काही गावांच्या नावातूनच इतिहास डोकावतो. पुणे जिल्ह्य़ातील मावळ तालुक्यातील तळेगावही असेच! हे गाव मराठेशाहीतील पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात मिळालं. त्यामुळेच या नावाचं ‘तळेगाव दाभाडे’ असं नामकरण झालं. या परिसरात ऐतिहासिक, सामाजिक, औद्योगिक, साहित्यिक पाश्र्वभूमी लाभलेली अनेक पर्यटनस्थळे इथे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओंकार वर्तले

सरदार दाभाडे यांचा वाडा, गो. नी. दांडेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या वास्तू, महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात एकेकाळी भर घालणारा पैसाफंड काचकारखाना, शिक्षण महर्षी अण्णासाहेब विजापूरकर यांनी उभी केलेली शिक्षणसंकुले.. तळेगावात असं बरंच काही पाहता येतं. पण काळाच्या ओघात नव्याने विकसित होऊ  घातलेली औद्य्ोगिक वसाहत, शैक्षणिक संकुले यामुळे जुन्या तळेगावचं रूप झपाटय़ाने पालटू लागलं आहे. एकेकाळी इतिहासात प्रसिद्ध असलेलं हे गाव आता शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करू लागलं आहे. येथील काही ठिकाणे मात्र अजूनही जुन्या काळाची साक्ष देतात.

बनेश्वर मंदिर

छोटे बांधीव तळे (काही अभ्यासक याला पुष्करणीदेखील म्हणतात) नंदीमंडप, सभामंडप व गाभारा अशी या मंदिराची ढोबळ रचना आहे. या तळ्यावर पाणी उपसणाऱ्या मोटीसाठी जागा दिसते. तळ्यातील पाणी शेतीसाठी वापरले जात असण्याची शक्यता आहे. परंतु नंतरच्या काळात यातले पाणी वापरण्याजोगे न राहिल्याने तळ्याला ‘नासके तळे’ असेही म्हटले जाऊ लागले. तळ्यात उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या बांधलेल्या  दिसतात. हे तळे पाहून झाले की मग येतो नंदीमंडप. चार खांबांवर उभा असलेला हा मंडप संपूर्ण दगडात उभारला आहे. मुख्य मंदिराला न जोडता काही अंतरावर उभारला आहे. यातील नंदीची मूर्ती तर मंडपाहूनही देखणी. रिवाजाप्रमाणे नंदीवर माथा टेकवून पूर्वाभिमुख बनेश्वर मंदिराच्या सभा मंडपात जावे. संपूर्ण दगडात उभारलेल्या या मंदिराची स्थापत्य रचना खूपच आकर्षक आहे. सभामंडपात एकूण १६ खांब आहेत. खांबावर विशेष नक्षीकाम नसले तरी त्यांचे चौकोनी आणि गोल आकार मात्र पाहण्यासारखे आहेत. सभामंडपासमोरील छोटय़ाशा प्रवेशद्वारातून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. आतमध्ये खूपच सुंदर शिवपिंड आहे. गाभाऱ्यातील धीरगंभीर वातावरण व गारवा आवर्जून अनुभवावा असाच आहे. शेजारीच सरदार खंडेराव दाभाडे यांची समाधीही आहे.

आगळं-वेगळं पाच पांडव मंदिर

पाच पांडव मंदिर हे पांडवांचे संपूर्ण भारतातील दुसरे आणि महाराष्ट्रातील एकमेव मंदिर  आहे. तळेगावला आलो की थेट चावडी चौक गाठायचा. या चावडीच्या मागेच नागरीवस्तीत सामावलेलं छोटेखानी मंदिर नजरेस पडतं. पहिल्या खोलीत साधारण साडेचार फूट उंचीच्या पांडवांच्या बैठय़ा मूर्ती एकमेकांशेजारी ओळीत आहेत. डाव्या बाजूने सुरुवात केल्यास धर्मराज युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव अशा क्रमाने मूर्ती मांडलेल्या आहेत. धर्मराज युधिष्ठिर आणि भीम या दोन मूर्तीच्या मधोमध भिंतीला एक छोटीशी खिडकी दिसते. याच खिडकीतून द्रौपदीचे दर्शन घडते. पण ही मूर्ती पूर्णपणे पाहण्यासाठी आपल्याला आतल्या खोलीत जावे लागते. आत गेलो की, एका छोटय़ाशा चौथऱ्यावर द्रोपदी एका कुशीवर निजलेल्या स्थितीत दिसते.

घुमटाची विहीर

पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडेंच्या काळात निर्मिली गेलेली आणि वास्तुस्थापत्याचा सुंदर आविष्कार असलेली ही विहीर पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित का राहिली याचे आश्चर्यच वाटते. विहिरीजवळच्या घुमटाकार वास्तूमुळे विहिरीचं नाव ‘घुमटाची विहीर’ असे पडले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. बांधकाम घडीव दगडातच झालेले आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. आतील बाजूस मध्यभागी एक धक्का बांधलेला दिसतो. मध्यभागी दोन कमानी आहेत. त्यावर शिलालेखही कोरलेला आहे. या विहिरीवर दोन मोटी चालायच्या. त्यांचे धक्केही दिसतात. इतिहासकारांच्या मते या मोटीद्वारे शेतीला पाणी पुरवले जाई. विहिरीच्या आत छोटे शिवमंदिर आहे. विहिरीच्या बांधणीत किती मुद्दे विचारात घेतले आहेत हे पाहून आपण स्तंभित होतो.

बामणडोह

शिवलिंगाच्या आकाराची ही विहीर घुमटाच्या विहिरीसारखीच सुंदर आहे. संपूर्ण दगडातच बांधलेल्या या विहिरीत उतरण्यासाठी पूर्वेकडून पायऱ्या आहेत. साधारण मध्यभागी आलो की आतमध्ये फिरण्यासाठी गवाक्षांचा अर्धवर्तुळाकार मार्ग दिसतो आणि पाहणारा चकित होतो. बाहेर आलो की विहिरीवर असलेल्या मोटेच्या धक्क्य़ापाशी जावे. पाणी उपसण्यासाठी अशी बांधकामे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आढळतात.

सरसेनापती उमाबाई दाभाडे यांची समाधी

पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी उमाबाईंनी १७३२ साली खान ए खान जोरावर खान बाबी याचा गुजरातेत पराभव केला. एका महिला योद्धय़ाची ही अतुलनीय कामगिरी पाहून छत्रपती शाहू महाराजांनी उमाबाईंना सातारा येथे सोन्याचे तोडे, रत्नजडित तलवार व मानाची वस्त्रे देऊन सन्मानित केले. त्यांची समाधी बनेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच दिसते.

ovartale@gmail.com

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historical talegaon in the pune district
First published on: 12-10-2018 at 03:20 IST