08 December 2019

News Flash

शिल्पसमृद्ध राणी की वाव

इसवीसनाच्या ११ व्या शतकात गुजरातमध्ये सोळंकी या बलाढय़ घराण्याचे राज्य होते.

आशुतोष बापट vidyashriputra@gmail.com

बाटलीबंद पाण्याचे युग अवतरण्याआधी, शेकडो वर्षांपूर्वी मजल-दरमजल करत येणाऱ्या वाटसरूंची तहान भागवण्यासाठी अनेक विहिरी, पाणपोया बांधल्या गेल्या. त्यातील काही सर्वसाधारण होत्या आणि काळाच्या ओघात नाहीशा झाल्या. पण काही खास होत्या आणि आज बाटलीबंद पाण्याच्या युगातही त्यांचं अस्तित्व खास ठरत आहे. गुजरातमधील राणी की वाव अशा काळावर मात करून तगून राहिलेल्या, आजही आपले शिल्पवैभव मिरवणाऱ्या विहिरींपैकी एक आहे.

तहानलेल्याला पाणी देणे हे सर्वोच्च पुण्यकर्म समजले गेले आहे. त्यामुळेच अगदी प्राचीन काळापासून विविध राजवटींत पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसते. मग त्यात पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेला ‘सुदर्शन तलाव’ असेल, बौद्ध लेणींच्या निर्मितीवेळी खोदलेली पाण्याची पोढी आणि त्यासाठी दिलेले दान असेल, साताऱ्याजवळ लिंब इथे शेतीसाठी खोदलेली १५ मोटांची विहीर वा वाटसरूला पाणी मिळावे म्हणून महामार्गावर बांधलेल्या पाणपोई. या विहिरी तत्कालीन राज्यकर्त्यांनी तर कधी समाजातील दानशूर व्यक्तींनी खोदून घेतल्या. पुढील काळात नुसत्याच विहिरी न खोदता त्या शिल्पसमृद्ध केल्या जाऊ  लागल्या. अशा विहिरी हे स्थापत्याचे एक वैशिष्टय़पूर्ण अंगच झाले.

पाण्याच्या कमतरतेमुळे गुजरात आणि राजस्थानात फार पूर्वीपासून जमिनीत खोलवर खोदून विहिरी बांधण्याची पद्धत अवलंबली जात होती. खोलवर असलेल्या जलसाठय़ापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या बांधल्याचे याठिकाणी आढळते. अशा विहिरी खोदताना मग त्यात कलाकार आपले कसब दाखवू लागले. त्यांना राजाश्रय मिळत गेला, विपुल पैसा उपलब्ध होऊ  लागला आणि मग अशा काही अद्वितीय कलाकृती जन्माला आल्या की संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले.

पाटण इथली राणी की वाव हे त्याचेच सर्वागसुंदर उदाहरण! गुजरातेत विहिरीला वाव किंवा वावडी असे म्हणतात. संस्कृत मध्ये वापी हा शब्द विहिरीसाठी वापरला जातो. वाव हे त्याचेच रूप असावे. पाटणची राणी की वाव म्हणजे शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे. छोटी-मोठी मिळून इथे जवळजवळ तीन हजार शिल्पे कोरलेली आहेत. शिल्पसमृद्धी, शिल्पश्रीमंती हे शब्द अपुरे पडावेत एवढे शिल्पांचे प्रचंड भांडार इथे आहे. हे सर्व पाहून खरोखरच डोळे थकतात.

इसवीसनाच्या ११ व्या शतकात गुजरातमध्ये सोळंकी या बलाढय़ घराण्याचे राज्य होते. या ऐश्वर्यसंपन्न घराण्याची राजधानी होती अनहिलपूर किंवा अनहिलपताका म्हणजेच आजचे मेहसाणा जिल्ह्यातील पाटण हे गाव. सोळंकी घराण्यातील राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ त्याची पत्नी राणी उदयमती हिने आपल्या राजधानीच्या गावी या शिल्पसमृद्ध विहिरीची निर्मिती केली. राणीने बांधलेली विहीर म्हणून तिचे नाव राणी की वाव असे पडले.

