News Flash

देखणा, पण..

‘जिओनी एस११ लाइट’ हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम जाणवतो तो त्याचा देखणेपणा.

गेल्या चार-पाच वर्षांपासून भारतीय बाजारात नवनवीन स्मार्टफोन आणणाऱ्या जिओनीने नेहमीच ग्राहकांच्या वाढत्या गरजेवर लक्ष देऊन मोबाइलनिर्मिती केली. त्यामुळे जिओनीचे आजवरचे बहुतांश स्मार्टफोन देखणेपणासोबत नवनवीन वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असे आहेत. नुकताच आलेला एस ११ लाइटहा स्मार्टफोनदेखील या पंक्तीत बसू शकेल असा आहे. पण त्यातील सॉफ्टवेअरमध्ये सुधारणेला भरपूर वाव आहे.

ग्राहकांना कोणता स्मार्टफोन पसंत पडतो, याची नाडी आपल्याला गवसल्याचा दावा बहुतेक सर्वच मोबाइल कंपन्या करतात. पण तंत्रज्ञान इतक्या झपाटय़ाने प्रगत होत आहे की, ग्राहकांची पसंतीही त्यानुसार बदलत जात आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत मोबाइलच्या पुढील कॅमेऱ्याला कुणी महत्त्व देत नव्हते. पण नंतर एक काळ असा आला की, चांगल्या दर्जाचा ‘फ्रंट’ किंवा ‘सेल्फी’ कॅमेरा हा मोबाइलखरेदीचा प्राथमिक निकष बनला. तो काळ मागे सरला, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. ‘सेल्फी’बद्दलचे आकर्षण कायम असले तरी, स्मार्टफोनचा वेग आणि कार्यक्षमता या ग्राहकांसाठी कळीची वैशिष्टय़े बनली आहेत. याखेरीज सहज हाताळणी (यूजर इंटरफेस), मल्टिटास्किंग, व्हिडिओ या गोष्टी महत्त्वाच्या ठरत आहेत. एकूणच स्मार्टफोन कंपन्यांनी आता या वैशिष्टय़ांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. असाच एक स्मार्टफोन ‘जिओनी’ कंपनीने ‘एस११ लाइट’ या नावाने भारतीय बाजारात आणला आहे. सुमारे १३९९९ रुपयांना उपलब्ध असलेला हा स्मार्टफोन वर सांगितलेल्या वैशिष्टय़ांनी युक्त असा आहे.

‘जिओनी एस११ लाइट’ हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम जाणवतो तो त्याचा देखणेपणा. आकाराने मध्यम, पातळ जाडीच्या या फोनचा पुढचा भाग पूर्णपणे काचेने व्यापला आहे. साधारण ६ इंच लांबीच्या या फोनमध्ये ५.७ इंच आकाराचा डिस्प्ले आहे. उरलेल्या जागेत वरील बाजूस फ्रंट कॅमेरा, स्पीकर, नोटिफिकेशन लाइट पुरवण्यात आली आहे तर, खालील बाजूस ‘जिओनी’चे चिन्ह आहे. या फोनला होम बटण देण्यात आलेले नाही. अलीकडच्या काळात आलेल्या सर्वच फोननी ‘होम’ बटणला फाटा दिला आहे. तोच मार्ग ‘एस ११ लाइट’च्या बाबतीत अवलंबण्यात आला आहे. या फोनची मागील बाजू त्याचे सौंदर्य खुलवते. पूर्णपणे चमकदार ‘मिरर फिनिश’ असलेले बाह्यावरण फोनबद्दल आकर्षण निर्माण करते. विशेष म्हणजे, ही चमक केवळ दिखाऊपणाची नसून त्यात मजबुतीही आहे. त्यामुळे फोन सतत हाताळल्यानंतरही त्याचा चमकदारपणा कमी होत नाही की त्यावर ओरखडे उमटल्याचे जाणवून येत नाही. एकूणच देखणेपणाबाबत ‘एस ११ लाइट’ला पूर्ण गुण देता येऊ शकतील.

या फोनचा डिस्प्ले ५.७ इंचांचा आहे. साधारण १८:९ रेशिओ असलेल्या डिस्प्लेमुळे या फोनमधून व्हिडीओ पाहण्याचा अनुभव अतिशय चांगला आहे. आयपीएस एलसीडी कॅपासिटिव्ह टचस्क्रीन अतिशय व्यवस्थित असून प्रखर सूर्यप्रकाशातही डिस्प्ले सुस्पष्ट दिसतो.

