सूर्य डोळे वटारू लागला आणि पारा चढू लागला की भटक्यांची पावले उत्तर भारताकडे वळतात. भारताच्या पूर्वेपासून ते उत्तरेपर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या कुशीत वसलेले एक सदाबहार आणि सुपरहिट राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. सतलज, रावी, बियास, स्पिती, चम्बा अशा नद्यांनी सुजलाम् सुफलाम् झालेल्या, पर्वतांच्या माथ्यावर बर्फाचे मुकुट मिरवणाऱ्या आणि सूचिपर्णी अरण्याची हिरवाई धारण केलेल्या या राज्यातील पर्यटन म्हणजे मनमोहन देसाई किंवा डेव्हिड धवनच्या फुल्ल टू मसाला चित्रपटासारखा दिल खूश करणारा अनुभव..

हिमाचल म्हटल्यावर सर्वात आधी जोडी आठवते ती शिमला-मनाली. अगदी शंकर-जयकिशन किंवा धरम-हेमासारखीच हीसुद्धा एव्हरग्रीन जोडी. साधारणत: सहा ते आठ दिवसांत तुम्ही शिमला-मनालीची सहल करू शकता. चंदिगड, दिल्ली-आग्राही पाहता येते. उन्हाळ्यात जाणार असाल तर विमानाने चंदिगढ गाठून शिमल्याहून सुरुवात करावी. शिमल्याकडे येण्याचा एक झक्कास पर्याय म्हणजे कालका-शिमला पहाडी रेल्वे. १०० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही टॉय ट्रेन आजही त्याच रुबाबात धावते. ७,८६४ फुटांवर सात टेकडय़ांच्या माथ्यावर वसलेले शिमला ब्रिटिशकाळात भारताची उन्हाळी राजधानी होते. तो रुबाब आजही इथल्या व्हॉइसरॉयचा बंगला, ख्राइस्ट चर्चसारख्या दगडी वास्तूंमधून दिसतो. मॉल रोडवर फिरत स्कँडल पॉइंटवर जाणे जसे अनिवार्य आहे तसेच जवळच्या चैल येथील पतियाळाच्या महाराजांच्या पॅलेसला, सर्वात उंचावरच्या क्रिकेट ग्राऊंडला, कुफ्रीतल्या हिमालयातील प्राणीसंग्रहालयाला भेट देणेही आवश्यक आहे.

Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

शिमल्याहून मनालीकडे जाताना वाटेत कुल्लू घाटी लागते. येथील उबदार शाली आणि इथे साजरा होणारा दशहरा उत्सव पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. कुल्लूतले वळणदार रस्ते, बाजूने वाहणारी बियास आणि साद घालणारी हिमशिखरे पाहत आपण मनालीला पोहोचतो. इथे कुल्लू खोऱ्याची माता- हिडिंबा देवीचे दर्शन घ्यायलाच हवे. भीमाच्या पत्नीचे हे पॅगोडा शैलीतील देऊळ पाहिल्यावर खरोखरच आपण महाभारतकालीन वास्तू पाहतोय असा भास होतो. मनालीचे मुख्य आकर्षण म्हणजे १३,०५० फुटांवरील रोहतांग पास. इथे पहाडी सौंदर्याचे थक्क करणारे दर्शन तर घडते. रस्ता वर्षभर बर्फाच्छादित असल्याने ऐन उन्हाळ्यातही बर्फात खेळण्याचा आनंद लुटता येतो. सोलंग व्हॅलीतले साहसी खेळ आणि बियासच्या प्रवाहातील राफ्टिंगचा थरार अनुभवायलाच हवा.

वसिष्ट कुंडातील गरम पाण्यात डुबकी मारायला विसरू नका. हिमशिखरांच्या जवळ आपोआप उकळलेले पाणी म्हणजे निसर्गाचा चमत्कारच! नग्गर येथील ५०० वर्षांपूर्वीचा कलात्मक राजवाडा अवश्य पाहा. तिथेच निकोलस रोअरिच या रशियन चित्रकाराची आर्ट गॅलरी आहे, जिथे त्याने काढलेली हिमालयाची अप्रतिम चित्रे पाहायला मिळतात.

हिमाचलचा दुसरा चेहरा म्हणजे, धौलधार आणि झंस्कार पर्वतरांगांमध्ये वसलेले डलहौसी, चम्बा, खज्जियार, धरमशाला. डलहौसी या गावाला तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याचे नाव दिले आहे आणि याच गावात क्रांतिकारक भगतसिंग यांचे काका अजितसिंग यांचे स्मारक आहे. डलहौसीजवळच मिनी स्वित्र्झलड म्हणून प्रसिद्ध असलेले खज्जियार आहे. रावी नदीकाठच्या चम्बा गावात १० व्या शतकातले शिखर शैलीतले लक्ष्मी-नारायण मंदिर आहे. कांग्रा व्हॅलीतील धरमशाला ही या राज्याची हिवाळी राजधानी! धरमशालात जगभरातले पर्यटक येतात, ते दलाई लामांचे वसतिस्थान पाहण्यासाठी. येथील मॅकलोडगंज भागात तिबेटमधील नामग्याल मॉनेस्ट्रीची प्रतिकृती आहे. धरमशालाजवळ ५२ शक्तिपिठांपैकी एक असलेले ज्वालाजी मंदिर आहे. पुराणकथेनुसार जळणाऱ्या सतीचे शरीर हातात घेऊन शिवशंकर तांडव करत असताना, सतीची जीभ इथे पडली आणि त्याचे प्रतीक म्हणून जमिनीतून ज्वाळा वर आली. ही अखंड ज्वाळा आजही पाहायला मिळते.

येथून अमृतसरला गेल्यास विमानाने येण्या-जाण्याचा कार्यक्रम आखता येईल. सात-आठ दिवसांत ही ठिकाणे पाहून होतात. या ठिकाणांबरोबर शिमला-मनालीही पाहायचे असेल तर १२-१३ दिवसांची सवड काढावी.

अनवट भाग

हिमाचल प्रदेशमधील ऑफ बीट ठिकाण म्हणजे स्पिती व्हॅली. हिमाचल प्रदेशची हद्द जिथे लडाखला भिडली आहे, तिथला हा प्रदेश म्हणजे हिमालयाच्या रौद्रसुंदर रूपाचं दर्शन घडवणारा अनवट भाग. शिमल्याहून नारकंडाकडे कूच करून स्पिती व्हॅलीचा प्रवास सुरू केला जातो. नारकंडा, सांगला, काल्पा, नाको, टाबो, काझा, लांग्झा, कुंझूम पासनंतर तुम्ही जेव्हा चंद्रतालला येता तेव्हा खडतर प्रवासाचे सार्थक होते. इथे इंडो-तिबेट सरहद्दीवरचे चिटकूल गाव, हिक्कीमचे जगातले सर्वात उंचावरचे टपाल कार्यालय, प्राचीन के मॉनेस्ट्री अशी ठिकाणे पाहायला मिळतात. मात्र स्पितीला भेट द्यायची तर किमान १० दिवस आणि भरपूर संयम हवा.

– मकरंद जोशी

makarandvj@gmail.com