|| बापू बैलकर

वाहनांचे भविष्य सेल्फ ड्राइव्हिंगच्या दिशेने सरकत आहे. आपल्याकडे अजून हे तंत्रज्ञान आले नाही, मात्र आपल्या खरेदीदारांचा कल मात्र आधुनिकतेकडे झुकताना दिसत आहे. आधुनिक सवारीची आकांक्षा नवग्राहकांची वाढताना दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या कार खरेदीदारांच्या सव्‍‌र्हेतही भविष्याचा विचार करता कार कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, असे भारतीय खरेदीदारांना वाटत आहे..

  • सहा महिन्यांत १५,९३० एमजी हेक्टर कारची विक्री झाली.
  •  किआ सेल्टोसची पाच महिन्यांत १ लाख कारची नोंदणी मिळाली.
  •   ह्य़ुंदाईच्या व्हेन्य कारची ६१ हजार १०० इतकी विक्री झाली..

आर्थिक मंदीमुळे वाहन खरेदी-विक्रीवर २०१९ या वर्षांत मोठा परिणाम झाला. असे असताना या काही कारला मात्र खरेदीदारांनी डोक्यावर घेतले. हा बदल आहे पसंतीचा. ग्राहकांचा कल बदलत राहिला. हॅचबॅकपेक्षा कॉम्पॅक्ट सेडानकडे खरेदीदार वळले. ही वाहने बाजारात स्थिरावतात तोच पाश्चिमात्य देशांत लोकप्रिय असलेल्या स्पोर्ट्स युटिलिटी म्हणजे एसयूव्ही वाहनांना पसंती मिळू लागली, आणि २०१९ या वर्षांत आर्थिक मंदी असताना एसयूव्हींना मात्र मागणी राहिली. यात एमजी हेक्टर, किआ सेल्टोस किंवा ह्य़ुंदाईची व्हेन्यू या कारना ग्राहकांनी डोक्यावर घेतल्याचे दिसले. यात महत्त्वपूर्ण बदल होता तो कनेक्टिव्हिटीचा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अधिक काही तरी देण्याचा प्रयत्न कार कंपन्यांनी केला, यात इंटरनेट कार ही संकल्पना पुढे आली. आणि यात विविध तंत्रज्ञानाचा वापर करीत काही कार बाजारात आल्या. बदलत्या काळानुसार मोटारीदेखील आधुनिक होऊ लागल्या. किलेस एन्ट्री, सेट्रल इन्फोटेनमेंट यंत्रणा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी याचा वापर या कारमध्ये करण्यात आला आहे. या कारना भारतीय नवग्राहक पसंती देत आहेत. नुकताच जगातील वाहन खरेदीदारांचा एक सव्‍‌र्हे ‘डेलॉइट’ या संशोधन संस्थेने केला आहे. यात भारतातील ८० टक्के कार खरेदीदारांना असे वाटते की, भविष्याचा विचार करता कारमधील कनेक्टिव्हिटीत वाढ झाली पाहिजे. हेच प्रमाण जर्मनीमधील कार खरेदीदारांचे ३६ टक्के, चीन ७६ टक्के, जपान ४९ तर अमेरिकेतील कार खरेदीदारांचे ४६ टक्के आहे. यावरून भारतात सध्या इंटरनेट कनेक्टिव्ही असलेल्या कारकडे खरेदीदारांचा कल दिसत आहे. सध्याचा काळ हा कनेक्टिव्हिटीचा आहे. आपण इंटरनेटशी सतत जोडले गेलेलो असतो. आपला फोन, टीव्ही, संगणक, घडय़ाळ आणि गाडीदेखील आता इंटरनेटरशी जाडेली जावी अशी खरेदीदरांची इच्छा आहे. मात्र यात धोका आहे, तो हॅकर्सच्या हल्ल्याचा. यात आपली वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते. त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

कनेक्टिव्हिटी कारला पसंती हेक्टरची आयस्मार्ट यंत्रणा

इंटरनेट कनेक्टिव्हिटी हे या गाडीचे वैशिष्टय़ आहे. हेक्टरमध्ये आयस्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हेक्टरमध्ये १०.४ इंचांची टचस्क्रीन देण्यात आली आहे. ही सुरक्षित, कनेक्टेड प्रवासाची खात्री करण्यासाठी तयार आहे. ही टचस्क्रीन गाडीच्या कमांड सेंटरप्रमाणे काम करते. या टचस्क्रीनद्वारे तुम्ही गाडी नियंत्रित करू शकता. या गाडीत बोलून आदेश समजून घेण्याची यंत्रणा देण्यात आली आहे. ‘हॅलो एमजी’ म्हटल्यावर ही यंत्रणा कार्यरत होते. याद्वारे गाडीची वातानुकूलन यंत्रणा, संगीत प्रणाली नियंत्रित करता येऊ  शकते. गाडीचे सनरूफदेखील बोलून आदेश देऊन नियंत्रित करता येते. गाडीला कनेक्टेड कार म्हटले असून गाडीची वातानुकूलन यंत्रणा आणि गाडीचे बूट तुम्ही घरी बसल्या नियंत्रित करू शकता. या अत्याधुनिक सुविधांमुळे ग्राहकांना वाहन चालवण्याचा एक वेगळा अनुभव देण्याच्या एमजीचा प्रयत्न आहे.

ह्य़ुंदाईची ब्ल्यू लिंक यंत्रणा

ह्य़ुंदाईने आपल्या व्हेन्यूला भारतातील पहिला कनेक्टड एसयूव्ही असे म्हंटले असून अत्याधिुनिक कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्ल्यू लिंकचा वापर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चालकाचा आवाज ओळखण्याची क्षमता असलेली क्लाऊड बेस्ड यंत्रणा आहे. ब्ल्यू लिंक तंत्रज्ञानात ३३ सुविधा देण्यात आल्या आहेत. यातील १० सुविधा या भारतीय बाजाराला विचारात घेऊन विकसित करण्यात आल्या आहेत. यात सुरक्षा, व्हेइकल मॅनेजमेंट रिलेशनशिप सव्‍‌र्हिस, कृत्रिम बुद्धिमता, अलर्ट सव्‍‌र्हिस आणि लोकेशन आधारित सेवांचा समावेश आहे.

यूव्हीओ कनेक्ट प्रणाली

किआ सेल्टोसमध्ये दोन भिन्न डिझाइन लाइन्स आहेत. कुटुंबकेंद्री ग्राहकांसाठी टेक लाइन आणि मनाने तरुण असलेल्या कारप्रेमींसाठी जीटी लाइन. सेल्टोस श्रेणीमध्ये ८ इंची हेड्स-अप-डिस्प्ले, १०.२५ इंची एचडी टचस्क्रीन, हाय-टेक साऊंड मूड लॅम्प, रीअर शेड कर्टन, ३६० डिग्री सराउंड व्ह्यू मॉनिटर, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, जगातील पहिला कनेक्टेड एअर-प्युरिफायर, गाडीसोबत वायरलेस व अखंडित जोडलेले राहण्यासाठी ३७ सुविधांनी युक्त अशी स्वत: विकसित केलेली अतिप्रगत यूव्हीओ कनेक्ट प्रणाली आहे. याशिवाय ईएससी, व्हीएसम, ६ एअरबॅग्ज, एएचएसएस-प्रगत हाय स्ट्रेंग्थ व्हील यांसारख्या सुरक्षिततेच्या सुविधा आहेत.

bapu.bailkar@gmail.com