‘एस ११ लाइट’मध्ये मागील बाजूस १३ मेगापिक्सल आणि दोन मेगापिक्सलचा डय़ूअल कॅमेरा पुरवण्यात आला आहे. सध्याच्या घडीला ग्राहकांचे प्राधान्य मागील बाजूस डय़ुअल कॅमेरा असलेल्या फोनना देण्यात येते. डय़ुअल कॅमेऱ्यामुळे छायाचित्रात अधिक स्पष्टता येते व त्यातील रंगांचे उठाव आणि भडकपणा व्यवस्थित दिसतो. याखेरीज डय़ुअल कॅमेऱ्याच्या माध्यमातून ‘पोटर्र्ेट’ छायाचित्रणही करता येते. ‘एस ११ लाइट’च्या कॅमेऱ्यात ‘पोट्र्रेट’ची सुविधा देण्यात आली असली तरी, ती व्यवस्थित काम करत नाही. फोनच्या पुढील बाजूस १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून तो त्याच्या क्षमतेनुसार दर्जेदार सेल्फी काढण्यासाठी उपयुक्त आहे.

आता या फोनच्या सॉफ्टवेअरविषयी. ‘एस११ लाइट’हा अँड्रॉइड ७.१ अर्थात नोगट या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यासोबतच ‘जिओनी’च्या अमिगो ५.० या इंटरफेसचाही यात मिलाफ करण्यात आला आहे. याखेरीज चार जीबी रॅम, ३२ जीबीअंतर्गत स्टोअरेज, १.४ गिगाहार्ट्झचा ऑक्टा कोअर प्रोसेसर ही फोनची कार्यक्षमता वाढवणारी यंत्रणा ‘एस११ लाइट’मध्ये सुसज्ज आहे. या फोनच्या किंमतश्रेणीतील अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये साधारण हीच वैशिष्टय़े असतात. या वैशिष्टय़ांनुसार ‘एस११ लाइट’ व्यवस्थित कामही करतो. परंतु, याच्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा अन्य कोणत्या तांत्रिक पातळीवर काही त्रुटी असाव्यात की काय, असा प्रश्न निर्माण होतो. कारण बऱ्याचदा हा फोन ‘हँग’ होतो. हा ‘हँगओव्हर’ अगदी काही सेकंदांचा असला तरी, एखाद्या अ‍ॅपमध्ये काम करत असताना किंवा एखादा गेम खेळत असताना काही क्षणांचा व्यत्यय किती त्रासदायक असतो, हे आपण जाणतोच. विशेषत: ‘ऑटो रोटेट’ होत असताना फोनची यंत्रणा अडखळत असल्याचे जाणवते. हा एक दोष वगळता फोन अतिशय कार्यक्षमतेने काम करतो. मात्र, सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दोष दूर करण्याकडे कंपनीने भर देणे आवश्यक आहे.

‘एस ११ लाइट’ हा जिओनीच्या आधीच्या स्मार्टफोनसारखा वैशिष्टय़पूर्ण आहे. सॉफ्टवेअर अपडेटच्या साह्याने यातील तांत्रिक दोष दूर करणे कंपनीला शक्य आहे. तो विचार केल्यास ‘एस ११ लाइट’ हा ग्राहकांच्या पसंतीक्रमात वरच्या स्थानी येईल, हे नक्की!

जिओनी एस ११ लाइट

  • ५.७ इंचांचा डिस्प्ले
  • हायब्रिड डय़ुअल सिम
  • १.४ गिगाहार्ट्झचा प्रोसेसर
  • १३+२ एमपी बॅक कॅमेरा
  • १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा
  • ३२ जीबी अंतर्गत स्टोअरेज
  • ४ जीबी रॅम
  • २५६ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढवण्याची क्षमता
  • किंमत : १३९९९ रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:54 am

Web Title: gionee s11 lite gionee mobile
Next Stories
1 सेल्फ सर्व्हिस : छत्रीची निगा
2 ताणमुक्तीची तान : नृत्याची साधना हीच ताणमुक्ती
3 न्यारी न्याहारी : झटपट टोमॅटो डोसा
Just Now!
X