प्रेमींचा दिवस म्हणून जगभर साजरा केला जाणारा व्हॅलेंटाइन्स डे अवघ्या २४ तासांवर आला आहे. व्हॅलेंटाइन्स डेच्या आठवडाभर आधी विविध ‘डे’ साजरे करण्याचा ट्रेंड आता ्नरुजत चालला असला तरी आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन्स डे’चं महत्त्व कायम आहे. या दिवशी आपल्या जोडीदाराकडे प्रेमभावना व्यक्त करण्यासोबतच त्याला त्याच्या आवडीची एखादी वस्तू भेट म्हणून देऊन त्या दिवसाच्या स्मृती जपण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. त्यासाठी अगदी ग्रीटिंग कार्डपासून पुष्पगुच्छापर्यंत अनेक भेटींचा वापर केला जातो. मात्र, बदलत्या काळानुसार आता या दिवशी आपल्या जोडीदाराला स्मार्टफोन किंवा तत्सम गॅजेट भेट देऊन दिवस साजरा करण्याकडे कल वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या निमित्ताने भेट म्हणून देता येतील, अशा बाजारातील काही नव्या गॅजेटबद्दल..

अ‍ॅम्ब्रेनचे ‘वाइब बीट्स’

अन्य पर्याय भेटवस्तू म्हणून महागडे आहेत, असे वाटत असले तर तुमच्यासाठी काही स्वस्त पर्यायही आहेत. अम्ब्रेन या कंपनीचे ‘वाइब बीट्स’ हे इअरबड्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. गुगल असिस्टंट किंवा सिरीचा व्हॉइस सपोर्ट, अ‍ॅक्टिव्ह व्हॉइस कॅन्सलेशन, दीर्घकाळ बॅटरी अशी या इअरबड्सची वैशिष्टय़े आहेत. ब्लूटुथ ५.० तंत्रज्ञानाने चालणाऱ्या या इअरबड्समधून तुम्हाला दर्जेदार ध्वनी ऐकायला मिळतो.

किंमत : २९९९ रुपये. 

अ‍ॅपल, फिटबिटचे स्मार्टवॉच

तुम्हाला तुमच्या जोडीदाराला महागडी भेट द्यायची असेल तर, हा एक मस्त पर्याय आहे. अ‍ॅपलचे स्मार्टवॉच आता भारतात सहज उपलब्ध झाले आहेत. त्यातही ‘वॉच सीरिज ३’ हा ३० हजार रुपयांच्या किमतीत एक चांगला पर्याय आहे. यामध्ये स्मार्टवॉचमध्ये आढळणारी सर्व वैशिष्टय़े ठासून भरलेली आहेत. शिवाय तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याच्या नोंदी ठेवण्यासाठीही हे स्मार्टवॉच चांगले आहे. अ‍ॅपलचे स्मार्टवॉच महाग वाटत असेल तर फिटबिटचे ‘व्हर्सा २’ हे स्मार्टवॉचही चांगले आहे. या वॉचमध्ये हार्टरेट, स्लीप मॉनिटर, स्मार्ट होम नियंत्रण अशा अनेक सुविधा आहेत.

अ‍ॅपल वॉच किंमत : २८,९०० रुपये, फिटबिट वॉच किंमत : २३,९०० रुपये

निकॉनचा ‘डी६’ कॅमेरा

स्मार्टफोनमधील सुविधेमुळे सध्या कॅमेऱ्यांची मागणी कमी झाली असली तरी व्यावसायिक छायाचित्रणासाठी कॅमेराच उपयुक्त ठरतो. निकॉन या कंपनीचा ‘डी६’ हा नवीन कॅमेरा व्यावसायिक छायाचित्रणासाठी उत्तम पर्याय आहे. यामधील ऑटोफोकसचे सेन्सर अतिशय ताकदवान असल्याचा कंपनीचा दावा आहे. अंधूक प्रकाशातही सुस्पष्ट छायाचित्रणासाठी यामध्ये तगडा ‘आयएसओ’ देण्यात आला आहे. यामध्ये प्रति सेकंद १४ फ्रेम्स टिपण्याची सोय असल्याने धावण्याची शर्यत किंवा उडणारा पक्षीही व्यवस्थित टिपता येतो.

किंमत: १९,९०० रुपये

अ‍ॅमेझॉन किंडल

सध्या तंत्रयुगात वाचनाची गोडी कमी झाली असली तरी, ईबुक रीडरसारख्या अ‍ॅप आणि गॅजेटनी वाचकांची आवड जपण्यात यश मिळवले आहे. अ‍ॅमेझॉनचे किंडल रीडर हे त्यापैकीच एक. डिजिटल पुस्तकांचा महासंग्रह असलेल्या किंडलचे ईबुक रीडर हा एक चांगला भेटवस्तूचा पर्याय आहे. तुमचा/तुमची जोडीदार वाचनप्रिय असेल तर त्यांच्यासाठी ही उत्तम भेट ठरेलच; पण जोडीदाराला वाचनाची गोडी लावायची असेल तरी ‘किंडल’ चांगला पर्याय आहे.

किंमत :  ७९९९ रुपये

सोनीचे वायरलेस हेडफोन

सोनी हा हेडफोनसाठी अतिशय प्रसिद्ध ब्रॅण्ड आहे. सोनीचे हेडफोन चांगली ध्वनिफेक करतात. त्यातही सोनीचे ‘डब्ल्यूएच-१०००एक्सएम३’ हे वायरलेस हेडफोन तुम्हाला ‘नॉइज कॅन्सलिंग’च्या सुविधेसह दर्जात्मक ध्वनी उपलब्ध करून देतात. हे हेडफोन एकदा चार्जिग केल्यानंतर ३० तास चालू शकतात आणि त्याला अ‍ॅमेझॉन अलेक्साचा व्हॉइस सपोर्टही आहे.

किंमत: २९,९०० रुपये