16 October 2019

News Flash

फुलांच्या राज्यात

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स किंवा पुष्पदरीला जाण्यासाठी दिल्ली-ऋषिकेश-जोशीमठमार्गे गोविंदघाटला (५९९५ फूट) यावे लागते.

(संग्रहित छायाचित्र)

आशुतोष बापट

एप्रिलपासून बर्फ वितळू लागतं. जूनपासून उबदार वातावरण आणि हलकासा पाऊस होतो. मग गढवालमधली व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हिरवी शाल पांघरून बसते आणि त्या शालीवर नाना रंगांची फुलं फुलून एक देखणा कशिदा तयार होतो. सप्टेंबपर्यंत हा परिसर अशा असंख्य फुलांनी फुललेला असतो.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स किंवा पुष्पदरीला जाण्यासाठी दिल्ली-ऋषिकेश-जोशीमठमार्गे गोविंदघाटला (५९९५ फूट) यावे लागते. अलकनंदा आणि लक्ष्मणगंगा यांच्या संगमावर असलेल्या या ठिकाणाचे नाव लक्ष्मणप्रयाग होते. शिखांचे दहावे गुरू श्री गोविंदसिंह यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले त्यामुळे या जागेला गोविंदघाट म्हटले जाऊ लागले. इथे गुरू गोविंदसिंहांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक गुरुद्वारा बांधलेला आहे. गोविंदघाटपासून पुढचा प्रवास पायी आहे. वाटेत ३ कि.मी.वर पुलना आणि त्यापुढे सात कि.मी. वर भ्युंदर (७३४३ फूट) ही छोटी गावे आहेत. भ्युंदरला काकभृशुंडीगंगा आणि लक्ष्मणगंगेचा संगम आहे. भ्युंदरच्या पुढे पाच कि.मी. वर घांगरिया (९९९७ फूट) येते. गोविंदघाट हे महाहिमाल रांगेत आहेत तर घांगरिया येते झांस्कर रांगेत. घांगरियाला मुक्कामाच्या सोयी आहेत. घांघरिया इथेसुद्धा गुरुद्वारा आहे. इथून दोन रस्ते जातात. एक रस्ता व्हॅली ऑफ फ्लॉवर्सकडे तर दुसरा रस्ता हेमकुंडकडे जातो.

वाटेत असलेल्या प्रवेश चौकीत शुल्क भरल्यावर पुष्पदरीतून येणाऱ्या पुष्पगंगेच्या काठाकाठाने आपण चालत राहिलो की समोर १० कि.मी. लांब आणि ३ कि.मी. रुंद पसरलेल्या दरीत जागोजागी असंख्य फुलं फुललेली दिसतात. हा सगळा भाग व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून ओळखला जातो. या सगळ्या प्रदेशाला रातबन, हाथी पर्वत, निलगिरी पर्वत, गौरी पर्वत, खिलीया घाटी अशा पर्वतांचा गराडा पडलेला आहे. १९८८ साली याप्रदेशाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. हिरव्या पार्श्वभूमीवर निळे जांभळे लाल केशरी पांढरे पिवळे गुलाबी अशा रंगांचे नैसर्गिक वाफे तयार होतात. या फुलांभोवती मधमाशांचा गुंजारव सुरू होतो, वाइल्ड मेरीगोल्ड मोठय़ा डौलाने डोलत असतात. गुलाबी रंगांचे आणि एकेरी पाकळ्यांचे गुलाब इथे दिसतात. मध्येच तेरडय़ाने आपले डोके वर काढलेले दिसते. फुलांच्या रंगांची उधळण करायला इथे येतात बेगोनियाज, जरबेराज, डॅफोडिल्स, कॉर्नफ्लॉवर्स, ग्लॅडीओलस आणि असे असंख्य. खरोखर आपले देहभान हरपून जाते. थुम्मा, हाथजारी, रुद्रवंतीजारी, दीपजारी अशा औषधी वनस्पतीसुद्धा इथे दिसतात. दीपजारीचा उल्लेख कालिदासाने कुमारसंभवात केला आहे. इथे काय पाहू आणि किती पाहू असं होऊन जातं. खरंतर इथे आठ दिवस तरी राहायला हवं, पण ते शक्य नसतं म्हणून दोन दिवस तरी पुष्पदरीसाठी ठेवायला हवेत.

