केसप्रत्यारोपणाची प्रक्रिया अतिशय सुरक्षित समजली जात असताना ही प्रक्रिया केल्यानंतर दोन दिवसांत व्यापाराचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉ. आनंद जोशी यांच्याकडून ही प्रकिया समजून घेऊ..

हेअर फॉल म्हणजेच केस गळणे ही समस्या बहुतेक प्रत्येक माणसाला जाणवते. सर्वसाधारणपणे दर दिवसाला १०० ते २०० पर्यंत केस गळू शकतात. केस गळायला लागले की आता टक्क्ल पडेल अशी आपल्याला काळजी वाटायला लागते. केस गळल्याने टक्कल पडतेच असे नाही. त्यामुळे अशा रीतीने केस गळणे सामान्य आहे. मात्र प्रमाणाबाहेर होत असल्यास लक्ष देणे आवश्यक आहे.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
How to Make Home Made Instant Chilli Rice Dhokla with Leftover Rice Not The Tasty And Quick Recipe
रात्री उरलेल्या भाताचे काय करायचं असा प्रश्न पडलाय ? मग ‘हा’ पदार्थ बनवून पाहा; झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
Mystery of dead body found in quarry solved revealed to have been murdered by a friend
दगडखाणीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, मित्राने हत्या केल्याचे उघड

टक्कल पडणे हा प्रकार फक्त अनुवांशिक आहे. दुसरे कारण नाही. ९० ते ९५ टक्के व्यक्तींमध्ये अनुवांशिक म्हणजेच वडिलांना किंवा आजोबांना टक्कल असते, म्हणून टक्कल पडलेले असते. याला अन्ट्रोजेनेटिक अ‍ॅलोपेशिया म्हणतात. पुरुष आणि महिला दोघांमध्येही टक्कल पडते. मात्र त्यांची लक्षणे वेगवेगळी आहेत. पुरुषांप्रमाणे महिलांना तुळतुळीत टक्कल कधीच पडत नाही. साधारण डोक्याच्या पुढील भागापासून टाळूपर्यंतचे केस विरळ होतात, याला फीमेल अन्ट्रोजेनेटिक अ‍ॅलोपेशिया म्हणतात. प्रमाणाबाहेर केस गळत असतील तर वैद्यकीय क्षेत्रात फार कमी औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे खरोखच ज्यांचा प्रमाणाबाहेर केस गळत आहेत, त्यांनीच ही औषधे घ्यावीत. दुसरे म्हणजे या औषधांची अशी मर्यादा आहे की औषधे घेणार त्याच काळापुरता त्याचा फायदा दिसतो. औषधे बंद केल्यानंतर पुन्हा केस गळणे सुरू होते. त्यामुळे टक्कल पडलेल्यावर केसप्रत्यारोपण हाच एक उपाय आहे.

केसप्रत्यारोपण एक प्रक्रिया

वैज्ञानिकदृष्टय़ा हे प्रत्यारोपण नसून व्यक्तीच्या एका भागातील केस काढून दुसऱ्या ठिकाणी ग्राफ्ट म्हणजेच  लावले जातात. डोक्याच्या मागील भागावरील केसांचे रूट्स म्हणजे फॉलिकल ग्राफ्ट्स काढून टक्कल असलेल्या भागावर रोपण करणे. कानाच्या वरती आणि टाळूच्या खालच्या भागात कोणालाच टक्कल पडत नाही. याला डोनर झोन म्हटले जाते. याच भागातून केस काढून टक्कल पडलेल्या भागात लावले जातात. यालाच मायक्रोग्राफ्टिंग म्हणजेच केसरोपण म्हणतात. माथ्यापासून टाळूपर्यंत किती केस गेलेत याचे प्रमाण काढले जाते. यामध्ये एक ते सातपर्यंत ग्रेडिंग असते. या ग्रेडिंगनुसार केसप्रत्यारोपण कसे करायचे याचे नियोजन केले जाते. याच्या दोन पद्धती आहेत. स्ट्रीप आणि सिंगल फॉलिकल युनिट एक्सट्रॅक्शन या दोन पद्धतीने शस्त्रक्रिया केली जाते.

यासाठी डोक्याच्या वरील भागावर भूल दिली जाते. त्यामुळे इतर शस्त्रक्रियेप्रमाणेच ही शस्त्रक्रियाच आहे हे समजणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णाला संपूर्ण भूल देण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे बऱ्याचदा जाहिरातींमध्ये कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय असा दावा केला जातो तो चुकीचा आहे. हीसुद्धा एक प्रकारची शस्त्रक्रियाच आहे.

