19 November 2019

News Flash

राहा फिट : आम्लपित्तावरील उपाय व उपचार

भूक कमी होते, संसर्ग होतो, तसेच काही प्रकारच्या गाठीही होण्याची शक्यता असते.

डॉ. अविनाश सुपे

टीव्ही, वर्तमानपत्रे किंवा इतर ठिकाणी दोन चमचे औषध घेतल्याने आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी) दूर पळते, असा प्रचार केला जातो. अँटासिडचे सिरप व गोळ्या ही औषधे पोटाच्या म्हणजे जठराच्या अंत:त्वचेवर पसरतात आणि अ‍ॅसिडमुळे होणारा पोटाचा दाह (जळजळ) कमी करतात; परंतु याचा परिणाम तात्पुरता असतो.

गेल्या काही दशकांत अ‍ॅसिड कमी करण्यासाठी परिणामकारक अशा गोळ्या/ इंजेक्शन्स उपलब्ध आहेत. या गोळ्या पोटात अ‍ॅसिड तयार होण्याची क्रिया कमी करतात. त्यामुळे अ‍ॅसिडिटीला आराम पडतो. (रँटिडाइन, ओमेप्राझोल, रॅबेप्राझोल इत्यादी औषधे) यातील काही औषधे महाग असतात. एकदा आराम पडल्यानंतर ही औषधे चार ते सहा आठवडय़ांनंतर बंद करावीत. बरेच जण ही औषधे कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय दुकानातून घेतात आणि अयोग्य वेळी व त्रास होईल तसे त्यांचे सेवन करतात. यामुळे तात्पुरता त्रास कमी झाला असला तरी भविष्यात अ‍ॅसिडिटीचा जास्त त्रास वाढण्याचा संभव असतो. जास्त काळ ही औषधे घेतल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात. भूक कमी होते, संसर्ग होतो, तसेच काही प्रकारच्या गाठीही होण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात.

आम्लपित्त कमी करण्यासाठी..

* मानसिक ताण कमी करणारी औषधे – जर अ‍ॅसिडिटी होण्याचे कारण ताणतणाव असेल तर ही औषधे वापरल्याने अ‍ॅसिडिटीचे प्रमाण कमी होते.

*  जीवनपद्धतीत बदल करणे – अतिआंबट, तिखट, तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

*  योग्य वेळी योग्य जेवण घ्यावे.

*  पुरेशी आणि शांत झोप घ्यावी.

* रात्रपाळीचे काम शक्य झाल्यास टाळावे.

*  खूप काळ उपाशी राहू नये.

*  कोणतेही वेदनाशामक औषध फार काळ घेऊ नये.

*  मानसिक ताण हलका करून मन शांत करता येईल असे उपाय करावेत.

*  अ‍ॅसिडिटीमुळे जठरात आणि आतडय़ातील पहिल्या भागात अल्सर होण्याची शक्यता असते. हल्ली औषधांमुळे हे आजार बहुतांशी बरे होतात. ज्या रुग्णांना रक्ताची उलटी किंवा अन्न अडकते त्यांच्यावरच शस्त्रक्रिया केली जाते.

आम्लपित्त होऊ नये म्हणून

* तिखट, तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

* कडक उपवास करू नये. फळ, फळांचे रस, दूध इत्यादी घेत राहावे.

*  जागरण करू नये.

*  मद्यपान, धूम्रपान करू नये.

*  ब्रुफेनसारख्या वेदनाशामक गोळ्या घेणे बंद करावे.

*  ताणतणावाला धर्याने तोंड द्यावे. काळजी करत बसू नये.

* जेवण वेळेवर घ्यावे आणि ते साात्त्विक असावे. सात्त्विक म्हणजे वरण, तूप, भात, पोळी-भाजी, दही, कोशिंबीरयुक्त असावे.

*  घाईघाईने जेवू नये. सावकाश शक्यतो एक घास बराच वेळ चावून खावा. जास्त वेळा घास चावल्याने तो मऊ होतो. त्यामुळे जठरावरचा ताण कमी होतो, तसेच घासामध्ये लाळ मिसळते. लाळ ही आम्लपित्त प्रतिकारक असते. त्यामुळेही आम्लपित्त कमी होण्यास मदत होते.

* दूध प्यायल्याने आम्लपित्त तात्पुरते कमी होते; परंतु दोन तासांनी पुन्हा वाढते म्हणून दूध टाळावे. सर्वसाधारण समजापेक्षा हे वेगळे आहे; पण शास्त्रीय आधाराप्रमाणे दुधाचा परिणाम हा काही काळच असतो व तो कमी झाल्यावर आम्लपित्त उफाळून जास्त प्रमाणात येते.

First Published on June 25, 2019 4:58 am

Web Title: gastroesophageal reflux disease measures and treatment zws 70
Just Now!
X