुणांनी सुरू केला होता. १९६९ मध्ये आलेल्या नवीन संस्करणात या गाडय़ांच्या ताकदीत अजून वाढ करण्यात आली. ४२७ क्युबिक इंचाचे व्ही-८ इंजिन असणारी कमेरो आणि ४२९ क्युबिक इंचाचे इंजिन असणारी बॉस मस्टँग बाजारात दाखल झाली होती. इतर मसल कारच्या तुलनेने मस्टँग आणि कमेरोचे वैर वेगळे असण्याचे अजून एक कारण म्हणजे १९७०च्या अमेरिकेतील इंधन तुटवडय़ात या गाडय़ा संपल्या नाहीत. गाडीची कार्यक्षमता कमी करण्यात आली; पण दोन्ही गाडय़ा बाजारात तग धरून राहिल्या. १९८० आणि ९० च्या दशकात हार्सपॉवरमध्ये वाढ झाल्यानंतर पुन्हा दोन्ही गाडय़ा एकमेकांसमोर ठाकल्या. शेव्हर्लेने कॉरवेटचे इंजिन कमेरोत वापरायला सुरुवात केली, तर फोर्डने एसवीटी कोब्रा तयार केली. नवीन शतकाच्या उंबरठय़ावर येताना कमेरो आणि मस्टँगचे ३०० हॉर्सपावरहून अधिक शक्तिशाली संस्करण बाजारात आले आणि अचानकच २००२ मध्ये कमेरोने मैदानातून माघार घेतली. कमेरोसह पॉनटिअ‍ॅक फायरबर्डदेखील बंद करण्यात आली. गाडय़ांच्या विक्रीत सतत घट होत असल्याने जनरल मोटर्सने कूपे कार बंद करण्याचा निर्णय २००२ मध्ये घेतला; परंतु १९६४ प्रमाणे पुन्हा एकदा मस्टँगने चिथवण्याचे काम केले. फोर्डने नव्या डिझाइनसह २००५ मध्ये मस्टँग बाजारात आणली आणि १६०,४१२ एवढय़ा गाडय़ांची विक्री केली.

२०१० मध्ये रेट्रो लुक असणारी कमेरो पुन्हा बाजारात आली. दोन्ही गाडय़ांमध्ये व्ही ८ इंजिन होते. मस्टँग जीटीमध्ये ४२० हॉर्सपॉवरची क्षमता असणारे ५ लिटरचे इंजिन होते, तर कमेरो एस एसमध्ये ४२६ हॉर्सपॉवर निर्माण करणारे ६.२ लिटरचे इंजिन होते. २०१४ मध्ये कमेरो झेड/२८ ही गाडी आली. ७ लिटरचे व्ही-८ इंजिन ५०० हॉर्स पॉवर. गाडीचे अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी गाडीतील वातानुकूलन यंत्रणादेखील नाही. २०१३ मध्ये फोर्डने नवी मस्टँग जगासमोर आणली. अगदीच नवीन डिझाइन असेलेल्या या मस्टँगमध्ये जुन्या मस्टँगची झलक होती. एकमेकांना मागे टाकण्यासाठी सुरू असलेल्या या वैरामुळे अधिकाधिक चांगल्या गाडय़ा तयार करण्याकडे या कंपन्यांचा कल राहिला. म्हणून अजूनदेखील मस्टँग आणि कमेरोचे चाहत्यांच्या मनावर गारूड आहे.

First Published on January 12, 2019 1:58 am

Web Title: ford mustang chevrolet camaro vintage car