|| आशुतोष बापट

गणेशोत्सवामुळे अनेक शाळांना सुट्टी आहे. शिवाय विसर्जनाच्या निमित्ताने नोकरदारांनाही सुट्टी मिळतेच. घरोघरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली असल्यामुळे धार्मिक स्थळांवरील गर्दी माफकच आहे. हीच संधी साधून आपल्या शहराच्या आसपासची कोणती गणेश मंदिरे आणि त्या अनुषंगाने परिसरातील अन्य पर्यटनस्थळे पाहता येतील, हे जाणून घेऊ या..

प्रचंड कोसळणारा पाऊस काहीसा कमी झालाय. उत्साहाचा आणि आनंदाचा गणेशोत्सव मोठय़ा धामधुमीत साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त मिळणाऱ्या सुट्टीची संधी साधून दोन दिवस बाहेर पडून काही निराळ्या गणपतींचं दर्शन घेता येऊ शकतं. तसं पाहायला गेलं तर गावोगावी गणेशाची निरनिराळी रूपं पाहायला मिळतातच. पण गणेश दर्शन आणि त्याच्या जोडीला आजूबाजूची काही ठिकाणं पाहता आली तर अतिशय उत्तम. त्या उद्देशाने बाहेर पडून हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटण्याची संधी अजिबात दवडू नये.

निद्रिस्त गणेश, आव्हाणे

निद्रिस्त हनुमानाची मंदिरे आपल्याला खुलताबाद, लोणार इथे पाहायला मिळतात. पण निद्रिस्त गणेशाचे मंदिर फारसे कुठे पाहायला मिळत नाही. त्यामुळे नगर जिल्ह्य़ातील निद्रिस्त गणेश खास ठरतो. हे मंदिर तिसगावपासून अंदाजे १५ कि.मी. अंतरावर असलेल्या आव्हाणे या गावात आहे. मुख्य रस्त्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्यावर एक सुंदर कमान बांधलेली दिसते. आव्हाणे गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ कुठल्याशा वस्तूला लागून अडला. पाहतात तो काय एक स्वयंभू गणेशाची मूर्ती जमिनीत होती. ती मूर्ती म्हणजेच हा निद्रिस्त गणेश होय. मूर्तीच्या छातीवर नांगराच्या फाळाची खूण अजूनही दिसते. प्रशस्त मंदिराच्या गाभाऱ्यात जमिनीखाली दोन फुटांवर स्वयंभू गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात एका कोनाडय़ात ज्या गणेशाच्या मूर्ती आहेत त्या दादोबा देव आणि त्यांचा मुलगा गणोबा देव यांच्याच आहेत असे सांगितले जाते. पूजेसाठी मात्र फक्त निद्रिस्त गणेशाचीच मूर्ती ठेवण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधून दिले. तसेच दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या. त्यामुळे त्यांची नावे जहागीरदार भालेराव अशी पडली. या गणेशाचे दर्शन घेतले की जवळच असलेल्या कानिफनाथांच्या मढीला भेट देता येईल, तसेच तिसगाव नगर रस्त्यावर असलेल्या वृद्धेश्वर देवस्थानाचे दर्शनही अवश्य घ्यावे. तिथून पुढे पैठणच्या दिशेने गेल्यास घोटण इथल्या महादेवाचे यादवकालीन सुंदर मंदिर आणि तिथे असलेले पातळलिंग पाहता येते. ही ठिकाणे चुकवू नयेत.