अंदाजे ६४ मीटर लांब, २० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल अशी ही विहीर इ.स. १०५० मध्ये बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. मेरुंगसुरी यांनी इ.स.१३०४ मध्ये लिहिलेल्या प्रबंध चिंतामणी या ग्रंथात राणीने बांधलेल्या या विहिरीचा उल्लेख सापडतो. ही संपूर्ण विहीर मातीखाली दबली गेली होती. त्याचे काहीही अवशेष दिसत नव्हते. कालौघात मातीची धूप झाली आणि या विहिरीच्या वरच्या थरातील काही शिल्पे दिसू लागली. या वास्तूला खऱ्या अर्थाने उजाळा मिळाला, तो १९८३ साली. भारतीय पुरातत्त्व खात्याचे या शिल्प खजिन्याकडे लक्ष गेले. काळाच्या ओघात जमिनीत दडलेले हे शिल्पलेणे त्यांनी अथक प्रयत्नांतून लोकांसमोर आणले.

वरून खाली निमुळती होत जाणारी ही विहीर सात मजली आहे. यात विस्तीर्ण पायऱ्या आणि बहुमजली चौक यांचा समावेश आहे. पश्चिमेकडून प्रवेशमार्ग असलेल्या या विहिरीच्या दोन्ही बाजूंच्या म्हणजे दक्षिण व उत्तर भिंतींवर असंख्य मूर्ती आणि शिल्पे कोरलेली आहेत. या दक्षिण व उत्तर भिंतींना जोडणारे पूल आणि त्यांच्या ओवऱ्या नजर खिळवून ठेवतात. जसजसे आपण खाली जातो तसे तसे मध्ये मध्ये पूल आणि त्यावर ओवऱ्या आहेत. ओवऱ्यांचे खांबसुद्धा बारीक कलाकुसरयुक्त असून यक्ष, कीर्तीमुखे यांची रेलचेल या खांबांवर दिसते.

शेषशायी विष्णू, विष्णूचे दशावतार, त्याचबरोबर वीस हातांचा विविध आयुधे धारण केलेला शिव, सोळा हातांची महिषासुरमर्दिनी, आलसिका, दर्पणा, कर्पूरमंजरी, पुत्रवल्लभा या सुरसुंदरी, गणपती, चार हातांचा हनुमान, अष्टवसू अशा असंख्य मूर्ती या विहिरीवर कोरलेल्या आहेत. गुजरातचे वैभव असलेल्या या विहिरीला २०१४ साली जागतिक वारसा स्थळाचा मान प्राप्त झाला. राणी की वाव हे एक उदाहरण झाले. अशाच अनेक विहिरी गुजरात आणि राजस्थानात पाहायला मिळतात. कदाचित त्यावर केलेले शिल्पकाम कमी-जास्त असेल, परंतु पायऱ्या असलेली विहीर आणि त्यामुळे केलेली पाण्याची सोय महत्त्वाची ठरते. पाणी हे जीवन आहे या वाक्याचा अर्थ ज्या ठिकाणी मैलोनमैल पाणी नजरेसदेखील पडत नाही अशा ठिकाणी नेमका समजतो. या पायऱ्या असलेल्या शिल्पसमृद्ध विहिरी पाहून, नुसती पिण्याच्या पाण्याची सोयच नव्हे तर त्याचसोबत एक देखणे शिल्पजडित स्थापत्य घडवणे ही आपल्या पूर्वजांची सौंदर्यदृष्टी आपल्याला खरोखर चकित करून जाते.

First Published on February 8, 2019 12:16 am

Web Title: historical facts about rani ki vav in gujarat
Just Now!
X