टक्कल पडलेल्या संपूर्ण भागावर एकाच वेळेस केस लावले जात नाहीत. यासाठी ही प्रक्रिया दोन ते तीन टप्प्यांत केली जाते. एका टप्प्यामध्ये एका मेगासेशनचे लिमिट साधारण २५०० ते ३००० ग्राफ्ट्स इतकेच आहे.

याचे दुष्परिणाम असतात का?

ही एक प्रकारची शस्त्रक्रियाच असते. त्यामुळे इतर शस्त्रक्रियांप्रमाणेच भूल उतरल्यानंतर काळजी घेणे आवश्यक असते. भूल उतरल्यावर त्याजागी दुखणे, चेहरा सुजणे हे थोडय़ा प्रमाणात साहजिक आहेच. त्यामुळे ही प्रक्रिया तीन ते चार दिवसांची असते. एक किंवा दोन दिवस शस्त्रक्रियेला लागतात. त्यानंतर दोन दिवस घरी बसून आराम करण्याची सूचना दिली जाते. यामध्ये अगदी बेडरेस्टची गरज नसते. तुम्ही ताबडतोब कामावर जाऊ शकत नाही. तेवढा वेळ देणे आवश्यक आहे. या प्रक्रिया योग्य तज्ज्ञांकडून करवून घेतली तर याचे नक्कीच दुष्परिणाम नाहीत. ही अतिशय सुरक्षित पद्धती आहे.

केसप्रत्यारोपणसाठीची वयोमर्यादा

केसप्रत्यारोपणास कोणतीही वयोमर्यादा नाही. सर्वसाधारणपणे २०-२२ वर्षांनंतरच टक्कल पडायला सुरुवात होते. त्यामुळे कोणत्याही वयात केल्यास भविष्यात काहीही दुष्परिणाम नाहीत. फक्त व्यक्ती वैद्यकीयदृष्टय़ा ही प्रक्रिया करण्यासाठी सक्षम असणे अत्यावश्यक आहे. कमी वयामध्ये प्रक्रिया करणे फायदेशीर आहे, कारण वय वाढेल तसे मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजारांमुळे या शस्त्रक्रिया करताना अधिक काळजी घ्यावी लागते.

कालावधी अधिक

या प्रक्रियेला अनेक मर्यादा असून त्या समजून घेणे गरजेचे आहे. या प्रक्रियेला लागणारा कालावधी खूप मोठा असतो. शस्त्रक्रिया काही तासांची असली तरी त्याचे परिणाम दिसायला कमीतकमी ६ महिने ते १ वर्ष थांबावे लागते. प्रत्यारोपण केलेले केस हे इतर केसांइतके घनदाट कधीच नसतात व होऊ  शकत नाहीत.

काय काळजी घ्यावी?

केस प्रत्यारोपण करावे की नाही हा एक वैयक्तिक निर्णय ठरतो. ही एका प्रकारची कॉस्मेटिक सर्जरीच आहे. म्हणूनच कुठलाही प्लास्टिक सर्जन पेशंटला हे करणे आवश्यक आहे हे सांगणार नाही. जर तसे सांगण्यात आले असेल तर तो चुकीचा सल्ला समजला पाहिजे. ही शस्त्रक्रिया महाग असल्याकारणाने हल्ली अशिक्षित व्यक्तीकडूनही पैसा कमावण्याच्या हेतूने सर्रास या प्रक्रिया केल्या जात आहेत. अशा व्यक्तींकडून फसवणूक होऊ नये यासाठी पुढील बाबींची तपासणी नक्कीच करून घ्या.

प्लास्टिक सर्जन किंवा त्वचारोगतज्ज्ञ ही शस्त्रक्रिया करू शकतात. म्हणून मग त्या ठिकाणी हे तज्ज्ञच प्रक्रिया करतात का याची खात्री करून घेणे. तसेच या डॉक्टरांनी आतापर्यंत किती वेळा या प्रक्रिया केल्या आहेत, याचीही माहिती घेणे. हे डॉक्टर उपलब्ध नसतील अशा ठिकाणी केसप्रत्यारोपण प्रक्रिया करून घेऊ नये.

जाहिरातींना भुलून तेल किंवा अन्य काही बाबींचा वापर करू नये. या बाबी लावल्यावर टक्कल पडलेल्या भागावर १० ते १५ टक्क्यांपर्यंत परिणाम दिसू शकतात. मात्र पूर्ववत केस कधीच येऊ शकत नाहीत.

प्रक्रियेसाठी येणारा खर्च

शस्त्रक्रियेसाठीचा खर्च प्रत्येक डॉक्टर आणि क्लिनिकप्रमाणे वैयक्तिक ठरवला जातो. सर्वसाधारणपणे किती टक्कल आहे आणि किती ग्राफ्ट्स लागणार आहेत यावर अवलंबून असते. प्रति ग्राफ्ट सरासरी ४० ते ५० रुपये इतका खर्च येऊ  शकतो.