भोरगिरीचा गणपती

भोरगिरी-भीमाशंकर या पदभ्रमण मार्गावरचे सुरुवातीचे गाव आहे भोरगिरी. राजगुरुनगरहून वाडा, टोकावडे मार्गे जाणारा रस्ता भोरगिरी गावाशी संपतो. हे अगदी छोटं टुमदार गाव आहे. पुण्यापासून जेमतेम ८० किमी अंतरावर ते आहे. गावामागे भोरगिरीचा किल्ला उभा आहे. किल्ल्याच्या पोटात गुहा खोदलेल्या आहेत. इथे भीमेच्या काठावर कोटेश्वर मंदिर आहे. कोटेश्वर मंदिरात शिवपिंडी तर आहेच पण गाभाऱ्याच्या बाहेर एक गणपतीचे वैशिष्टय़पूर्ण शिल्प आहे. जेमतेम दीड फूट उंची असलेल्या गणेशाची वेशभूषा आकर्षक आहे. मुलींच्या स्कर्टप्रमाणे या मूर्तीच्या पोषाखाची रचना असल्याचे दिसते. ही वेशभूषा पाश्चात्त्य धाटणीची वाटते.

तुंदिलतनू असलेला हा गणेश उभा आहे. तो चतुर्भुज असून त्याच्या वरच्या उजव्या हातामध्ये परशू दिसतो. तर वरच्या डाव्या हातामध्ये बहुधा एखादे फळ असावे, कारण गणपतीची सोंड त्या फळावर टेकलेली आहे. ही छोटेखानी गणेशमूर्ती तिच्या आगळ्यावेगळ्या वस्त्रांमुळे निश्चितच आकर्षक ठरते. भोरगिरी ते भीमाशंकर हे फक्त ६ किमीचे अंतर आहे. तो एक सुंदर ट्रेक आहे. डोंगरधारेजावळून रमतगमत करता येणारा. या संपूर्ण ट्रेक मार्गावर असंख्य धबधबे आणि अनेक रानफुले सर्वत्र पाहायला मिळतात. तसेच परत येताना चासकमान इथले पेशवेकालीन सोमेश्वर मंदिर आणि त्यात  असलेली भव्य दीपमाळ बघता येईल.

लिंबागणेश

मराठवाडय़ातील ६७ गणेशस्थानांपैकी एक असलेले स्थान म्हणजे लिंबागणेश. इ.स. १३३० ते १४८० या काळात तिथे बहमनी राजवटीचे राज्य होते. पुढे अहमदनगरची निजामशाही, त्यानंतर मुघल आणि नंतर मराठय़ांचे आधिपत्य होते. इ.स. १७२९ मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मुघलांचा पराभव करून हा भाग मराठी साम्राज्यात विलीन करून घेतला. रंगनाथराव कानिटकर हे इथले मराठी राज्याचे पहिले महसूल अधिकारी होते. प्रत्यक्ष चंद्रदेवतेने स्थापन केलेला गणपती म्हणून हा श्रीभालचंद्र. नगर बीड रस्त्यावरील मांजरसुंभा या गावापासून अवघे ११ कि.मी.वर हे देवस्थान आहे. जवळजवळ २ फूट उंचीची शेंदूरचर्चित गणेशाची स्वयंभू मूर्ती मंदिरात स्थापन केलेली आहे. मोरया गोसावी या स्थानाचे वर्णन करताना म्हणतात की, चंद्रपुष्करणी तीर्थ मारुती सन्निध महानुभावपंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामींनी या स्थानाला भेट दिल्याचे उल्लेख आहेत. प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांचे हे कुलदैवत असल्याचे सांगितले जाते. या पूर्वाभिमुख देवस्थानाचा जीर्णोद्धार इ.स. १९३० मध्ये श्री भवानीदास भुसारी यांनी केल्याचा शिलालेख प्रवेशद्वारावर आहे. दगडी कासव, होमकुंड, प्रदक्षिणा मार्ग, मोठी दीपमाळ, नगारखाना असे सर्व असलेला हा सुंदर परिसर आहे. मंदिराचा प्राकार फरसबंदी असून तो भक्कम तटबंदीने संरक्षित केलेला आहे. जवळच दगडी बांधणीची एक पुष्करणी असून तिला चंद्रपुष्करणी असे म्हणतात. मांजरसुंबा इथला धबधबा तसेच पुढे गेल्यावर अंबाजोगाई आणि परळीवैजनाथ ही ठिकाणे पाहायला जाताना या लिंबागणेशाचे दर्शन अवश्य घ्यावे.-ashutosh.treks@gmail.com