गणेशोत्सवात आनंद-उत्साहाचा तोटा नसतो. गणरायासाठी मोठी आरास. फुलांची सजावट आणि आरत्या म्हणताना लागलेली तंद्री. हा सारा जल्लोष संचारलेला असताना गणेशोत्सवात प्रदूषण होणार नाही, याचे भानही तरुण-तरुणींमध्ये वाढत चालले आहे. कोणाला त्रास होऊ न देता गणरायाच्या सेवेत अनेक जण तल्लीन झाले आहेत. घरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास सध्या अनेक तरुण प्राधान्य देत आहेत. त्याविषयी..

वाढत्या समाजमाध्यम जागृतीच्या काळात निसर्गाला हानीकारक असणाऱ्या विविध गोष्टी या विस्तृतपणे समाजाध्यमांवर प्रसारित होत आहेत. समाजमाध्यम वापरकर्तेदेखील अशा माहितीला गांभीर्याने घेत त्या दृष्टीने अनेकदा आचरण करत असल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक सण समारंभात होणारे प्रदूषण लक्षात घेता हे सण पर्यावरणपूरक पद्धतीने कसे साजरे केले जातील याचा आजची तरुण पिढी विचार करत आहे. तसेच त्या दिशेने प्रयत्नदेखील करत आहे. सध्या गणेशोत्सवाचे वातावरण सर्वत्र असून अनेक तरुणांनी त्यांचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरकतेला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. गणेशोत्सवात मूर्तीसाठी तसेच देखावे-सजावटींसाठी वापरले जाणारे प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल आणि प्लास्टिक यांचे पाण्यात विघटन होत नाही. परिणामी नदीच्या पात्रात, समुद्रात याचा कचरा जमा होतो. गणेशोत्सव संपल्यावर समुद्रकिनारी गणपतीच्या मूर्तीचा खच पडलेला दिसून येतो. यामुळे केवळ जलप्रदूषणच नव्हे तर संपूर्ण जैवसृष्टीची हानी होते. गेल्या अनेक वर्षांपासून याविषयी होत असलेल्या जागृतीमुळे अनेकजणांकडून पर्यावरणपूरक ठरणाऱ्या, नैसर्गिक आणि विघटनशील वस्तूंचा वापर मूर्तीसाठी तसेच देखावे-सजावटींसाठी केला जात आहे.

ठाण्याचा देवेषु ठाणेकर हा तरुण दरवर्षी गौरीपूजनासाठी तेरडय़ाच्या पानावर गौर रेखाटतो. तसेच तो अनेक वर्षे मूर्तिकार अमित सोनावणे यांनी नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेली गणेशमूर्ती घरी आणतो. पर्यावरणपूरक देखाव्यांतून सामाजिक समस्या मांडण्याचा त्याचा प्रयत्न असतो. गेल्या वर्षी त्याने कागद-पुठ्ठय़ांद्वारे मूळाक्षरांच्या माध्यमातून देखावा करून मराठी भाषेचे महत्त्व सांगितले होते. कोल्हापूर-सांगलीच्या पूरस्थितीवर भाष्य करणारा देखावा यंदा देवेषु याने सादर केला आहे. एकदा गणेशोत्सव झाल्यावर समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेल्यावर त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीचा खच पडलेला दिसून आला. त्यातूनच घरी शाडूची मूर्ती आणि सजावटीसाठी नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्याचे ठरवले असे देवेषुने सांगितले.

गणेशोत्सवात होणारे प्रदूषण लक्षात घेऊन अनेक लोक कागद, शाडूची माती याचा उपयोग मूर्ती तयार करण्यासाठी करत आहेत. तर कागद, पाने, फुले, कापड, भाज्यांपासूून बनवलेल्या रंगांचा वापर सजावट आणि मखर तयार करण्यासाठी केला जात आहे. तसेच गणपतीच्या मूर्तीचे घरच्या घरी विसर्जन करण्याचे प्रमाण वाढले आहे. मातीची, शाडूच्या मातीची आणि कागदाची मूर्ती विरघळण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागतो. मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळल्यावर ते पाणी झाडांना घालण्यात येते. पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक या शहरांत अनेक समाजसेवी संस्था पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देत आहेत. विविध शाळा आणि महाविद्यालयांतूनही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

 