१९३१ साली २५,४४७ फूट उंचीच्या कामेत शिखरावर जाण्यासाठी ब्रिटिश तुकडी प्रयत्नशील होती. परतीच्या प्रवासात त्यांचा मार्ग चुकला, आणि पाऊस व धुक्यामुळे ते एका दरीत शिरले. उघडीप मिळाल्यावर जो काही अफाट फुलांचा नजारा त्यांच्यासमोर होता त्यामुळे ते थक्क झाले. फ्रँक स्माइद याने याबद्दल विपुल लिखाण केले. खरेतर स्थानिक तोल्छा भुतिया जमातीच्या लोकांना या पुष्पदरीची माहिती होतीच. पुढे १९३८ जोन मार्गारेट लेग्गी ही फ्रँक स्माइदचे पुस्तक वाचून इथे आली. नंदासिंग चौहान या वाटाडय़ाला घेऊन ती इथे फिरली. इथली पुष्पश्रीमंती पाहू ती वेडी झाली. तहानभूक विसरून ती चार दिवस अभ्यास करत होती. पाचव्या दिवशी ती एका निसरडय़ा चढावरून पाय घसरून पडली आणि तिचा याच पुष्पदरीत अंत झाला. १९४१ साली तिचा स्मारकचौथरा तिच्या बहिणीच्या हस्ते बसवला गेला.

हिमालयात चालायची सवय असेल तर घांगरियावरून सहा कि.मी.वर असलेल्या लक्ष्मणकुंड किंवा हेमकुंडसाहिबला (१४,१९९ फूट) जावे. शिखांचे हे पवित्र ठिकाण. याबद्दल पण निरनिराळ्या कथा प्रचलित आहेत. लोकपाल सरोवराजवळ लक्ष्मण मंदिर आहे. बाजूलाच गुरुद्वारा आहे. वाटेत ब्रह्मकमळाची अनेक फुले दिसतात. त्यांचा वास उग्र असून त्यामुळे डोके दुखू शकते. हेमकुंडसाहिबला गरमागरम चहा आणि मुगाच्या डाळीची अप्रतिम खिचडी मिळते.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्सशी लोककथादेखील जोडल्या आहेत. द्रौपदीने अलकनंदा आणि लक्ष्मणगंगेच्या संगमावर प्रवाहात सुरंगी ब्रह्मकमळाचे फूल पाहिले. त्याच्या शोधात भीम पुष्पगंगेच्या किनाऱ्याने दरीत शिरला. तेथे पुष्पसमुद्रातच त्याला ब्रह्मकमळांचा ताटवा दिसला अशी कथा सांगितली जाते. हा सगळाच परिसर भटक्यांचे नंदनवन आहे. औली, बद्रीनाथ, माना, वसुधारा धबधबा या सगळ्या गोष्टी एकाच भेटीत बघता येतात.

पूर्वतयारी

हल्ली या भागात होणाऱ्या भूस्खलनामुळे किमान दोन दिवस जास्तीचे ठेवून या प्रदेशात यावे. चांगले शूज, सॅक सोबत असायला हवी. हा परिसर सुमारे १० हजार फूट उंचीवर असल्यामुळे येथील वातावरणाशी जुळवून घ्यायला पुरेसा अवधी घ्यावा. पाऊस असल्याने पोंचो किंवा रेनकोट, तसेच उबदार कपडे सोबत ठेवावेत. या भागाची दुर्गमता लक्षात घेता जास्तीचे मेमरी कार्ड आणि बॅटरीज सोबत बाळगावी. सप्टेंबरमध्ये इकडे जायचे असेल तरी तयारी आतापासूनच करायला हवी. मनसोक्त भटकावे आणि इथल्या फुलांच्या रंगांची रंगपंचमी मनसोक्त अनुभवावी. आपला वावर संयमित आणि नियंत्रित ठेवावा. हजारो वर्षांच्या या खजिन्याला आपल्यामुळे धक्का लागणार नाही याची खबरदारी मात्र घेतलीच पाहिजे.

ashutosh.treks@gmail.com

First Published on June 14, 2019 12:20 am

Web Title: garhwal flowering state