ऑफ द फिल्ड : ऋषिकेश बामणे

सकारात्मक आणि आशावादी विचारांनी भरलेले २०२० हे वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. सामान्य चाहत्यांपासून कलावंतांपर्यंत सर्वच नववर्षांच्या स्वागतासाठी तयारीत रमलेले असताना आपले क्रीडापटूही यामध्ये कसे मागे राहतील. काही क्रीडापटूंनी नववर्षांत प्रवेश करण्यापूर्वी नाताळचाही धूमधडाक्यात आनंद लुटला. याच पाश्र्वभूमीवर काही लोकप्रिय क्रीडापटूंच्या आगामी योजनांविषयी घेतलेला हा आढावा.

मेसीचे अनोखे सेलिब्रेशन

अर्जेटिनाचा नामांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसीने मंगळवारी रात्री ट्विटरवर नाताळ सणाचा कुटुंबीयांसह आनंद लुटतानाचे छायाचित्र टाकले. यंदाच्या वर्षांत बलोन डी ओर, ‘फिफा’चा वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार आणि विक्रमी हॅट्ट्रिक साकारणाऱ्या मेसीने नवीन वर्षांच्या स्वागताविषयी काहीही म्हटले नसले तरी सध्या तो कुटुंबीयांसह बार्सिलोनात वेळ घालवण्यात मग्न आहे.

बालकांसाठी कोहली ‘सांताक्लॉज’

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नववर्षांचे स्वागत तो कशा प्रकारे करणार आहे, हे अद्याप जाहीर केले नसले तरी नाताळ (ख्रिसमस) या सणाचा त्याने लहान मुलांसोबत मनसोक्त आनंद लुटला. कोलकाता येथील ‘चिल्ड्रन्स शेल्टर होम’ला कोहलीने काही दिवसांपूर्वी भेट दिली. स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या उपक्रमांतर्गत कोहलीने बच्चे कंपनीसोबत केलेली धमाल चाहत्यांच्या पसंतीस उतरली. यामध्ये त्याने सर्व बालकांचे आवडते खेळाडू कोण आहेत व त्यांना ‘सिक्रेट संता’कडून कोणते गिफ्ट्स हवे आहेत, हे जाणून घेतली. त्यानंतर सांताक्लॉस बनून कोहलीने त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. समाजमाध्यमांवर या चित्रफितीचे अनेकांनी कौतुक केले.

सायना-कश्यप यांची देशी-विदेशी सहल

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच विवाह सोहळा संपन्न झाला. या वर्षी हे प्रेमी युगुल देशाबरोबरच विदेशातील नयनरम्य स्थळांना भेट देणार आहेत. त्याचप्रमाणे २०१९ या वर्षांत दोघांनाही फारसा चमकदार खेळ करणे जमले नाही. म्हणूनच आगामी वर्षांत ऑलिम्पिकच्या दृष्टीने सराव करण्याला प्राधान्य देण्याचाही दोघांनी संकल्प केला आहे.

हॅमिल्टन, पेस यांचे प्राधान्य खेळालाच

वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा लेविस हॅमिल्टन आणि भारताचा सर्वाधिक अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेस या दोघांनीही नवीन वर्षांचे स्वागत आपापल्या खेळात मग्न राहूनच करणार आहेत. त्यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमधून तरी असेच निदर्शनास येते. हॅमिल्टन वर्षांच्या सुरुवातीला रंगणाऱ्या ग्रां. पि. फॉम्र्युला-१ स्पर्धेसाठी तयारी करत आहे. ४६ वर्षीय पेस ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याने तोसुद्धा या वेळी धडाक्यात जल्लोष न करता खेळावरच लक्ष केंद्रित करणार आहे. पेसचा समावेश असलेल्या भारतीय संघाने गेल्या महिन्यात डेव्हिस चषक लढतीत पाकिस्तानला नमवले.

रोहितचे कुटुंबीयांना प्राधान्य

भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या लग्नाचा आणि त्याची पत्नी रितिका यांचा वाढदिवस नुकताच झाला; परंतु या वेळी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत व्यग्र असल्यामुळे रोहितला सेलिब्रेशन करणे जमले नाही. त्यामुळेच श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठीही विश्रांती घेणारा रोहित पुढील काही आठवडे कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यास प्राधान्य देणार आहे. काही दिवसांपूर्वीच रोहितने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमधून तो नवीन वर्षांचे स्वागत परदेशात करणार असल्याची चिन्हे दिसून आली. २०१९ हे वर्ष रोहितसाठी फारच लाभदायक ठरले. विश्वचषकातील पाच शतकांसहच त्याने कसोटी आणि ट्वेन्टी-२० प्रकारातही छाप पाडली.