News Flash

महानगरातली ‘ती’

मुलगी नोकरीसाठी स्थलांतर करत असेल तर, मिळणाऱ्या पगाराचे नियोजन करावे लागते.

नमिता धुरी, मानसी जोशी

गावाकडून आलेल्या माणसाकडे पाहण्याचा मुंबईकरांचा दृष्टिकोन बदलायचा आहे. इथली संस्कृती समजून घ्यायची आहे. अडचणींवर मात करण्यासाठी तिची पुरेशी मानसिक तयारी झाली आहे. या गोष्टीतली ‘ती’ राज्यातल्या बऱ्याच मोठय़ा शहरांमध्ये दिसते.

मुंबईबद्दल ऐकलं फार होतं, पण प्रत्यक्षात मुंबई पाहण्याची तिची ही पहिलीच वेळ. बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तिच्या आईवडिलांनी ठरवूनच टाकलं, ‘मी माझ्या पोरीला गावाकडे थांबवणार नाही. मुंबईला पाठवणार मोठ्ठय़ा कॉलेजात. तिला खूप शिकवणार’. आईबाबांचा निर्धार ऐकल्यानंतर तिलाही हुरुप आला. गावापासून महाविद्यालय लांब असल्यामुळे इतर मुलींचं शिक्षण थांबलेलं असताना तिने मात्र करिअरचा निर्णय घेतला आणि एका वेगळ्याच जगात येऊ न थांबली. आता तिच्या पुढे अनेक आव्हानं आहेत. इथे सकाळी हाका मारून उठवायला आई नाही, कपडय़ांना इस्त्री करून द्यायला बाबा नाहीत. स्वत:ची सगळी कामं स्वत: करायची आहेत आणि त्यातूनही अभ्यासासाठी वेळ काढायचा आहे. गावाकडून आलेल्या माणसाकडे पाहण्याचा मुंबईकरांचा दृष्टिकोन बदलायचा आहे. इथली संस्कृती समजून घ्यायची आहे. रस्त्याने चालताना स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्यायची आहे. पण या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी तिची पुरेशी मानसिक तयारी झाली आहे. महाविद्यालयात जाण्यासाठी पकडलेल्या पहिल्या लोकलसोबत तिने मुंबईचा वेगही पकडला आहे. या गोष्टीतली ‘ती’ राज्यातल्या बऱ्याच मोठय़ा शहरांमध्ये दिसते.

२०११ चा जनगणना अहवाल काय सांगतो? शिक्षणासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करणाऱ्या मुलींचे प्रमाण ५२ टक्के म्हणजेच स्थलांतर करणाऱ्या मुलांच्या चारपट आहे. नोकरीनिमित्त स्थलांतर करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढलेले असताना महिलांचे प्रमाण मात्र ३१ टक्क्यांनी वाढले आहे. पूर्वी मुलीने घरापासून लांब राहायचे म्हटल्यावर पालकांच्या कपाळाला आठय़ा पडायच्या. यामागे सर्वात मोठी चिंता असायची मुलीच्या सुरक्षिततेची. मात्र काळानुरूप पालकही सुशिक्षित झाले, त्यांनी आपल्या मुलींनाही खंबीर बनवले आणि शहरी भागांत महिला सुरक्षेविषयी जागरूकता वाढून त्यासाठी अनेक उपाययोजनाही के ल्या जाऊ  लागल्या. त्यामुळे  स्वतच्या शहरात शिक्षण आणि नोकरीसाठी आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असणाऱ्या मुली मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर करू लागल्या.

नोकरी आणि शिक्षणासाठी स्थलांतर करणे ही गोष्ट सध्याच्या काळात नवीन राहिलेली नाही. मात्र यात एक मुलगी म्हणून येणाऱ्या अडचणी वेगळ्या असतात. पालकांचा पाठिंबा असेल तर पुढचा प्रवास किंचित सुखकर होतो. पण काहींचा संघर्ष तर पालकांची मानसिक तयारी करून घेण्यापासून सुरू होतो. त्यात मुली यशस्वी ठरल्या की, सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो. ‘एवढय़ा लांब तू एकटी कशी राहणार?’ या प्रश्नावर कधी कधी मुलगी निरुत्तर होते. पण काही मुली अतिशय हुशारीने आपल्या ओळखीपाळखी शोधून काढतात. नातेवाईकांकडे राहतात. स्थानिक मुला-मुलींशी मैत्री वाढवतात. त्यांचे संपर्क क्रमांक पालकांना देतात. पालकांचे संपर्क क्रमांक मैत्रिणींना देतात. स्थानिक सुरक्षा व्यवस्थेची माहिती करून घेतात. पालकही आपल्या मुलींशी नियमितपणे व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधतात. यामुळे एकमेकांना मानसिक आधार मिळत राहतो.

त्यानंतर येतो आर्थिक प्रश्न. दुसऱ्या शहरात राहायचे म्हणजे वसतिगृहाचा खर्च असतो. काही वेळा पेइंग गेस्ट म्हणूनही राहावे लागते. नुसते महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क भरून भागत नाही तर शैक्षणिक साहित्याचाही खर्च असतो. वसतिगृह महाविद्यालयापासून लांब असेल तर प्रवासखर्च करावा लागतो. मुलगी मध्यमवर्गीय असेल तर पालकांना कर्ज काढावे लागते. आर्थिक स्थिती चांगली असेल तर बऱ्यापैकी प्रश्न सुटतात. मुलगी नोकरीसाठी स्थलांतर करत असेल तर, मिळणाऱ्या पगाराचे नियोजन करावे लागते. पण हे सगळे मुली आनंदाने पार पाडतात.

