अभिषेक मुठाळ

कालपरवापर्यंत संगणक किंवा मोबाइल स्क्रीनच्या चार बाजूंमध्ये बंदिस्त असलेला खेळ पोकेमॉन, पबजीच्या निमित्ताने बाहेर आला. या खेळांनी आपल्या मनाचा इतका ताबा घेतला आहे की फेसबुक, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्याही गेमिंगविश्वाला गांभीर्याने घेऊ  लागल्या आहेत. या कंपन्या मोठमोठय़ा बोली लावून गेमिंग कंपन्या ताब्यात घेत आहेत. गेमिंगची ही अनोखी दुनिया पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) संकुलात १४ ते १६ डिसेंबर दरम्यान रंगणाऱ्या टेकफेस्ट या तंत्र महोत्सवात उलगडणार आहे. गेमिंग समिट (ई-क्रीडा शिखर परिषद) हे यंदाच्या टेकफेस्टचे आकर्षण आहे. त्या निमित्ताने..

स्क्रीनवरील गेमिंगची सुरुवात १९७२ मध्ये मॅग्नावोक्स ओडेसी या लहानशा घरातूनच चालवल्या जाणाऱ्या कंपनीने केली. एका डब्यासारखे दिसणाऱ्या चौकोनी यंत्रावर खेळ खेळला गेला. त्याचे डिझाइन राल्फ बेअर याने बनवले होते. यात सीपीयू नव्हता. सुरुवातीला खेळ हार्डवेअरवर चाले. खेळ बदलायचा असल्यास वेगवेगळे हार्डवेअर बदलावे लागे. त्या चीपच्या मदतीने मग आपण कधी कॉन्ट्रा, मारिओ, डक, टेनिस खेळत असू. हा ट्रेण्ड साधारणपणे भारतात २००५-०६ पर्यंत होता. याला मग ग्राफिक्स कार्डची जोड मिळाली आणि हाच खेळ आपण संगणकावर खेळायला लागलो. आता याला सीपीयू आणि सीडीची जोड मिळाली होती. नंतर मोबाइलवर खेळ आला. पण खेळाचा दर्जा सुधारू लागला होता. टीव्हीच्या स्क्रीनवर चालणारा खेळ आता संगणकावर आणि मोबाइलला आल्याने लोक त्याच्या आहारी जाऊ  लागले होते. त्यात सोनीने आणलेल्या प्ले स्टेशन (पीएस) फोरवर चालणाऱ्या खेळांचा दर्जा काही वेगळाच होता. त्यांच्या स्मॅकडाऊन, नीड फॉर स्पीड, स्पायडरमॅन, जीटीए वाइस सिटी, क्रिकेट इत्यादी या खेळांनी भारतात धुमाकूळ माजवला होता.

खेळाच्या हार्डवेअरसोबतच त्याच्या सॉफ्टवेअरमध्येही बदल होत गेले. आपण नकळत यात गुंतत होतो. आता ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ने सगळ्या जगाचं लक्ष ओढलं गेलं आहे. खेळाला याचा आधार मिळाला आणि मग यात ब्लू व्हेल, पोकेमॉन गोसारख्या खेळांचा प्रवेश झाला. यात सुरक्षिततेचा विषय आला. ‘ब्लू व्हेल’ या खेळाने तरुण मुलांचा बळी घ्यायला सुरुवात केल्यानंतर तो जगभर बंद करण्यात आला. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संकल्पनेवर आधारलेल्या या खेळांनी आपल्या मनाचा ताबा घ्यायला सुरुवात केली होती. वरवर पाहता खेळ तंत्रज्ञानावर आधारलेला दिसतो. पण त्याहीपेक्षा तो विकसित करण्यामागे खेळणाऱ्याच्या मानसिकतेचाही सखोल अभ्यास असतो. खेळ मानसिकतेशी जोडले गेल्याने त्याचे दुष्पपरिणामही दिसून येतात. सतत खेळात मग्न राहिल्याने एकलकोंडेपणा येणे, कामावरचे मन उडणे, असे प्रश्न तरुणांनाच नव्हे तर गृहिणी, नोकरदार, मध्यमवयीनांनाही सतावत आहेत. हाच विचार गेमिंग समिटच्या निमित्ताने सर्वसामान्यांना समजून घेता येणार आहे. आभासी वास्तवातून (व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी) एक वेगळीच दुनिया आपल्यासमोर उभी केली जाते. हे तंत्र आपल्यासमोर येणाऱ्या टेकफेस्टच्या माध्यमातून उलगडणार आहे.

सध्या फेसबुक, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्याही गेमिंगला गांभीर्याने घेऊ  लागल्या आहेत. येत्या काळात फेसबुक, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या टेक-टू इंटरअ‍ॅक्टिव्ह, निनटेण्डो, अ‍ॅक्टीव्हिजन ब्लिझाडसारख्या कंपन्यांचा ताबा घेणार आहेत. त्यात खेळाबरोबरच तो बनवणाऱ्या गेमरचा ताबाही या कंपन्यांकडे असेल. टेकफेस्टच्या निमित्ताने ही घुसळवणूक समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना आणि तंत्रस्नेहींना मिळेल.