News Flash

मरुभूमीचे अंतरंग

पोखरण शहर तसे छोटेच आहे. याच शहराच्या मध्यवस्तीत एक अतिशय सुंदर किल्ला उभा आहे.

|| ओंकार वर्तले

मरुभूमीचा अर्थ वाळवंटाची भूमी. जसे आपण राजस्थानच्या पश्चिमेला जाऊ  लागतो तसे ही मरुभूमी आपले अंतरंग दाखवते. भारताच्या पर्यटनाचे वैशिष्टय़च मुळी वैविध्य हे आहे. या वैविध्यातील आनंद जगात तुम्हाला अन्यत्र सापडणार नाही. ही मरुभूमीही त्याला अपवाद नाही.

पोखरणचा  किल्ला

पोखरण शहर तसे छोटेच आहे. याच शहराच्या मध्यवस्तीत एक अतिशय सुंदर किल्ला उभा आहे. जमिनीवरच असल्यामुळे हा भुईकोट या प्रकारात मोडतो. लाल रंगाच्या वैशिष्टय़पूर्ण दगडांत बांधलेला हा किल्ला पाहता क्षणी लाल-किल्लाच वाटून जातो. इतिहासकारांच्या मते इ.स. १५५० साली राव मालदेव यांनी या किल्ल्याची निर्मिती केल्याचे सांगण्यात येते. या किल्ल्याला बालागड असेही म्हणतात. किल्ल्यामध्ये वैशिष्टय़पूर्ण दरवाजे, कमानी, झरोके, भिंती आहेत. त्यावर राजस्थानी स्थापत्याची छाप दिसते. या साऱ्या वास्तूंवर राजपूत आणि मुघल शैलीचा प्रभाव जाणवतो. किल्ल्यात स्वच्छता राखण्यात आली आहे. मंगल महाल आणि राज महाल पाहण्यासारखे आहेत.

राजस्थानचा पश्चिम भाग हा मारवाड म्हणून ओळखला जातो. या भागात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. पण याच भूमीतील आनेक पर्यटन स्थळे पर्यटकांच्या हृदयावर किती तरी वर्षे राज्य करत आली आहेत. या भागाला इतिहास आहे, देशभक्तीचे कोंदण आहे, वास्तू-स्थापत्य आहे, शक्तीचे अधिष्ठान आहे. अशाच भागात पोखरण वसले आहे.

पोखरणची ओळख भारतीयांना तरी सांगायची गरज नाही. भारताच्या अणुस्फोटाचा साक्षीदार असलेले हे  ठिकाण राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात येते. थरच्या वाळवंटात असलेल्या या पोखरणमध्ये १९७४ साली आणि १९९८ साली भारताने येथे अणुचाचण्या यशस्वी करून जगात श्रेष्ठत्व सिद्ध केले. या ठिकाणी जाण्यास बंदी जरी असली तरी पोखरणमध्ये पर्यटनाची काही ठिकाणे आहेत, ती मात्र आपण पाहू शकतो.

रामदेवरा मंदिर

पोखरणपासून बारा किलोमीटर अंतरावर आणि जैसलमेर रस्त्यावर असलेले रामदेवरा मंदिर हे राजस्थानातील नागरिकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. ऑगस्ट व सप्टेंबरदरम्यान येथे खूप मोठी यात्रा भरते. याच यात्रेदरम्यान रात्री येथे राजस्थानी कलावंतांची गायनाची मैफल आवर्जून अनुभवावी अशीच असते. सर्वधर्मीयांचे पवित्र ठिकाण म्हणूनही हे मंदिर ओळखले जाते. खारेतर रामदेव ही राजस्थानची एक लोकदेवता! जी घोडय़ावर स्वार असलेल्या राजासारखी दिसते. अनेक लोकांच्या मते हे मंदिर प्रसिद्ध संत बाबा रामदेव यांचे आहे. पोखरणच्या सफरीत हे मंदिर आवर्जून पाहावे असेच आहे.

रॉयल सेनेटॉफ

राजस्थानमध्ये फिरताना दगडी छत्र्या पाहायला मिळणे हे त्या-त्या भागाचे वैशिष्टय़च म्हणावे लागेल. अशाच छत्र्या पोखरणजवळ पाहायला मिळतात. राजघराण्यातील लोकांच्या स्मरणार्थ बांधलेले हे ठिकाण रॉयल सेनेटॉफ म्हणून ओळखले जाते. लाल रंगाच्या दगडात उभारलेल्या या छत्र्या म्हणजे वास्तू-स्थापत्याचा सुरेख आविष्कार आहे. नक्षीदार दगडी खांबांवर कलाकुसरीचे दगडी छत म्हणजे छत्री. अशा दहा-बारा छत्र्यांचा समूह पोखरणपासून तीन-चार किलोमीटरवर एका छोटय़ा टेकडीवर आहे. याच ठिकाणाला शक्ती माता मेमोरियल छत्री म्हणून ओळखले जाते.

पोखरण हे मुळात लहान शहर आहे. येथली खाण्याची ठिकाणेही आवर्जून भेट द्यावी, तिथल्या पदार्थाचा आस्वाद घ्यावा, अशीच आहेत. विशेत: चमचम हा दुधापासून केला जाणारा गोड पदार्थ खास आहे. राजस्थान सफरीत आपण अनेकदा मोठी आणि प्रसिद्ध ठिकाणे पाहतो. पण पोखरण हे ठिकाण पाहायचे राहून जाते. जैसलमेरच्या रस्यावरच असलेले हे ठिकाण न चुकता पाहावे, असेच आहे.

ovartale@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 4:17 am

Web Title: fort travelling journey akp 94
Next Stories
1 पॉट आइसक्रीम
2 वाफ्यातील कंदपिके
3 लॉब्स्टर फेवरिट
Just Now!
X