मयूर पांडुरंग निसरड, मुलुंड

हल्ली मोबाइलचा गजर न लावता आपोआपच जाग येते. सरकारने अत्यावश्यक सेवांसाठीच आणि कामासाठीच बाहेर पडता येईल, असे सांगितल्याने दूध आणायला आता मीच जातो. दिवसभर घरातच बसून असतो. त्यामुळे दूधाच्या निमित्ताने बाहेर निघण्याची संधी मिळते.  करोनाच्या काळात मिळणारा हा वेळ घालवण्यापेक्षा मी त्याचा होईल तितका उपयोगच करून घेतो. दुधाच्या निमित्ताने होणारा भल्या पहाटेचा फे रफटका झाल्यानंतर ‘लोकसत्ता’ वाचायला घेतो. संपादकीय वाचले म्हणजे खऱ्या अर्थाने वृत्तपत्र वाचले असेच वाटते. आंघोळ होऊन एक तास स्पर्धा परीक्षांचे पुस्तक वाचून होते तरी सूर्य काही ‘ड’ जीवनसत्त्व वाटायला बाहेर पडत नाही. तोही आता आरामातच उगवत असेल म्हणा आणि उगवलाच तरी घराच्या दारं खिडक्यांचं तोंड उत्तरेकडे असल्याने त्याला बघायला घराबाहेरच जावे लागते ते आवर्जून टाळतो. या करोनाच्या दिवसांत लोक सुट्टीलाही कंटाळलेत. आता भरमसाट सुट्टी मिळाली म्हणून कंटाळून चहाच्या गाळणीची छिद्रे मोजू लागले, कोणी दुपारच्या भातात आई किती तांदळाचे दाणे टाकते हे मोजून डाळीत किती हे उद्या सांगतो, असे म्हणू लागले. उद्या सलून बंद म्हणून स्वत:च डोक्यावर ट्रिमर फिरवून घरभर केस पांगवून ते मोजून दाखवतील. इतके वैतागून किंवा असंयमी होऊन चालणार नाही. एमपीएससीचा विद्यार्थी या नात्याने आमच्या जमातींना ही संधीच असते. त्यामुळे दिवसभराच्या शांततेत अभ्यासाच्या डोंगरांचे अनेक ट्रेक दर दिवशी न थकता पार पाडतो; पण ट्रेक असो वा अभ्यास, कंटाळा येतोच म्हणून मग काही छंद जोपासलेले असतात त्यात अक्षरश: खोल शिरतो. खोल का.. ते कळेल. तर कुठलीही गोष्ट अनियंत्रितरीत्या मनात आणायची ज्याबद्दल शून्य माहिती आहे तिचा शोध घ्यायचा. उदा. गाडीत पेट्रोल टाकल्यावर नेमके असे होते काय की ती चालू लागते? बरं मग पेट्रोलच का? डिझेल का नाही? दोघांतील फरक काय? ते कसे तयार केले जातात? मग अचानक माहिती मिळवता मिळवता लक्षात येते की, ६५ डॉलर/बॅरल हा कच्च्या तेलाचा भाव उतरून २८ झाला आहे. इथपर्यंतची उत्तरे मिळाली की मग पुन्हा टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक इंजिनमधला फरक काय? बी.एस.४ आणि बी.एस.६ यांमधला इंजिन डिफरन्स काय? तेव्हा मग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांला ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगमध्ये शिरावे लागते आणि बऱ्याच कुतूहलात्मक गोष्टी पाहायला मिळतात. जसे की, पेट्रोल इंजिनमध्ये एअर फ्यूल मिक्श्चरसोबत निळी ज्वाला पेटते, तर डिझेल इंजिनमध्ये नारंगी ज्वाला पेट घेते. या सगळ्या गोष्टी यूटय़ूबवर पाहून अगदी कोणालाही चटकन समजतील. ते झाले की महेश काळे या प्रिय गायकाचे संगीत ऐकतो व त्यांच्या ऑनलाइन शिकवणीतून शास्त्रीय संगीत थोडे थोडे शिकण्या- समजण्याचा प्रयत्नही करतो.  मला वाटते, कोणतीही गोष्ट नुसतीच करमणूक म्हणून करण्यापेक्षा तिच्या असण्यामागची कहाणी व तिचे मूलभूत शास्त्र जाणून उमजून घेतले पाहिजे. असे के ल्यास तिचा आदरच के ला जातो, असे मला वाटते. म्हणजे आपण जे वाहन चालवतो ते नुसतेच न चालवता त्याचे इंजिन कसे काम करते याचा कुतूहलाने कधी तरी नीट बसून अभ्यास केला की त्या वाहन बनवणाऱ्या शास्त्रज्ञाला व त्याच्या आविष्काराला सन्मान दिला जातोय असे वाटेल.

