उन्हाळ्यात भटकंती म्हटले की डोळ्यासमोर फक्त हिमालयच येतो. आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळे वातावरण, हवामान आणि निसर्ग. १०-१५ दिवस हिमालयात जाऊन आल्यावर पुढचे वर्ष कसे मजेत जाते. पण प्रत्येक वेळी आणि प्रत्येकाला हिमालयात जाणे काही शक्य नसते. अशा वेळी आपल्या महाराष्ट्रात भटकण्यासाठीसुद्धा काही छान ठिकाणे आहेत. एक गोष्ट नक्की की उन्हाळ्यामुळे काही प्रदेश हे भटकंतीसाठी अगदीच वज्र्य होतात, परंतु तरीसुद्धा आपल्या निसर्गसंपन्न महाराष्ट्रात भटकंतीच्या पर्यायांची काही कमतरता नाही. अशा वेळी अर्थातच आपल्या मदतीला येतो आपला सखा सह्याद्री!

सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर कुठेही गेलात तरी उन्हाचे चटके जाणवणार नाहीत. मुख्यत्वे घाटमाथ्यावर केलेली भ्रमंती तर फारच सुरेख! कोकणात जाताना कायमच कुठलाना कुठला घाट उतरूनच जावे लागते. पण उन्हाळ्यात घाट न उतरता माथ्यावरच थांबावे. गगनबावडा, आंबा, आंबोली, राधानगरी ही अशीच काही ठिकाणे. ऐन घाटमाथ्यावर असल्यामुळे इथली हवा अगदी आल्हाददायक असते. पहाटे आणि संध्याकाळी इथे हमखास गार वारे वाहतात. पळस, पांगारा, काटेसावर ही झाडे आपल्या अंगावर भडक रंगाची फुले लेवून नटून बसलेली फक्त याच काळात पाहायला मिळतात.

ऐन घाटमाथ्यावरचे ठिकाण म्हणजे आहुपे घाट. इथे असलेली देवराई आणि गर्द झाडी पाहून तिथून पाय हलत नाहीत. ट्रेकिंगची हौस असेल तर आहुपे घाट उतरून खाली जावे. साथीला गोरखगड आणि त्याचा मच्छिंद्र सुळका कायम असतो. त्याच्या उत्तरेला जुन्नर परिसरात जावे. एका बाजूने नगर आणि दुसऱ्या बाजूने ठाणे जिल्ह्याने वेढलेला हा प्रदेश. कुकडी नदीच्या खोऱ्यामुळे समृद्ध आहे. जुन्नरला मुक्काम करून नाणेघाट, दाऱ्याघाट आणि अंजनावळेच्या जवळ असलेले भोरांडय़ाचे दार पाहावे. पायात बळ असेल तर हे घाटमार्ग पायदळी तुडवावेत. सोबत माहीतगार व्यक्ती असणे मात्र गरजेचे आहे. कुठल्याही घाटमाथ्यावरून सूर्यास्ताचा नजारा बघणे, यासारखे दुसरे सुख नाही.

नगर जिल्ह्यातील भंडारदरा इथे मुक्काम करावा आणि तो सगळा परिसर फिरून पाहावा. साम्रद, रतनगड, रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, घाटघर, तिथून दिसणारे अलंग-मदन-कुलंग हे बेलाग दुर्ग, भंडारदरा इथला जलाशय हे सगळे अविस्मरणीय असते. ऐन उन्हाळ्यात इथे अवश्य भटकावे. नुसते फिरावे किंवा ट्रेकिंगची आवड असल्यास तसे करावे. हा सगळाच प्रदेश रमणीय आहे.   महाबळेश्वर गर्दीने ओसंडून वाहत असते म्हणून ते टाळावे, पण त्याच्याच जवळ असलेली तापोळा, बामणोली ही ठिकाणे मुद्दाम पाहावीत अशी आहेत. महाबळेश्वरवरून कोकणात उतरणारा आंबेनळी घाट रस्ता कुंभरोशीला सोडून आत प्रतापगडाकडे वळावे. तो रस्ता फारच अप्रतिम आहे. वाटेत पारच्या वरदायिनीचे दर्शन घेऊन सरळ मकरंदगडाकडे जावे. हातलोट, चतुर्बेटकडे जाणारा रस्ता आपल्याला निसर्गाचे निराळेच रूप दाखवतो. ट्रेकिंगसाठी सवड असेल तर मकरंदगडला आवर्जून भेट द्यावी. नाही तर हातलोट गावी जाऊन तिथून खाली कोकणात उतरणारा पायरस्ता निरखावा. आंबा, फणस, करवंद, पिंपळ यांची साथ आपल्याला कायम असते.

