News Flash

पित्ताशयातील खडे

वैद्यकशास्त्रामध्ये पित्ताशयातील खडे हे स्थूलता असलेल्या चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात असे मांडलेले आहे.

राहा फिट  : डॉ. अविनाश सुपे

वैद्यकशास्त्रामध्ये पित्ताशयातील खडे हे स्थूलता असलेल्या चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात असे मांडलेले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण सहापटींनी जास्त असते. पाश्चात्त्य देशांत व उत्तर भारतामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. लठ्ठपणा, प्रमाणापेक्षा अधिक तूपजन्य आणि तेलकट पदार्थ खाणे, आहारात तंतूमय पदार्थाचा समावेश नसणे, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभाव, वारंवार फास्ट  फूड किंवा जंक फूडचे सेवन या सर्व गोष्टी पित्ताशयात खडे तयार होण्यासाठी मदत करतात. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दशकांत भारतातही या आजाराचे प्रमाण वाढत आहे. हल्ली खडे सर्व वयांच्या पुरुषांमध्ये तसेच स्त्रियांमध्ये आणि अगदी लहान मुलांमध्येही आढळतात.आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण (ऑइली फूड) वाढले किंवा तंतूमय पदार्थाचे (फायबर) प्रमाण कमी झाले तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात. हे खडे तीन प्रकारचे असतात १. कोलेस्टेरोल २. पिगमेंट (बिलीरुबीनचे घटक) ३. मिश्र.   ७० ते ८० टक्के रुग्णांमध्ये ते मिश्र प्रकारचे असतात. अगदी लहान खडे पित्तनलिकेवाटे पित्तरसाबरोबर लहान आतडय़ात निघून जातात; पण जर त्यांचा आकार मोठा असेल तर ते पित्ताशयाच्या व पित्तनलिकेच्या अरुंद ठिकाणी अडकून राहतात आणि पित्ताशयाला सूज येऊन जंतूचा प्रादुर्भाव होतो.

लक्षणे

सुरुवातीची लक्षणे आम्लपित्ताच्या (अ‍ॅसिडिटी) त्रासासारखीच असतात. पोटाच्या वरच्या भागात थोडेसे उजवीकडे दुखायला लागते. गॅस होतो. मळमळ सुटते, जळजळ होऊ  लागते, त्याबरोबरच एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतडय़ात नेणारा मार्ग अरुंद होतो आणि पित्तरस यकृतात (लिव्हर) साचू लागतो. त्यातील बिलीरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळतात आणि काविळीची लक्षणे दिसू लागतात. याला अवरोधक कावीळ (ऑब्स्ट्रक्टिव्ह) असे म्हणतात. पित्तखडय़ांमुळे होणाऱ्या काविळीबरोबर अंगाला खाज सुटते.  पित्ताशयातील खडय़ांमुळे स्वादुपिंड दाहही होऊ  शकतो.

पित्ताशयातील खडय़ांचे निदान

सोनोग्राफी, काही  विशिष्ट रक्त तपासणी व एन्डोस्कोपी करून पित्ताशयातील दोष, अडकलेले खडे, पित्तनलिकेचा आजार यांचे निदान करणे शक्य आहे.

उपाय

पित्ताशयाच्या खडय़ामुळे त्रास होत असेल आणि कावीळ नसेल तर शस्त्रक्रिया करून हे खराब झालेले पित्ताशय व खडे काढून टाकता येते. ही शस्त्रक्रिया सोपी असून पचनास लागणारा पित्तरस सरळ लहान आतडय़ात नियमित प्रमाणात येत राहतो. त्यामुळे रुग्णास त्रास होत नाही. पित्ताशयाच्या खडय़ामुळे कावीळ असेल तर दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडे काढले जातात आणि एक प्लास्टिकची नळी (स्टेंट) पित्तनलिकेत टाकून कावीळ कमी होते. पुन्हा होऊ  नये म्हणून दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे उचित. काही रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लागते ज्यामध्ये पित्तनलिका ही लहान आतडय़ास जोडली जाते.

खडे टाळण्यासाठी काय करावे?

जेवणात तेल-तुपाचा वापर योग्य प्रमाणात. पनीर, खोबरे व शेंगदाण्याचा वापरही माफक. तळलेले पदार्थ, फास्ट फूडचे सेवन टाळावे. रोज कोशिंबीर वा सॅलड घ्यावे. चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळे अशी फळे आवर्जून खावीत. रोज नियमित व्यायाम. एक तास तरी रोज चालावे. पित्ताशयातील खडे विरघळण्याची काही औषधे उपलब्ध असली तरी बरीच खर्चीक असतात व खडे विरघळण्याचे प्रमाण अनिश्चित असते. दुसरा धोका म्हणजे या अवधीत एखादा खडा अडकून काही दुष्परिणाम होणार नाहीत हे सांगणे अवघड आहे.

त्रास न होणारे खडे

पित्ताशयातील खडे असणाऱ्या ७०-८० टक्के रुग्णांना त्याचा त्रास होत नाही. त्यातले काही सोनोग्राफीमध्ये दिसतात. अशा खडय़ांना सायलेंट खडे म्हणतात. जर खडय़ांचा काही त्रास नसेल, ते लहान असतील व पित्ताशय जाड झाले नसेल तर असे खडे काढणे आवश्यक नसते. त्यावर फक्त लक्ष ठेवावे व डॉक्टरांच्या सल्लय़ानेच उपचार करावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 1:37 am

Web Title: gallstones akp 94
Next Stories
1 मारुती कारच्या किंमतीही कमी!
2 बाजारात नवे काय?
3 जलपरी
Just Now!
X