वैभव भाकरे vaibhavbhakare1689@gmail.com

ज्या शर्यतीत विजय आणि पराभव सेकंदावर ठरत असेल ती स्पर्धा आक्रमक  असणार याबाबत काही शंकाच नाही. रेसिंग क्षेत्रात बहुधा सर्वाधिक प्रचलित आणि वलयांकित असणाऱ्या फॉम्र्युला-१ मध्ये अशाप्रकारचे वैर प्रत्येक दशकात समोर आले आहे. पण त्यातील सर्वाधिक चर्चित असलेले वैर हे एर्टन सेन्ना आणि एलेन प्रॉस्ट यांचेच असावे.

१९८८च्या फॉम्युला-१च्या हंगामात मॅकलॅरनने सर्वोत्कृष्ट रेसकार ड्रायव्हरना आपल्या टीममध्ये घेण्याचा सपाटा सुरू केला होता. त्यांच्या सुदैवाने त्या काळातील फॉम्युला-१ची सर्वोत्तम जोडी ही त्यांच्या गॅरेजमध्ये होती. एर्टन सेन्ना आणि एलेन प्रॉस्ट हे दोन्ही टोकांच्या शैलीचे ड्रायव्हर या संघात होते.

सेन्नाला वेगाने जात इतरांना मागे टाकण्याची घाई असायची. तर प्रॉस्ट एकूण परिस्थतीनुसार त्याची रणनीती आखायचा. भिन्न शैली असणाऱ्या या दोन ड्राइव्हर्सच्या वैराने फॉम्युला वन खेळाचे अर्धे दशक गाजवले. या स्पर्धेची पहिली ठिणगी १९८८ मध्ये पोर्तुगाल जीपीमध्ये पडली, जेव्हा सेन्नाने प्रॉस्टला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जवळजवळ पीटवॉलमध्ये दाबले. पण प्रॉस्ट या फ्रेंच रेसकार ड्रायव्हरने त्याच्या ब्राझीलियन प्रतिस्पध्र्याला मागे टाकले, आणि शर्यतदेखील जिंकली. १९८८च्या सॅन मारीनो ग्रॅण्ड प्रिक्समध्ये अशाच प्रकारची घटना पुन्हा घडली, परंतु यावेळी सेन्ना विजेता ठरला. १९८९मध्ये अधिक तीव्र होणाऱ्या वैराची ही तर केवळ चाहुलच होती. रेसट्रॅकवर एकमेकांना मागे टाकण्याची दोघांची धडपड सुरू झाली. तर रेसट्रॅकच्या बाहेर एकमेकांविरुद्ध मानसिक युद्ध छेडले गेले. आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. यातील सर्वाधिक चर्चेत असणारा प्रसंग म्हणजे सॅन मारिनो ग्रँड प्रिक्स आणि सुझुका येथील हंगामातील शेवटची शर्यत. यावेळी सेन्नाला शर्यतीतून अपात्र ठरविण्यात आले. आणि प्रॉस्टने चॅम्पियनशिपचा खिताब जिंकला. १९९० मध्ये या वैराला नवी कलाटणी मिळाली प्रॉस्ट मॅकलॅरनचा संघ सोडून फेरारीच्या संघात गेला. एकाच संघातले असल्याने एकमेकांना औदार्य दाखविण्यासाठी त्यांच्यावरील दबाव आपोआप नाहीसा झाला. आणि दोघांची स्पर्धा अतिशय तीव्र झाली. जपानमधील सुझुका येथे झालेली शर्यत या दोघांमुळे अधिक लक्षात ठेवली जाते. शर्यतीच्या पहिल्या वळणावरच दोघांच्या गाडय़ांची धडक झाली. त्यामुळे दोन्ही गाडय़ा शर्यतीतून बाद झाल्या. मात्र यामुळे सेन्नाची चॅम्पिअनशिप जिंकण्याची दावेदारी पक्की झाली. १९८९ मध्ये जपानी ग्रँड प्रिक्समध्ये झालेल्या धडकेमुळे जसे प्रॉस्टला विजेतेपद मिळाले होते. त्याच्या नेमकी उलट परिस्थिती १९९०मध्ये झाली. १९९१ मध्ये सुद्धा सेन्नाच्या मॅकलॅरनने चॅम्पिअनशिप जिंकली. आणि प्रॉस्टला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. १९९२ मध्ये प्रॉस्टने फॉम्र्युला वनपासून काही काळ दूर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु पुढच्याच वर्षी म्हणजे १९९३मध्ये प्रॉस्टने पुनरागमन केले. त्याने विल्यम्स ग्रँड प्रिक्स इंजिनीअरिंग लिमिटेड या कंपनीकडून शर्यतीत भाग घेण्याचे ठरवले. परंतु ‘विल्यम्स’शी करार करताना सेन्नाला त्यांच्या संघात घेतले जाऊ  नये अशी अट प्रॉस्टने घातली होती. आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या वर्षांत चॅम्पिअनशिपचा खिताब प्रॉस्टने जिंकला. या खिताबावर चौथ्यांदा त्याने आपले नाव कोरले. १९९३ मध्येच प्रॉस्टने फॉर्मुला वन मधूननिवृत्त होण्याचे ठरवले. सेन्ना आणि प्रॉस्ट यांच्या युद्धाचे वादळ शांत झाले.  एकमेकांवर त्यांनी केलेले आरोप, हेवेदावे, रेस ट्रॅकवर आखलेली रणनीती यामुळेच दोघांचीही कारकीर्द बहरली. दोघे पाच वर्षांहून अधिक काळ एकमेकांचे शत्रू होते. परंतु रेसकार ड्रायव्हर म्हणून एकमेकांबद्दल दोघांच्या मनात आदरही होता. १९९४ मधील सॅन मरिनो जीपीमध्ये सेन्नाच्या गाडीला अपघात होऊन त्यात त्यांचा दुर्दैवी मुत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे पूर्ण फॉम्र्युला १ जगत हादरले. या घटनेचा धक्का प्रॉस्टला देखील बसला. ‘मला वाटते मी माझ्यातले काहीतरी गमावले आहे’ अशी प्रतिक्रिया प्रोस्टने दिली. आमच्या दोघांमधील वाईट प्रसंग मी डोक्यात ठेवत नाही, त्याच्या (सेन्नाच्या) आयुष्याच्या शेवटच्या सहा महिन्यांच्या आठवणी मी मनात ठेवल्या आहे. तेव्हाच एर्टनला मी समजू शकलो. अशी भावना प्रॉस्ट याने एक मुलाखतीत व्यक्त केली होती.