कोकणात खेडपर्यंत जावे आणि तिथून रघुवीर घाटाने वर चढावे. चकदेव या अगदी आगळ्यावेगळ्या ठिकाणाला भेट देता येईल. जावळीच्या जंगलात वसलेले हे शिवस्थान आणि तिथला परिसर निसर्गरम्य आहे. कोयना जलाशयाला लागून असलेला हा प्रदेश! मेटशिंदी, वाघाळे ही ऐन जलाशयाच्या काठावरची गावे. चकदेववरून पर्वत, महिमंडणगड, मकरंदगड हा सगळा परिसर न्याहाळता येतो. हा सगळा जावळीचा प्रदेश. उचाट आणि कांदाट नदीच्या खोऱ्यातला रमणीय भाग. आजही हा भाग हिरवागार असते तर शिवकाळात किती गर्द झाडी असेल याची कल्पनाच केलेली बरी.

नाशिक जिल्ह्यातसुद्धा उन्हाळ्यात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. प्रसिद्ध त्र्यंबकेश्वरच्या पुढे श्री घाटाच्या परिसरात हर्षगड, भास्करगड हे किल्ले आणि तो परिसर पाहण्यासारखा आहे. नाशिकवरून सटाणा इथे जावे. तिथून पुढे ताहाराबाद फाटय़ावरून आत साल्हेर-सालोटा-मुल्हेर हे किल्ले, तसेच त्याच्या समोर असलेले मांगी-तुंगीचे जुळे डोंगर आणि त्यात असलेली जैन लेणी आवर्जून पहावीत. साल्हेर हा महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला. गुजरात आणि ठाणे जिल्ह्याला लागून असलेला.  त्या किल्ल्यावर उभे राहून भन्नाट वारा अनुभवावा. सटाणा इथे राहून बागलाणचा समृद्ध परिसर फिरता येईल. जशी सवड असेल त्याप्रमाणे दोन किंवा चार दिवस फिरावे अशी ठिकाणे आपल्या महाराष्ट्रात विखुरलेली आहेत. इथे अभयारण्येसुद्धा आहेत, परंतु त्या ठिकाणी आधीच आरक्षण करावे लागते. ते झाले तर वन्यजीव जवळून पाहण्याची ती एक मोठी संधी असते. पण ही आरक्षणे खूप आधी होत असल्यामुळे तो पर्याय सोडून द्यावा लागतो. तरीसुद्धा अनेक वेगळी ठिकाणे आहेत. कोकणात उतरले तर तिथेसुद्धा भरपूर पर्याय असतात. पण कोकणात उन्हाळ्याचा त्रासदेखील होण्याची शक्यता असते, त्यामुळे घाटमाथा हा उत्तम पर्याय ठरतो.

उन्हाळ्यातील भ्रमंतीचे फायदे

उन्हाळी भटकंतीचे खूप फायदेसुद्धा आहेत. मुळात वसंत ऋतू असल्यामुळे आंबा, फणस, काजू, करवंद, जांभूळ ही फळे याच वेळी मिळतात. अनेक वृक्षांची पाने गळत असल्यामुळे त्यावर बसणारे पक्षी पाहणे ही पक्षीनिरीक्षकांसाठी मोठी पर्वणी असते. वृक्ष जरी निष्पर्ण झाले तरीसुद्धा पळस, पांगारा, सावर, बहावा या झाडांना येणारी फुले ही ऐन उन्हाळ्यात केवळ अप्रतिम दिसतात. विविध रंगांची उधळण या वेळी रानोमाळ झालेली पाहता येते. आकाशदर्शनासाठी उन्हाळ्यातील रात्री हा अगदी योग्य कालावधी असतो. वद्य पक्षातली रात्र कुठल्या तरी उंच किल्ल्यावर किंवा गावापासून लांब असलेल्या ठिकाणी ग्रह-ताऱ्यांच्या निरीक्षणात घालवणे हे फक्त उन्हाळ्यातच शक्य होऊ शकते.

ashutosh.treks@gmail.com