डॉ. चारुशीला घोंगडे

दैनंदिन जीवनातून हरवलेलेखेळ, जंकफूडचा अतिवापर, बारीक दिसण्याचे फॅड यामुळे मुलींचे आहाराकडे मोठय़ा प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. याचे गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावरही दिसून येत आहेत. तेव्हा पालक म्हणून आपल्या मुलींच्या आहाराची शारीरिक व मानसिक वाढीची योग्य काळजी वेळीच घेतली तर सशक्त व स्वत:ची सुरक्षा करण्यास सक्षम मुली नक्कीच घडवू शकू.

संकटात बऱ्याचदा सर्व सजीव फाइट किंवा फ्लाइट रिसपॉन्सचा (लढा किंवा पळा) अवलंब करतात. या दोन्ही कृतींसाठी शरीर सशक्त असणे आवश्यक आहे आणि सशक्त शरीराची पहिली पायरी योग्य आहार व व्यायाम आहे. किशोरावस्थेत आल्यानंतर बऱ्याचदा मुलींचे बाहेर खेळणे कमी होते किंवा बंद केले जाते. परिणामी मुलींचा बहुतांश वेळ टीव्ही, मोबाइल किंवा त्या अभ्यासारख्या बैठय़ा बाबींमध्ये गुंतून राहतात. त्यामुळे त्यांच्या शरीराच्याही मर्यादित हालचाली होतात. मुलींमधील चपळपणा कमी होऊन लठ्ठपणा वाढण्याचे हे एक कारण आहे.

किशोरावस्थेत शरीरात अंतर्गत घडामोडी फार मोठय़ा प्रमाणात होत असतात. त्यामुळे या वयात मुलींच्या कॅलरी, प्रथिने व इतर पोषक घटकांची विशेषत: लोह आणि कॅल्शियम यांची गरज खूपच जास्त असते. त्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. शरीराला लोह प्राप्त होण्यासाठी हिरव्या भाज्या, अळीव व नाचणी व मासांहारी पदार्थ आहारात असणे महत्त्वाचे आहे.  बीट, मुळा, नोलकोल, फ्लॉवर इत्यादींच्या पाल्यामध्येही मोठय़ा प्रमाणात लोह घटक असतात. तेव्हा याचाही खाण्यामध्ये वापर करावा. पूर्वी लोखंडी तवा, कढई, उलथणे, फोडणीची पळी, खलबत्ता, यांचा वापर केला जात होता. यातूनही काही प्रमाणत अन्नामध्ये लोह उतरत असून शरीराला फायदेशीर होते. परंतु काळानुसार यांचा वापर कमी झाला आहे. लोखंडी भांडय़ाचा वापर स्वयंपाकघरात वाढविणे हाही एक उपाय आहे. यासोबत लोहाच्या शोषणासाठी चवीला आंबट असणाऱ्या फळांचा जसे लिंबू, संत्री, मोसंबी, आवळे यांचा चांगला उपयोग होतो.

मुलींच्या आहारात अनेक प्रकारची तृणधान्ये, कडधान्ये, डाळी आणि मासांहारी पदार्थ यांचा समावेश सहजपणे करता येतो. स्थानिक भाज्या, फळे यांचा आहारात मुबलक समावेश करणे गरजेचे आहे. हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांच्या वाढीचा व एकूण शारीरिक वाढीचा वेग कमी होतो. शरीरात मुबलक प्रमाणात कॅल्शियमची निर्मिती होण्यासाठी आहारात नाचणी, तीळ, खोबरे, राजगिरा आणि आळूची पाने, पालेभाज्या, दूध, दुधाचे पदार्थ यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

शरीराची आवश्यकता आणि गरज यानुसार डाएट ठरविणे गरजेचे आहे. यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच चरबी किंवा फॅट वाढेल म्हणून तेल, तूप खाण्यावर मुली हमखास निर्बंध घालतात आणि दुसरीकडे पिझ्झा, बर्गर, फ्रँकी यासारख्या जंकफूडच्या खाण्यावर मात्र कोणतेही नियंत्रण नसते. तेल किंवा तूप आहारात पूर्णपणे कमी करणेही चुकीचे आहे. शरीरात वंगणाप्रमाणे काम करणाऱ्या या पदार्थाची शरीराला गरज असते. त्यामुळे प्रमाण कमी केले तरी हे पदार्थ खाणे मुलींनी पूर्णत: टाळू नये.

केस, त्वचा, चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहण्यासाठी बाह्य़ उत्पादने लावण्यावर भर देण्यापेक्षा आहाराकडे योग्य लक्ष दिले तर याच्याशी निगडित समस्या उद्भवणार नाहीत. तसेच व्हिटामिनयुक्त पूरके, औषधे घेण्यापेक्षाही योग्य सकस आहार व योग्य जीवनशैलीतूनच मुलींचे शरीर सशक्त आणि सुदृढ राहू शकते.