इंडोनेशिया हा देश आज अधिकृतपणे मुस्लीम देश म्हणून ओळखला जात असला तरी याच इंडोनेशियात हिंदू आणि बौद्ध धर्माची खूप मोठी वारसास्थळं आहेत. आजच्या काळातदेखील त्या वारसास्थळांची अतिशय निगुतीने काळजी घेतली जाते. तेथील स्वच्छतेतूनही ते दिसून येते. इंडोनेशियातील बुद्धाचा वारसा असणारे बोरोबुद्दुर म्हणजे एक अप्रतिम वास्तुवैभव तर आहेच पण त्याहीपेक्षा ते जगभरातील बौद्ध धर्माच्या अभ्यासकांच्या कुतूहलाचे केंद्र आहे.

बोरोबुद्दुर येथील एखाद्या पिरॅमिडसारखी दिसणारी दहामजली भव्य वास्तू बुद्धाच्या निर्वाणाचा मार्ग मांडते. साधारण आयातकृती रचना असणारी ही प्रचंड वास्तू त्यातील प्रत्येक टप्प्यामागील भावार्थ जाणून घ्यावा अशी आहे. येथे असंख्य शिल्पपट्टिका कोरलेल्या आढळतात. सिद्धार्थ ते बुद्ध असा सारा प्रवास, जातक कथा आणि निर्वाण मार्गाचे १० टप्पे असा खूप मोठा पट येथे उलगडला आहे. वास्तूवर बुद्धाच्या चार मुद्रा दर्शविणाऱ्या ५०४ मूर्ती असून २६७२ इतक्या शिल्पपट्टिका आहेत. आजही अनेक शिल्पपट्टिकांचा अर्थ पूर्णत: उलगडलेला नाही. ललित विस्तारची शिल्पे कोरलेल्या पट्टिकांचा अर्थ उलगडला आहे. बाकी काम अजून सुरूच आहे. तेथील ही शिल्पकला जर मार्गदर्शकांकडून समजावून घेता आली तर उत्तम, अन्यथा त्याचा सहज बोध होत नाही.

नवव्या शतकातील सैलेंद्रच्या काळातील हे बांधकाम मधल्या काळात ज्वालामुखीने जवळपास उद्ध्वस्त झाले होते. १२व्या शतकात तर सारी भिस्त निसर्गावरच होती. अठराव्या शतकात जावानीज लोकांनी येथे भेटी दिल्याचे काही उल्लेख सापडतात. पण बोरोबुद्दुर खऱ्या अर्थाने प्रकाशात आणले ते १८१५ मध्ये सर स्टॅमफोर्ड राफेल्स या ब्रिटिशाने. त्याने या वास्तूच्या संवर्धनाचे काही प्रयत्नदेखील केले. नंतर १८८५ मध्ये इजरमान यांच्या काळात येथे बरेच उत्खनन झाले. जमिनीखाली गाडल्या गेलेल्या संस्कृत भाषेतील शिलालेखांवरून याचा काळ ठरवण्यात आला.

१९०७ मध्ये व्हॅन इर्प या डच व्यक्तीने चार वर्षे पुन्हा उभारण्याचे काम केले. त्यामुळे ही वास्तू काही प्रमाणात आकारास आली, टिकून राहिली. मात्र त्या कामात काही त्रुटी राहिल्या होत्या. काही शिल्पांतील जोडकाम संदर्भ नीट लावण्यात आले नव्हते. १९५६ पासून मात्र युनेस्कोचे लक्ष या वास्तूकडे गेले. १९६३ ते १९६८ या काळात प्रचंड मोठे काम हाती घेतले गेले. जगभरातील तज्ज्ञांनी येथे डेरा टाकला. आणि आज दिसणारे बोरोबुद्दूर पुन्हा उभे राहिले.

हा सारा परिसर दोन भागांत विभागला आहे. मुख्य वास्तू आणि परिसरातील उद्यान. उद्यान परिसरात वस्तुसंग्रहालय, जहाज संग्रहायल, माहिती केंद्र, अभ्यास केंद्र अशा अनेक सोयीसुविधा आहेत. उद्यानात हत्तीवरून व छोटय़ा ट्रेनमधून सफारीची सुविधा आहे.

नवव्या शतकातील निर्माणकर्त्यांच्या कल्पकेतेला, कौशल्याला तर दाद द्यावीच लागेल, पण आजदेखील हे सारे इतक्या आत्मीयतेने जोपासणाऱ्यांनाही सलाम करावा असे नक्कीच वाटत राहते.

जतन अनुकरणीय..

तब्बल ७०० कर्मचारी येथे कार्यरत आहेत. जागृत ज्वालामुखीचे संकट आजही आहेच. पण येथील यंत्रणा हवामान खात्याशी सतत संपकात असते. धूलिकणांनी या वास्तूवर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून संकटाची चाहूल लागताच संपूर्ण वास्तू झाकता येईल अशी प्लास्टिकची आच्छादने जपान सरकारने पुरवली आहेत.

आपत्कालीन प्रसंगाला तोंड देण्यासाठी स्वयंसेवकांची मोठी फौज आहे. बोरोबुद्दुरला एकावेळी १५ हजारांहून अधिक पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही.

महत्त्वाचे म्हणजे येथे कमालीची स्वच्छता आहे. पण ‘कचरा टाकल्यास दंड’ अशा आशयाचा फलक कोठेच दिसत नाही. ऐतिहासिक वारसा जपण्याची त्यांची धडपड नक्कीच अनुकरणीय आहे.

कसे जावे?

बोरोबुद्दुरसाठी जवळचे शहर म्हणजे योग्यकर्ता (जोग्जाकर्ता). बाली, जकार्ता येथून नियमित विमानसेवा आहे. बालीतील वास्तव्याला जोडून हा प्रवास करता येऊ  शकतो. तसेच त्यासोबतच प्रांबनन प्लेन हा नवव्या शतकातील हिंदू मंदिर समूहदेखील पाहता येईल. योग्यकर्तामध्ये किमान दोन दिवसांचा मुक्काम करावा.

joshisuhas@gmail.com