परवडणाऱ्या श्रेणीतील स्मार्टफोनच्या ग्राहकांसाठी भारतीय बाजारात कमालीची रस्सीखेच सुरू आहे. या स्पर्धेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फोनच्या किमती कमी करण्याबरोबरच कमी किमतीत दर्जेदार वैशिष्टय़े पुरवण्यावर भर दिला जात आहे. याच श्रेणीत आता ‘ओप्पो’चा ‘रीयलमी’ हा ब्रॅण्ड दाखल झाल आहे.

परवडणाऱ्या स्मार्टफोनच्या स्पर्धेत भारतात अनेक नामांकित कंपन्या दिसून येतात. पाच हजारांपासून २० हजार रुपयांपर्यंतच्या दरश्रेणीतील स्मार्टफोनच्या ग्राहकांची संख्या भारतात जास्त आहे. साहजिकच छोटय़ा कंपन्यांसोबत मोठमोठय़ा कंपन्याही अशा फोनच्या निर्मितीत उतरू लागल्या आहेत. ‘ओप्पो’ हे यातलेच नवीन उदाहरण म्हणता येईल. गेल्या दोनेक वर्षांत ओप्पो या ब्रॅण्डने भारतीय ग्राहकांकडून पसंतीची पावती मिळवली आहे. मात्र तरीही स्वस्त मोबाइलच्या बाजारपेठेत ‘ओप्पो’ स्थिरावलेली नाही. त्यामुळेच आता या कंपनीने ‘रीयलमी’ या नावाने स्मार्टफोनचा ब्रॅण्ड भारतात आणला आहे.

‘रीयलमी’ हे नाव ऐकताच ‘ओप्पो’ आपला प्रमुख स्पर्धक कोणाला मानते, हे कळल्यावाचून राहात नाही. भारतीय ग्राहकांना ‘शाओमि’ या ब्रॅण्डच्या स्मार्टफोनने भुरळ पाडली आहे. जेव्हा जेव्हा ‘शाओमि’चा नवीन ‘एमआय’ फोन सादर होतो, तेव्हा तेव्हा या फोनच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या उडय़ा पडतात. एकप्रकारे मोबाइल कंपन्यांच्या भाऊगर्दीत ‘एमआय’ने स्वत:चा पंथच तयार केला आहे. नेमकी हीच बाब हेरून ‘ओप्पो’ने ‘रीयलमी१’ या नावाने नवीन फोन आणला आहे. आठ हजार रुपयांपासून १४ हजार रुपयांच्या श्रेणीतील हा फोन खऱ्या अर्थाने परवडणाऱ्या श्रेणीतील फोनना टक्कर देणारा ठरू शकतो.

रचना

‘रीयलमी१’चे बाह्य़ावरण पूर्णपणे फायबर ग्लासने बनवण्यात आले असून त्याच्या मागील बाजूस चमकदार फिनिशिंग पुरवण्यात आली आहे. आमच्याकडे परीक्षणासाठी आलेल्या स्मार्टफोनला लाल रंगाचा चमकदार पृष्ठभाग असून पाहताक्षणी तो लक्ष वेधून घेतो. अर्थात यावरील चमक काही ग्राहकांना अतिभडक वाटू शकते. त्यातही हा पृष्ठभाग फायबर ग्लासने बनलेला असल्याने हाताच्या बोटांचे ठसे उमटून ही चमक काहीशी पुसट होते.

फोनची पुढची बाजू पूर्णपणे काळ्या रंगाच्या काचेने व्यापलेली असून किंचित किनारपट्टी वगळता डिस्प्ले पुढच्या पूर्ण भागावर पसरलेला आहे. सहा इंचापेक्षा किंचित मोठय़ा आकाराचा हा फोन जाडीला पातळ असल्याने हातात सहज सामावतो. त्यामुळे तो हातातून सटकण्याची शक्यता नसते. प्लास्टिक आवरण असले तरीही त्याला मजबुती असल्याने फोन खाली पडल्यानंतरही तो व्यवस्थित असल्याचे आमच्या पाहणीत आढळून आले. फोनच्या उजव्या कडेला आवाजाची बटणे आणि सिमकार्ड ट्रे असून डाव्या कडेला पॉवर बटण पुरवण्यात आले आहे.

या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नाही. सध्या सर्व प्रकारच्या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर पुरवण्यात येतो. त्यामुळे या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरची अनुपस्थिती काही प्रमाणात खटकते. मात्र सुरक्षेसाटी पिन लॉक, फेशियल रेकग्निशन हे पर्याय त्यात पुरवण्यात आले असून ते अगदी चोखपणे काम करतात.

वैशिष्टय़े

‘रीयलमी१’ हा तीन प्रकारांत उपलब्ध आहे. त्यामध्ये तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज, चार जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज आणि सहा जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज असे पर्याय मिळतात. रॅम आणि स्टोअरेजच्या क्षमतेनुसार किमतीत तफावत आढळते. विशेष म्हणजे, या फोनच्या सिमकार्ड ट्रेसोबतच मायक्रोएसडी कार्डसाठीही जागा देण्यात आली असून त्यातून २५६ जीबीपर्यंत स्टोअरेजची क्षमता वाढवता येते.

या फोनमध्ये सहा इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले पुरवण्यात आला आहे. डिस्प्ले अतिशय सुस्पष्ट असून त्यावरून व्हिडीओ पाहण्याचा अनुभवही सुखद आहे. कोणत्याही दृश्यातील प्रत्येक रंग डिस्प्ले अचूक टिपत असल्याचे आम्हाला जाणवले.

या फोनमध्ये मागील बाजूस १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि पुढील बाजूस आठ मेगापिक्सेल कॅमेरा पुरवण्यात आला आहे. या कॅमेऱ्यांमध्ये पॅनोरॅमा, टाइम लॅप्स, एआर स्टिकर, बोकेह मोड असे पर्याय उपलब्ध आहेत. त्याशिवाय पुढील कॅमेऱ्यात ‘आर्टिफिशियल इंटिजिजन्स’ तंत्रज्ञान पुरवण्यात आला असून सेल्फी काढताना त्वचेचा रंग, प्रकार, वय, लिंग यांचा अंदाज घेऊन सेल्फी अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. या दोन्ही कॅमेऱ्यांतून काढलेली छायाचित्रे अतिशय आकर्षक आणि सुस्पष्ट वाटतात. अंधाऱ्या जागेतही छायाचित्रे व्यवस्थित निघतात.

सॉफ्टवेअर, हार्डवेअर

‘रीयलमी१’मध्ये ऑक्टाकोअर मीडिया टेक पी६० प्रोसेसर असून तो २ गिगाहार्ट्झ क्षमतेचा आहे. सहा जीबी रॅममुळे फोन सर्व आज्ञावली अतिशय वेगाने पूर्ण करतो. अ‍ॅण्ड्रॉइड ८.१ अर्थात ओरियो ऑपरेटिंग सिस्टीममुळे फोनचा इंटरफेसही अतिशय कार्यक्षम आहे. तर स्टोअरेजही पुरेशी आहे. या फोनमध्ये ३४१० एमएएच क्षमतेची बॅटरी असून ती साधारणत: एक दिवस व्यवस्थित चालते.

आमच्या मते

‘ओप्पो’ने ‘रीयलमी१’ हा तीन किंमतश्रेणीत उपलब्ध करून दिला आहे. या तिन्ही श्रेणीतील फोन १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे आहेत. या किमतीच्या तुलनेत ‘रीयलमी१’ हा अतिशय चांगला आणि दर्जेदार फोन आहे.

asif.bagwan@expressindia.com