साहित्य

कचोरीच्या आतील सारणासाठी साहित्य- ३ वाटय़ा ओले, कोवळे मटारचे दाणे, एक चमचा बेसन, ७-८ लसूण पाकळ्या, १/२ इंच आल्याचा तुकडा, अध्र्या लिंबाचा रस, एक चमचा साखर, एक चमचा बडीशेप, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग, एक चमचा तिखट, चवीनुसार मीठ.

पारीसाठी साहित्य- दोन वाटय़ा मैदा, तीन चमचे बारीक रवा, मोहन म्हणून दोन टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ व तळण्यासाठी गरजेनुसार तेल.

सारणाची कृती- गॅसवर एका कढईत एक टेबलस्पून तेल घ्या व त्यात सोललेले ओले मटार दाणे घालून, मध्यम आचेवर थोडं परतवून घ्या. थोडी वाफ गेल्यावर हे परतवलेले दाणे मिक्सरमध्ये जरा जाडसर वाटून घ्या. नंतर एका कढईत तेलाची मोहरी, जिरे, हिंग आणि बडीशोप घालून फोडणी करा. एक चमचा बेसन घालून खमंग परतून घ्या. आता त्यामध्ये बारीक केलेले मटार दाण्यांचे सारण, हळद, तिखट, मीठ, लिंबाचा रस, साखर घालून एकत्र करा. मध्यम आचेवर ५ मिनिट परता.

पारीची कृती

पारीकरता एका परातीत मैदा आणि रवा एकत्र करून त्यात चवीसाठी थोडे मीठ घाला. नंतर गरम तेलाचं मोहन घालून पीठ पाण्याने सैलसर भिजवा. आता तळहातावर पीठाचा गोळा घेऊन त्याला द्रोणासारखा आकार द्या. त्यात   चमच्याने तयार सारण भरून पारी वरील बाजूने बंद करा. आता तयार होईल तुमची गोल आकाराची कचोरी. अशाप्रकारे सर्व कचोऱ्या तयार करून घ्याव्या. तळण्यासाठी तयार झालेल्या कचोऱ्या गरम तेलात मंद आचेवर तळा. या गरमागरम कचोऱ्या चिंच-खजूर-गुळाच्या चटणीबरोबर खाव्यात.