निसर्गाशी बांधिलकी जपतो

व्यवसायाने मूर्तिकार असलेले अमित सोनावणे अनेक वर्षांपासून गणपतीच्या मूर्ती तयार करत आहेत. जतन शिल्प (प्रेझेन्स स्कल्प्चर) या संकल्पनेवर आधारित असलेल्या त्यांच्या मूर्ती कागदी लगदा, नैसर्गिक वनस्पती यांपासून तयार केल्या जातात. डिंक, क डुनिंब, आणि हळकुंड या पदार्थाचा वापर करून अमित मूर्ती साकारतो. तसेच मूर्ती घडवताना कोणत्याही साच्याचा उपयोग केला जात नाही. निसर्ग हाच देव हे तत्त्व मानून अनेक वर्षे नैसर्गिक गोष्टींपासून बाप्पाची मूर्ती साकारत आहे, या मूर्ती पाण्यात पंधरा ते वीस मिनिटांमध्ये विरघळतात. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही आणि पर्यावरणाला हानी पोहोचत नाही असे अमितने सांगितले.

– अमित सोनावणे, शिल्पकार

टाकाऊपासून टिकाऊ सजावट

रश्मी घुले यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो. अनेक वर्षांपासून त्या टाकाऊपासून टिकाऊ सजावट करत आहेत. ही संकल्पना वडिलांच्या प्रेरणेने सुचल्याचे त्या सांगतात. सजावटीच्या साहित्यासाठी पुठ्ठा, कार्डबोर्ड, वॉटर कलर आणि गेरू यांचा उपयोग केला जात असून प्रदूषण करणाऱ्या प्लास्टिक आणि थर्माकोल यांचा वापर कटाक्षाने टाळला जात असल्याचे रश्मी यांनी सांगितले. निसर्ग हा आपला सर्वप्रथम देव आहे. निसर्गाचे संवर्धन आणि काळजी घेणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. गणपतीची मूर्ती स्थापन करून पूजा करतात त्याप्रमाणे निसर्गाची पूजा करणे गरजेचे आहे. मातीच्या मूर्तीची पूजा करणे आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ सजावट करणे ही एक प्रकारे निसर्गाची पूजा आहे, असे मत रश्मी घुले यांनी व्यक्त केले.

– रश्मी घुले

पूरग्रस्त भागातील देखावा

नरेंद्र घनकरघरे गणेशोत्सवात सामाजिक समस्यांवर आधरित देखाव्यांची आरास करतात. या वर्षी सांगली, सातारा आणि कोल्हापूर पूरग्रस्त भागांतील परिस्थिती नरेंद्र यांनी सजावटीत दाखवली आहे. अतिवृष्टीमुळे झालेले पश्चिम महाराष्ट्राचे नुकसान आणि या परिस्थितीत जगण्याची नवी आशा देणारा ‘माणूस’ या विषयावर आधारित त्यांनी देखावा तयार केला आहे. तेथील भागात पाणी साचल्याने आर्थिक आणि जीवितहानी झाली. यामध्ये सरकारी यंत्रणांनी आणि माणसांनी माणुसकीचे दर्शन घडवत मुक्या जनावरांना वाचवले याचे चित्र त्यांनी सजावटीत साकारले आहे. पुठ्ठा, कागद आणि नैसर्गिक रंग वापरून त्यांनी सजावट केली आहे. तसेच शाडूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना घरी केली जात असून त्याविषयी इतरांनाही प्रोत्साहित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

– नरेंद्र घनकरघरे

सजावटीचे सामान शाळेला देतो

बदलापूर येथे राहणारा मंदार महागावकर हा  २७ वर्षांपासून सामाजिक समस्या आणि पर्यावरणाला अनुसरून गणपतीचे देखावे आणि सजावट करत आहेत. या वर्षी त्यांनी वसुंधरेचे शिल्प साकारले असून त्यात पर्यावरणाविषयी जनजागृतीचा संदेश दिला आहे. शाडूच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत असल्याचे त्याने सांगितले. सर्व गोष्टी या विघटनशील असण्याकडे भर दिल्याचे तो सांगतो. गणेशत्सवात वापरली जाणारे फुले, पाने हे निर्माल्यात न टाकता त्यांचा वापर खत तयार करण्यासाठी केला जातो. सजावटीसाठी वापरलेल्या वस्तू शाळेत देतो. विद्यार्थ्यांना सजावट कशी करायची हे शिकता यावे हा यामागील उद्देश असल्याचे मंदारने सांगितले.– मंदार महागावकर 

संकलन : शामल भंडारे