News Flash

वन्यजीवांशी मैत्री

ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यानचा काळ म्हणजे रानावनात मनसोक्त भटकण्याचा, वन्य प्राण्यांचा मगोवा घेण्याचा काळ.

|| मकरंद जोशी

ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यानचा काळ म्हणजे रानावनात मनसोक्त भटकण्याचा, वन्य प्राण्यांचा मगोवा घेण्याचा काळ. देशात अनेक अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यामुळे कुठे जावे, काय पाहावे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. यंदाच्या हिवाळ्यात कुठे कुठे जाऊन खरखुरं जंगलबुक वाचता येईल याचा आढावा..

रानभटके आणि वन्यजीव प्रेमी पावसाळा संपण्याची आतुरतेने वाट पाहात असतात, कारण पावसाळा संपल्यानंतरच म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात भारताच्या कानाकोपऱ्यातील जंगले, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये निसर्गप्रेमींसाठी खुली होतात. झुंजुमुंजु होताना, जिप्सीत कुडकुडत गेट उघडायची केलेली प्रतीक्षा, सर्वात पहिली, किमान पहिल्या पाच गाडय़ांपैकी एक गाडी आपली असावी, म्हणून केली जाणारी धडपड, पावसाने तरारलेल्या जंगलावर पसरलेली पहाटेच्या धुक्याची चादर, रानाचा उग्र गंध, अधूनमधून कानावर पडणारे पक्ष्यांचे स्वर, झाडाच्या शेंडय़ांवरून खाली उतरणारे मोर, अचानक एखाद्या वळणावर दिसलेले ताजे ताजे पगमार्क, त्यांचा मागोवा घेणे, जंगलावर पसरलेली सोनेरी उन्हे अनुभवणे यासाठी आतुरलेल्यांची पावले ऑक्टोबर उजाडताच आपोआप नॅशनल पार्क किंवा अभयारण्यांकडे वळतात.

आता सुरुवात कुठून करायची? रणथंबोर की काझिरंगा की दक्षिणेतल्या बंदिपूरपासून ते प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे. हिवाळ्याचे दिवस म्हणजे बहुतेक सगळ्या जंगलांमध्ये एलिफंट ग्रास अर्थात हत्तीइतकं उंच गवत वाढलेलं असतं. शिवाय पाऊस दमदार झाला असेल तर जंगलाच्या आतल्या भागातली तळी, डोह पाण्याने भरलेले असतात. त्यामुळे खरंतर हा काळ व्याघ्र दर्शनासाठी अनुकूल नाही. पण रणथंबोर या राजस्थानमधील संरक्षित जंगलाची बातच न्यारी. एकतर राजस्थानमधलं असल्याने ते कान्हासारखं सदाहरित नाही. शिवाय तिथल्या वाघांमध्येही स्थानिकांची निडरता पुरेपूर उतरली आहे. त्यामुळे कृष्णा, नूर, लाडली, कुंभा असे इथले नामांकित वाघ आणि वाघिणी या काळातही आनंदाने दर्शन देतात. त्यात भर पडते ती स्थलांतरित पक्ष्यांची त्यामुळे दिवाळी किंवा नाताळची सुटी वाघांबरोबर घालवायची असेल तर रणथंबोरची निवड करायला हरकत नाही.

वेगळं काही पाहण्याची हौस पूर्ण करणारं जंगल म्हणजे आसाममधील काझिरंगा. भारतीय एकशिंगी गेंडय़ांचं मुख्य आधारस्थान असलेल्या या जंगलाला ब्रह्मपुत्रा नदीने वेढा घातलेला आहे. २०१८ च्या वन्यप्राणी गणनेनुसार या ४३० चौ.कि.मी.वर पसरलेल्या अरण्यात दोन हजार ४०० एकशिंगी गेंडे आहेत. त्याखेरीज हत्ती, वाइल्ड बफेलो, बारासिंगा, पट्टेरी वाघ, हॉग डिअर, गोल्डन जॅकल, अस्वल, फ्लाइंग स्क्विरल, आसामी मकॉक, कॅप्ड लंगूर, हूलॉक गिबन, लेपर्ड कॅट असे वैविध्यपूर्ण प्राणीही आहेत. पक्ष्यांच्या बाबतीतही काझिरंगा समृद्ध आहे.

डाल्मेशियन पेलिकन, ब्लिथ्स किंगफिशर, ईस्टर्न इम्पिरियल इगल, ग्रेट इंडियन हॉर्नबिल, स्वॅम्प फ्रँकोलिन, ब्लॅक नेक स्टॉर्क असे पक्षी इथे दिसतात. हत्तीच्या पाठीवरून फिरता येते आणि गेंडय़ांच्या अगदी जवळ जाता येते.

