मकरंद जोशी

पावसाळा म्हणजे डोंगर-दऱ्यांत भटकण्याचा, धबधब्यांत न्हाऊन निघण्याचा ऋतू. त्यामुळे बहुतेकांनी चिंब भटकंतीचे बेत आखायला सुरुवात केली असेलच. भिजण्याची आवड असलेल्यांसाठी तर आता शेकडो पर्याय आहेत. पण ज्यांना पावसात भिजणं नकोसं वाटतं, त्यांनाही हा ऋतू निषिद्ध नाही. उभ्या आडव्या पसरलेल्या भारतात पावसाळ्यातही कोरडं राहून भटकण्याची संधी आहे.

आपल्या भारत देशाला जो विशाल आकार लाभला आहे, त्याचा एक मोठा फायदा म्हणजे एकाच वेळी देशाच्या दोन टोकांवर वेगवेगळे हवामान असते. निसर्गाच्या विविध तऱ्हा अनुभवायला मिळतात. त्यामुळे एकाच ऋतूमध्ये आपल्याकडे दोन वेगवेगळे पर्याय असतात आणि आपण त्यातील मनासारखा निवडून पर्यटनाचा आनंद लुटू शकतो. आता पावसाळ्यात फिरायला जायचं म्हटल्यावर अनेकांच्या नजरेसमोर डोंगरदऱ्यांतून वाहणारे धबधबे आणि सरसर बरसणाऱ्या धारांनी भिजून चिंब झालेला हिरवागार परिसर असं दृश्य येतं, पण काहींना मात्र पावसात भिजायचं ही कल्पनाच नकोशी वाटते. अशांसाठी ऐन पावसाळ्यातही तुलनेनं कोरडी पर्यटन स्थळं आहेत. अशाच ठिकाणांसाठी प्रसिद्ध असलेलं राज्य म्हणजे राजस्थान. ‘पधारो म्हारो देस’ म्हणून कायम पर्यटकांचं स्वागत करणारा राजस्थान तसा कोरडा, कमी पावसाचा प्रदेश असल्याने ऐन पावसाळ्यातही या मरुभूमीला भेट देऊन इथल्या राजेशाही वारशाचा आणि पारंपरिक आदरातिथ्याचा आनंद घेता येतो.

राजस्थानमधील मेवाडची राजधानी असलेलं शहर ‘उदयपूर’ हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. उदयपूरला जाणारे बहुतेक पर्यटक चितोडच्या इतिहासप्रसिद्ध किल्ल्याला भेट देतातच. पण उदयपूरपासून ८४ किलोमीटरवर असलेला कुंभलगढ मात्र पर्यटकांच्या यादीत सहसा नसतो. राजसमंद जिल्ह्यात अरवली पर्वताच्या रांगेत १५व्या शतकात बांधलेला कुंभलगढ आजही राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाच्या खुणा जतन करत ताठ मानेने उभा आहे.

युनेस्कोच्या विश्व वारसा यादीत समाविष्ट असलेला हा किल्ला १३ पर्वतशिखरांनी घेरलेला आहे. ३६०० फूट उंचीवर असलेला हा किल्ला ३६८ हेक्टर परिसरात पसरलेला आहे. तसा या किल्ल्याला लहाव्या शतकापासूनचा इतिहास लाभलेला असला तरी सध्या आपण बघतो तो किल्ला राणा कुंभ यांच्या कारकीर्दीत बांधलेला आहे. मेवाड आणि मारवाड या भागांच्या सीमारेषेवरचा हा किल्ला म्हणजे राजस्थानच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाचा मूक साक्षीदार आहे. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी भोवती उभारलेली तटबंदी सुमारे ३६ किलोमीटर लांब आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची भिंत १५ फूट रुंद (जाड) आहे. याच किल्ल्यावर महाराणा प्रताप यांचा जन्म झालेला असल्याने राजस्थानच्या इतिहासात कुंभलगढला विशेष स्थान आहे. किल्ल्यातील बादल महल, नीलकंठ महादेव मंदिर, पाश्र्वनाथ मंदिर, हल्ला पोल – राम पोल- हनुमान पोल असे दरवाजे पाहताना राजस्थानी वास्तुशैली आणि कलाकुसरीचे दर्शन घडते.

या किल्ल्याभोवतीचे अभयारण्य हे इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण ठरते. ६१० चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात बिबटय़ा, चौसिंगा, निलगाय, अस्वल, तरस, कोल्हा, चिंकारा असे प्राणी आणि विविध प्रकारचे पक्षी आहेत. कुंभलगढसाठी जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्थानक उदयपूर हेच आहे. कुंभलगढच्या परिसरात लक्झरी रिसॉर्टपासून ते हॉटेल्सपर्यंत विविध प्रकारची निवास व्यवस्था उपलब्ध आहे.

आता पावसाळ्याच्या हिरव्या ऋतूचा चिंब चिंब आनंदच ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी सरळ दक्षिण भारताकडे प्रस्थान करावे आणि कोकोनट कंट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळची निवड करावी. केरळच्या त्रिशुर जिल्ह्य़ात चलकुडी नदीच्या प्रवाहात सुमारे हजार फूट उंचीवर अथिरापल्लीचा धबधबा तयार झाला आहे. ‘रावण’, ‘दिल से’, ‘गुरू’, ‘खुशी’ अशा बॉलीवूडपटांमध्ये दिसलेला हा धबधबा केरळमधला सर्वात मोठा धबधबा मानला जातो. हिरव्यागार वनश्रीने भरलेल्या शोलायार टेकडय़ा आणि त्यामध्ये उंचावरून ओसंडून वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र जलधारा हे दृश्य इतके मोहक असते की पाहणाऱ्याचे डोळे आणि मन एकाचवेळी आनंदाने भरून जाते.

वळाचल फॉल्स, चर्पा फॉल्स, शोलायार धरण, अणक्कयम (एलिफंट पीट) या पर्यटन आकर्षणांबरोबरच या परिसरात ड्रीम वर्ल्ड आणि सिल्व्हर स्टॉर्म ही दोन थीम पार्क आहेत. अथिरापल्ली भोवतालचे जंगल ‘आय बी ए’ म्हणजे इम्पॉर्टन्ट बर्ड एरिया म्हणून घोषित झाले आहे. इथल्या सदाहरित अरण्यामधून जंगल सफारी करण्याचा रोमांचक अनुभव घेता येतो. अथिरापल्लीसाठीजवळचे विमानतळ म्हणजे कोचिन (५५ कि.मी.). त्रिशुर (६० कि.मी.), एर्नाकुलम (कोची) ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. अथिरापल्लीजवळ निवासासाठी हॉटेल्स आणि होम स्टे आहेत.

मग आता पावसाच्या धारांमध्ये झिम्माड भिजत धबधब्याचा आनंद घ्यायचा की जरा कोरडय़ा परिसरातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायची हे तुम्हीच ठरवा.

makarandvj@gmail.com