ज्यांच्या गॅलरीत बराच काळ ऊन असते, ते तिथे फळभाज्या लावू शकतात. भारतात वांग्यांच्या सुमारे पाच हजार प्रजाती आहेत. बोराएवढय़ा आकारापासून किलोभर वजनापर्यंतची वांगी इथे मिळतात. विविध आकारांची आणि हिरव्या, जांभळ्या, पांढऱ्या रंगांची वांगी उपलब्ध असतात. नीट देखभाल केल्यास वांग्याचे झाड तीन वर्षे उत्पादन देते. दरवर्षी छाटणी करून आकार नीटनेटका ठेवल्यास छाटणीनंतर नवीन फुटींना चांगली फळे येतात. कुंडी लहान असल्यास झाड कुंडीतून अलगद काढून मुळांची व फांद्यांची छाटणी करून पुन्हा लावावे. लावण्यापूर्वी अख्खे झाड बुरशीनाशक द्रवणातून बुडवून काढावे आणि कुंडीत चांगल्या खतमिश्रित मातीत लावावे.

वांग्याचे रोप ३-४ आठवडय़ांचे झाल्यावर त्याची पुनर्लागवड करतात. हे करण्यापूर्वी झाड हळदीच्या पाण्यातून किंवा गोमूत्राच्या द्रवणातून बुडवून काढल्यास निरोगी राहते. ही द्रवणे बुरशीनाशकाचे काम करतात. पुनर्लागवड शक्यतो संध्याकाळी करावी. हलके पाणी द्यावे.

साधारण १५-२० दिवसांनी रोपाचा शेंडा खुडावा. त्यावर पाण्यात मिसळलेल्या हळदीचे, गोमूत्राचे किंवा हिंगाचे द्रावण लावावे. त्यामुळे रोपाला भरपूर फांद्या येतात.

उगवल्यापासून सुमारे अडीच महिन्यांत वांग्यांची पहिली तोडणी येते. यानंतर साधारण ४-५ दिवसांनी फळांची तोडणी होते.

वांग्याला लागणारी प्रमुख कीड म्हणजे शेंडा आणि फळ पोखरणारी अळी. पतंगांचा (मॉथ) एक प्रकार वांग्याच्या झाडावर अंडी घालतो. ही अंडी उबल्यावर त्यांची अळी बाहेर येऊन, शेंडा पोखरून गाभा खाते. त्यामुळे शेंडा सुकू लागतो. हिच्या नियंत्रणासाठी शेंडय़ाची फांदी दाबत दाबत मागे जावे. त्यामुळे आतली अळी मरते. दर आठवडय़ाला आंबट ताक, गोमूत्र आणि कच्चे दूध यांच्या द्रवणांची अलटून पालटून फवारणी करावी.