भारतीय वन्य जीवनाचं अनोखं दर्शन घ्यायचं असेल, तर पश्चिम बंगालमधील सुंदरबनला जावे. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या नद्या जिथे बंगालच्या उपसागराला मिळतात, त्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या भागात सुंदरबन पसरलेलं आहे. जिथे पट्टेरी वाघ आढळतो असे जगातले एकमेव खारफुटी जंगल म्हणून याचा समावेश युनेस्कोच्या विश्व वारसा यादीत झाला आहे. आता सुंदरबनमध्ये बाघोबांचं दर्शन क्वचितच होतं. इथे छोटय़ा मोटरलॉन्चमधून, लहान लहान खाडय़ा, त्यांचे प्रवाह आणि काठावरचे हिरवेगार अरण्य पाहताना एका वेगळ्या जगात आल्याचा भास होतो. इथे रानकोंबडा, होला, सातभाईंपासून ते वूड स्नइप, गोल्डन प्लोवर, व्हाइट बेलिड सी ईगल, पेरिग्रिन फाल्कन, रुफस बॅक किंगफिशर, ब्लॅक कॅप्ड किंगफिशपर्यंत शेकडो प्रकारचे पक्षी दिसतात. खास जलचरांपैकी पाण्यातली घोरपड, मगर, टेरापिन, इरावदी डॉल्फिन्स असे अनोखे जीवही पाहायला मिळतात. इलेक्ट्रिसिटी आणि प्राथमिक सुविधा नसलेल्या सुंदरबनच्या बेटा बेटांवर राहणारे इथले कष्टाळू स्थानिक आणि त्यांच्या चालीरीती हा तर स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.  चला, तर या मौसमात पक्षी-प्राण्यांच्या जगात डोकावूया आणि नवे मित्र मिळवूया.

पक्षी निरीक्षणाचे पर्याय

खरेतर हा काळ पक्षी निरीक्षणासाठी उत्तम. एकतर पावसाळ्यानंतर नद्या, ओढे यांना भरपूर पाणी असतं, फळा-फुलांचा बहर सुरू झालेला असतो त्यामुळे स्थानिक पक्षी तर बघायला मिळतातच, पण ऑक्टोबरपासून हिवाळी पाहुणे म्हणजे स्थलांतरित पक्षी यायला सुरुवात होते. अशा वेळी गुजराथमधील पाणथळ, तलाव यांची आठवण होणं स्वाभाविकच असतं. गुजराथमधील लिट्ल रण ऑफ कच्छपासून ते बनीच्या ग्रासलँड्सपर्यंत अनेक जागा पक्षिमित्रांना या काळात आकर्षित करतात. भूज शहराजवळ असलेल्या कच्छ डेझर्ट वाइल्ड लाइफ सँक्चुरी, नारायण सरोवर अभयारण्य, इंडियन वाइल्ड सँक्चुरी, बनी ग्रासलँड रिझर्व या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांबरोबरच वाळवंटी अधिवासातील प्राणी, पक्षी बघायला मिळतात.

जवळपासची पक्षी अभयारण्ये

या एखाद्या वीकेंडला जाऊन यायचे असेल तर अहमदाबादजवळचे नल सरोवर आणि थोल सरोवर हा पर्याय आहे. अहमदाबादपासून फक्त ६५ किमीवर सानंद गावाजवळ असलेली नल सरोवर ही गुजराथमधील सर्वात मोठी वेटलँड बर्ड सँक्चुरी आहे. हिवाळ्याच्या काळात या पाणथळीकडे सुमारे २१० प्रकारचे पक्षी आकर्षित होतात. पेलिकन्स, फ्लेमिंगो, हेरॉन्स, ब्राह्मणी बदक, ब्लॅकटेल गॉडविट, मूरहेन्स, बिटर्न्‍स, ग्रेब्स, पिजंट टेल्ड जकाना, डार्टर, कूट असे इथले पक्षी वैभव पाहायला दोन दिवसही अपुरे वाटतात. याशिवाय महाराष्ट्रातील भिगवण-कुंभारगावचे पक्षीतीर्थ, नांदूर-मध्यमेश्वरचा जलाशय, भुसावळजवळच्या हतनूर धरणाचा जलाशय ही ठिकाणेही पक्षिमित्रांना साद घालतात.

makarandvj@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:23 am

Web Title: friendships with animal
Next Stories
1 लाल भोपळ्याचा हलवा
2 सावंतवाडी
3 भाज्यांच्या लागवडीचा क्रम
Just Now!
X