वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक ayurvijay7@gmail.com 

‘तोंड येणे’ अशी तक्रार घेऊन अनेक रुग्ण येतात. धावपळीच्या युगामुळे आपल्या प्रकृतीकडेदुर्लक्ष होत असल्याने जेवण्याच्या, झोपण्याच्या नियमित वेळा पाळल्या जात नाहीत आणि अशा तोंड येण्यासारख्या दिसायला छोटय़ा, पण त्रासदायक तक्रारी निर्माण होत आहेत. या व्याधी काही आधुनिक काळाच्या आहेत, असे समजण्याचे मात्र कारण नाही. त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार या तिन्हीचे मार्गदर्शन आयुर्वेदीय ग्रंथात मिळते. तोंड येणे या प्रकारास आयुर्वेदाने ‘मुखपाक’ असे म्हटले आहे. यालाच सर्वसर रोग असेही संबोधलेले आहे.

ज्याप्रमाणे आधुनिक वैद्यकशास्त्रज्ञ तसेच डोळ्याचे विकार असे विविध प्रकारांचे शास्त्रीय वर्णन आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदीय संहितामध्ये मुखरोग (तोंडाचे रोग), कर्णरोग (कानाचे विकार), नासारोग (नाकाशी संबंधित व्याधी) अशा प्रकारे वेगवेगळे वर्णन केलेले आहे. तोंड येणे यांचा समावेश मुखरोगात केलेला आहे. इतरही अनेक प्रकारचे मुखरोग यामध्ये वर्णन केले आहेत. तोंडाचे रोग होण्याची काही सर्वसामान्य कारणे आयुर्वेदात दिली आहेत.

मुखरोगाची कारणे-

या कारणांमध्ये दूध, दही यांचे अतिप्रमाणात सेवन तसेच मासे अधिक खाणे, दलदलीच्या प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचे मांस खाणे यांचा समावेश आहे. यामुळे वात, पित्त, कफ या तीन दोषांपैंकी कफदोषांचा प्रकोप होतो. (म्हणजे तो दोष वाढतो) आणि तोंडाचे विकार निर्माण होतात. अर्थात वात आणि पित्त या दोन दोषांचाही संबंध या रोगांमध्ये असू शकतो. मुखपाकाच्या (तोंड येणे) संदर्भात विचार करण्याचा झाला तर वरील कारणे आहेतच. शिवाय आधुनिक काळात घडणाऱ्या कारणांपैकी अती चहापान, तंबाखू सेवन तसेच जागरण यांचा समावेश करावा लागेल. या घातक गोष्टी तर अनेकांच्या दिनचर्येचा एक अविभाज्य घटक बनून जातो. अतिशय तिखट खाणे हेसुद्धा तोंड येण्यास कारण ठरणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. पोट साफ नसणे (मलावरोध) तसेच पचनाच्या इतर तक्रारी यांमुळेही तोंड येण्याचा त्रास होतो. कारखान्यात निरनिराळ्या पाळ्यांमध्ये काम करणाऱ्यांनाही तोंड येण्याचा त्रास नेहमी होतो. कारण त्यांच्यामध्ये जागरण हे एक मुख्य कारण घडते. जागरणाबरोबरच अती चहापानही होते. जेवण वेळच्या वेळी होत नाही. याप्रकारे कारणे घडल्याने तोंड येणे ही तक्रार निर्माण होते. तात्पुरती कारणे घडली तर ही तक्रार कमी काळ टिकते. पण घडणाऱ्या कारणांची संख्या व काळ जास्त असल्यास अतिशय चिरकाली अशा स्वरूपाची ही तक्रार सुरू होते.

तोंड आलेल्या व्यक्तीस त्यामुळे अतिशय अस्वस्थता येते. अन्न चावताना त्याची विशेष जाणीव होते. त्यामुळे काही खावेसे वाटत नाही. तोंडाची आग होते. काही वेळा त्याठिकाणी वेदना होतात. जिभेवर फोड येतात. त्या ठिकाणी अतिशय लाळ सुटते. काही वेळा खाजही सुटते. वात, पित्त, कफ या तीन दोषांपैंकी ज्या दोषाचे उत्कटत्व अधिक असेल त्याप्रमाणे लक्षणे दिसतात. माधवनिदान, तसेच वाग्भट या आयुर्वेदीय ग्रंथकारांनी या रोगांच्या लक्षणांचे सविस्तर वर्णन केलेले आहे.

उपचारांची दिशा-

तोंड येण्यावर अनेक आयुर्वेदीय उपचारांचा अवलंब करता येतो. परंतु तत्पूर्वी या उपचारांचाच एक महत्त्वाचा भाग असलेला नियमित आहार-विहार करणे हे अत्यावश्यक समजावे. या तक्रारीला कारणीभूत ठरणारी कारणे समजून घेऊन ती टाळण्याचा प्रयत्न करणे हा या उपचारपद्धतील प्रमुख भाग आहे. आयुर्वेदीय उपचारांमध्ये विविध कल्पांचा उपयोग केला जातो. कोणत्या दोषांचा त्यामध्ये संबंध आहे हे समजून मग त्यावर उपचार केले जातात.

जिभेवर येणाऱ्या फोडांसाठी शुद्ध गेरूचे चूर्ण मधात मिसळून लावल्यास फायदा दिसतो. साजूक तूप खाण्यात ठेवल्यानेही फायदा होतो. मलावरोधाचा त्रास असल्यास त्रिफळा चूर्णासारखे सौम्य विरेचन घेतल्यास बऱ्याच अंशी फायदा दिसतो. सुतशेखर, प्रवाळभस्म, मोरावळा ही आयुर्वेदीय औषधेही यावर चांगली उपयोगी पडतात. उष्णता वाढल्यास तोंड आलेले असल्यास तुकुमराई (तुळसीचे बी ) दुधामधून घेतल्यास ते कमी होते. गुलकंदाचाही उपयोग यामध्ये चांगल्या प्रकारे होतो. दुर्वासिद्ध तुपाचा उपयोग याचप्रकारच्या मुखपाकावर होतो. सारिवा, जेष्ठमध या वनस्पतीच्या चूर्णाचाही उपयोग यामध्ये केला जातो. ही सर्व औषधे मात्र वैद्यांच्या सल्ल्यानेच घेणे आवश्यक आहे.