दिवसातून काही वेळ नुसताच विचार करत बसण्यातही मजा असते. करोनाबद्दल बोलायचे झाल्यास विचार असाही येतो की, इतकी भीषण वेळ आलीच कशी? एक पेशी म्हणजे तुम्ही जिवंत आहात, दोन पेशी म्हणजे तुम्ही चालत आहात. कोणतीही पेशी किंवा जीव आपल्या सभोवतालचं वातावरण हे जगण्यालायक आहे असे त्याला वाटत नाही तोपर्यंत तो पुढे नवी पेशी निर्माण करीत नाही आणि जेव्हा त्याला वाटते की, वातावरण जगण्यालायक आहे तेव्हा तो नव्या पेशीला जन्म देऊन माहितीही पुढे संक्रमित करतो. मग त्या पेशी किंवा जीव सारख्याच पद्धतीने पुढे आणखी जीवांचे पुनरुत्पादन करत राहतात. प्रश्न असा पडतो की, या जगात करोनासारख्या विषाणूने हजारो बळी घेतलेले असताना, दरवर्षी होणाऱ्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीत (मी त्याला मानवनिर्मितच म्हणेल) हजारो मृत्यू होत असताना, दरवर्षी हजारो मुलींवर बलात्कार, दहशतवादी बॉम्बस्फोट होत असताना, हवेचे इंडिकेटर नेहमी धोकादायक हवा असेच दाखवत असताना खरेच तुम्हाला असे वाटते का, की सध्याचे वातावरण पुढे प्रजोत्पादन करण्यास अनुकूल आहे? नवीन जीव या पृथ्वीतलावर निर्माण करण्यास ही परिस्थिती अनुकूल आहे? जितकी लोकसंख्या वाढत जाणार तितकाच बेशिस्तपणा आणि तितकीच हिंसासुद्धा वाढतच जाणार आहे. त्यानंतर मग प्राचीन, मध्ययुगीन इतिहासातून देव आणि देवादी संकल्पनांच्या उदयावर विचार करणे अशा अनेक गोष्टींवर माहिती मिळवून त्यावर विवेकी विचार करून सदसद्विवेकबुद्धीची धार तीक्ष्ण करण्यात वेळ कसा सत्कर्मी लागतो हे कळतच नाही.

या दिवसांत नेहमीसारखे मित्रांना फोन करणे, समाजमाध्यमांवरील गप्पा, गाणी, चित्रपट हे न करता स्वत्वाचा शोध घेण्याचा, पुन्हा बुद्धांच्या विपश्यनेकडे जाण्याचा, संगीताचा शास्त्रीय अभ्यास, दर्जेदार वेबसीरिज, विचारमंथन या गोष्टी आपला वेळ फार सुंदर करून आपला सर्वागाने विकास करू शकतात.

परदेशात संचारबंदी अनुभवतोय

 कांतिलाल-मीरा चौधरी, किम्ब्ले, न्यूझीलंड

आम्ही उभयता न्यूझीलंडमध्ये धाकटा चिरंजीव राहुलकडे सुमारे साडेतीन महिन्यांपूर्वी आलो आहोत. आम्ही आलो त्या वेळेस करोनाची नुकतीच कुणकुण  लागली होती, तितके से गांभीर्य नव्हते. आम्ही पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे दि. २८ मार्च रोजी भारतात परतणार होतो, पण विमानसेवा बंद झाल्याने आणि परिस्थिती सुधारेपर्यंत थांबणे क्रमप्राप्त झाले आहे. दि. २६ मार्च २०२० रोजी न्यूझीलंड सरकारच्या आदेशाप्रमाणे अलर्ट लेव्हल ४ जाहीर झाली. आणीबाणी सुरू होऊन ‘स्टे अ‍ॅट होम’चा आदेश निघाला आहे. त्यानुसार देशातले सर्व नागरिक कसोशीने पालन करीत आहेत. मुले राहुल व सून अपर्णा घरीच सकाळी ७ वाजेपासून आपापल्या कॉम्प्युटरवर कामावर आहेत. शाळा बंद असल्यामुळे नात आणि नातू आरामशीर उठतात व दिवसभर आपापल्या लॅपटॉपवर रमतात,आम्ही वाचन, टीव्ही इ. करत घरातच वेळ घालवतो. लहानसा फे रफटका मारायला जाण्याची सूट आहे, पण ६ फुटांचे अंतर ठेवून.

करोनाने जगभर उच्छाद मांडला आहे, हे आपणा सर्वाना माहीत आहे. अजून काय काय होईल ते येणारा काळ ठरवील. भारतीय नागरिक म्हणून वाटते की, आपला देशही सकुशल, सुरक्षित असावा. आपले भविष्य आपल्याच हातात आहे. आपण स्वत:ला व परिवाराला बाहेर पडू देऊ नये, हाच आपल्यासाठी सोपा आणि स्वस्त इलाज ठरू शकतो.