घरापासून लांब आल्यावर सुरुवातीला एकटेपणा फार जाणवतो. पण सोबत राहणाऱ्या मुलीसुद्धा त्याच सर्व समस्यांना तोंड देत असतात. त्यामुळे चांगली मैत्री होते. हळूहळू मुली एकमेकींची भाषा समजू लागतात. किमान इंग्रजी शिकून तरी संवाद वाढवला जातो. मात्र काही वेळा सांस्कृतिक भिन्नतेशी जुळवून घेणे कठीण होऊन बसते. वसतिगृहात मिळणारे जेवण सर्वासाठी सारखेच असते. पण काही मुली एकत्रितपणे घर घेऊन राहात असतील तर प्रत्येकीच्या जेवण करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. यामुळे विविध संस्कृतींतील पदार्थ शिकण्याची संधी मिळते किंवा मग नावडीचे पदार्थ नाइलाजाने खावे लागतात.

परक्या ठिकाणी राहताना साप्ताहिक सुट्टीचा दिवस सत्कारणी लावण्यासाठी निरनिराळे पर्याय मुली शोधतात. संबंधित ठिकाणच्या प्रसिद्ध ऐतिहासिक, सांस्कृ तिक वास्तू पाहणे, खाऊगल्ल्यांमध्ये जाऊन खवय्येगिरी जोपासणे यांत वेळ घालवला की पालकांची आठवण येत नाही आणि पुढचा संपूर्ण आठवडा आनंदात जातो. सवयीच्या वातावरणातून एका संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात आल्यानंतर अनेक प्रश्न ‘आ’ वासून उभे असतात. अशा वेळी संयम, जिद्द, समंजसपणा कामी येतो. मुली आर्थिक, भावनिकदृष्टय़ा स्वतंत्र बनत जातात आणि पालकांची चिंता मिटते.

दूरदर्शन क्षेत्रात काम करण्याची आवड आणि करिअरच्या संधी या दोन गोष्टींचा विचार करून मी एक महिन्यापूर्वी हैद्राबादला स्थलांतर केले. येथील लोकांची मातृभाषा तेलुगु असल्याने संवाद साधण्यास अवघड जात आहे. तसेच दाक्षिणात्य लोकांना हिंदी समजत नसल्याने इंग्रजी भाषेचा वापर करावा लागतो. आर्थिकदृष्टय़ा हैद्राबाद येथील जीवनशैली मुंबई-पुण्याच्या तुलनेत अधिक स्वस्त आहे. मी पहिल्यांदाच लांब राहायला गेल्याने आईवडील काळजीत आहेत, मात्र त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. मुंबई-पुण्याचा गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा होतो. या वर्षी मी हैद्राबादचा गणेशोत्सव अनुभवण्यासाठी उत्सुक आहे.

– ऐश्वर्या भेंडे, पुणे

माझे बारावीपर्यंतचे शिक्षण अहमदनगरला झाले. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम शिकण्यासाठी मी मुंबईला आले. नगरला हा अभ्यासक्रम आहे. मात्र मुंबईच्या महाविद्यालयाचा दर्जा अधिक चांगला आहे. शिवाय इथे प्लेसमेंटही मिळतात. पूर्वी मी उन्हाळी सुट्टीत मामाच्या घरी यायचे. त्यामुळे मुंबई माझ्यासाठी अगदीच अनोळखी नाही. सुरुवातीला एक वर्ष मी मामाच्या घरी राहिले. सध्या वसतिगृहात राहते आहे. कधी काही अडचण असेल तर मामाच्या घरी जाते. इथे गावाकडून आलेल्या मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याने महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांशी जुळवून घेताना थोडे कठीण गेले. मात्र आता काहीही अडचण येत नाही.

– साक्षी शाह, अहमदनगर

आजही शहरात एकटय़ा मुलीला घर मिळणे सोपे नसते. अशा वेळी ऑफिसमधील सहकाऱ्यांची आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांची खूप मदत होते. एकटीने घर घेऊ न राहणे परवडत नसल्याने बडोद्याला मी चार मुलींसोबत राहते. त्यांच्याशी आता घट्ट मैत्री झाली आहे. माझ्यासारख्याच त्यासुद्धा घर सोडून आलेल्या असल्याने आम्हाला एकमेकींचा आधार वाटतो. काही कारणावरून आमच्यात भांडण झाले तरी ते लवकर मिटते. या मैत्रिणी कु टुंबाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. घरातील कामे वाटून घेतलेली असल्याने एकाच सदस्यावर भार पडत नाही. घरापासून लांब राहिल्याने मी आर्थिक नियोजन करण्यास शिकले.

– प्रांजली जोशी, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 2:26 am

Web Title: girls from maharashtra rural areas comes in mumbai for career zws 70
Next Stories
1 स्वादिष्ट सामिष : अंडय़ाची चवदार भजी
2 उदरविकारांची दुर्बिणीद्वारे तपासणी
3 घरचा आयुर्वेद : मूतखडा
Just Now!
X