व्हिंटेज वॉर : वैभव भाकरे

मागील वर्षी फोर्डने एक कोटी मस्टँग विकण्याचा विक्रम केला. मस्टँग ही फोर्डची सगळ्यात लोकप्रिय स्पोर्ट्स कार आहे. साठच्या दशकापासून या मोटारीची विक्री सुरू आहे. परंतु या शक्तिशाली वाहनाला एका नव्या रूपात जगासमोर आणण्याचा  प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न म्हणजे पारंपरिक मस्टँगचा शेवट की नव्याने जन्म हा प्रश्न आता उभा राहिला आहे..

इलेक्ट्रिक म्हणजे मोटारीचे भविष्य ही चर्चा आपण गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आहोत, परंतु हे भविष्य आज वर्तमानात अवतरले आहे. भारतीय बाजारातसुद्धा मोटारींचे अनेक सक्षम इलेक्ट्रिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये इलेक्ट्रिक मोटारींना पारंपरिक वाहनांचा एक मजबूत दावेदार म्हणून आज पाहिले जात आहे. त्यातच गतकाळाच्या मोटार जगतातील दिग्गजांना इलेक्ट्रिक रूपात नव्याने जीवनदान देण्याचा फोर्डने प्रयत्न केला आहे आणि ती मोटार म्हणजे फोर्डची मस्टँग सर्वाधिक लोकप्रिय आणि बहुचर्चित स्पोर्ट्स कार. एक परवडणारी स्पोर्ट्स कार बाजारात दाखल करण्याच्या विचारातून मस्टँगचा जन्म झाला आणि ही कार विक्रीचे अनेक विक्रम रचत गेली. पुढे मस्टँग इतकी लोकप्रिय झाली की ती स्वत:च एक ब्रँड म्हणून उदयास आली. फोर्ड मोटारीच्या मांदियाळीत मस्टँगने आपले वलय राखून ठेवले. मागील पन्नास वर्षांपासून विक्रीत असलेल्या या गाडीचा इलेक्ट्रिक अवतार फोर्डने बाजारात दाखल केला आहे. मसल कार आणि गजलर या आपल्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध दिशेने मस्टँगने आता घोडदौड सुरू केली आहे. ही नवी मस्टँग चार दारांची क्रॉसओव्हर इलेक्ट्रिक मोटार आहे.

मस्टँगला रेस कार म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या गाडीत बदल करायला वाव असल्याने ही रेस कार चालकांची अगदी लाडकी मोटार बनली. शेव्हर्ले कमेरो, डॉज चॅलेंजर ही वाहने बाजारात असूनही मस्टँगला स्पर्धा देऊ  शकल्या नाहीत.  १९७० च्या काळात इंधन तुटवडय़ामुळे मस्टँगची इंजिन क्षमता कमी करण्यात आली आणि मस्टँग व्ही ८ बाजारात दाखल करण्यात आली. मात्र कमी ताकदीची ही मोटार लोकांच्या पसंतीस पडली नाही आणि फोर्डवर भरपूर टीकादेखील झाली. त्यानंतर फोर्ड मस्टँगच्या इंजिनमध्ये छोटे-मोठे बदल करत राहिली. परंतु अंतर्गत ज्वलन इंजिन असलेल्या दोन दरवाजाच्या स्पोर्ट्स कारचे रूपांतर थेट एका एसयूव्हीमध्ये फोर्डने केले आहे. पण फोर्डचा हा निर्णय पूर्णपणे बाजारावरती अवलंबून आहे.

२०१५ मध्ये बाजारात नव्याने दाखल झालेल्या मस्टँगच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. त्याचप्रमाणे दोन दाराच्या कुपे वाहनाहून एसयूव्हीला ग्राहक जास्त पसंती देत आहेत.  जे मस्टँग घेत आहेत, तेदेखील पन्नाशीच्या पुढे असल्याचे विपणन अहवालानुसार समोर आले आहे. याचा अर्थ मस्टँग हा ब्रँड कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

म्हणूनच नव्या ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मस्टँगकडून आता प्रयत्न केले जात आहेत. केवळ मस्टँगच नाही तर कमेरो आणि चॅलेंजर यांची विक्रीदेखील दशकभरात कमी होत असल्याचे दिसत आहे. दमदार परफॉर्मन्स याची व्याख्या मागील काही काळामध्ये पूर्णपणे बदलून गेली आहे. केवळ वेगच नाही तर अधिक प्रवासी आणि सामान नेण्याची क्षमता असणारे वाहन हे आता दमदार परफॉर्मन्समध्ये हे गृहीत धरण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे अधिक इंधन खर्ची न घालता इलेक्ट्रिक वाहनेसुद्धा स्पोर्ट्स कारचा थरार देऊ  शकतात हे टेस्लाने दाखवून दिले आहे.

टेस्लाला मिळत असलेली लोकप्रियता हे ग्राहकांची इलेक्ट्रिकला असलेली पसंती दर्शवून देत आहे. म्हणूनच आता फोर्ड व्हर्सेस टेस्ला ही स्पर्धा रंगणार असल्याचे दिसणार आहे.

vaibhavbhakare1689@gmail.com