पोटाचे आणि पायाचे स्नायू बळकट करण्यासाठीचा महत्त्वाचा व्यायाम म्हणजे ‘फॉरवर्ड लंग’. कोणत्याही व्यायामाच्या साधनांशिवाय हा व्यायाम करता येतो. हा व्यायाम करायला सोपा असला तरी तो करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

कसे कराल?

* सरळ उभे राहा. पाठीचा कणा अगदी सरळ असावा. खांदे खाली आणि मागच्या बाजूस ओढून घ्यावे.

*  आता एक पाय वर उचलून पुढे सरळ काही अंतरावर ठेवा. हे करतानाच दुसरा पाय गुडघ्यात खाली वाकवा. हे करताना पुढील पाय गुडघ्यात काटकोनात वाकला पाहिजे. मात्र दुसरा पाय जमिनीला टेकला नाही पाहिजे. पाय उचलताना मात्र अन्य कोणत्याही साधनांचा (भिंत, खांब वगैरे) आधार घेऊ नका. पाय पुढे काही अंतरावर ठेवताना जमिनीवर जोराचा दाब द्यावा. मागचा पायही काटकोनात वाकला पाहिजे मात्र त्याचे पाऊल मागच्या बाजूला असावे. या पावलाचाही केवळ चवडा जमिनीला टेकलेला असावा आणि टाच वरच्या बाजूस असावी.

*  कंबरेतून खाली वाकल्यानंतर पुन्हा सरळ उभे राहा. पुढे टाकलेला पाय मागे घेऊन पूर्वीच्याच स्थितीत या.

* आता अदलाबदल करून दुसरा पाय पुढे टाकून पुन्हा हा व्यायाम करा. अधिकाधिक हा व्यायाम केल्याने मांडी, गुडघा, पोटरी आणि पोट यांचे स्नायू बळकट होतात.