वैभव भाकरे

२०३० पर्यंत पेट्रोल आणि डिझेल गाडय़ा देशातून हद्दपार करून केवळ इलेक्ट्रिक गाडय़ांना परवानगी देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक कार उत्पादकांना करात सूट देण्यात आली आहे. देशातील अनेक मोठय़ा कार उत्पादक कंपन्या येत्या काही वर्षांत त्यांच्या इलेक्ट्रिक गाडय़ा भारतीय कार बाजारात दखल करणार आहेत. म्हणूनच या गाडय़ांबाबत लोकांच्या मनातही कुतूहल वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना २१ व्या शतकात महत्त्व प्राप्त झाले असले तरी इलेक्ट्रिक वाहनाची संकल्पना ही काही नवीन नाही.

२०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत घोडागाडी, बैलगाडी हेच जमिनीवरील प्रवासाचे प्रमुख माध्यम होते. औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला. त्यासह प्रवासाचे नवे पर्याय शोधण्याचा, निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला.

यावेळी पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि वाफेच्या इंजिनाचा वापर केला जात होता. हे तिघांपैकी कोण वाहन क्षेत्रात मक्तेदारी निर्माण करणार याबाबत प्रश्नचिन्ह होते. वाफेच्या इंजिनाचा वापर या काळात मोठय़ा प्रमाणात केला जात होता. वाफेचे इंजिन कसे काम करते हे लोकांना कळत होते. त्याच्या कामावर लोकांचा विश्वास होता. वाफेवर चालणाऱ्या इंजिनच्या वापर कारखाने, ट्रेन आणि जहाजांमध्ये होत होता. त्यामुळे छोटय़ा वाहनांसाठी देखील वाफेच्या इंजिनाचा वापर होणे अगदी स्वाभाविक होते. १८८४ मध्ये फोर्ड यांची मॉडेल टी बाजारात येण्याआधी लंडन येथे थॉमस पार्कर यांनी उच्च क्षमता असणाऱ्या रिचार्जेबल बॅटरी तयार केल्या होत्या. या बॅटरी वापरून त्यांनी इलेक्ट्रिक कारची निर्मिती केली होती. १८८८ साली जर्मनीत फ्लोकेन इलेट्रोवागेन यांनी इलेक्ट्रिक कार तयार केली होती. मात्र त्या काळी असणाऱ्या रस्त्यांच्या वाईट अवस्थेमुळे या गाडय़ा लांबच्या प्रवासासाठी वापरण्यात अडचणी येत होत्या. १९१० दरम्यान विजेचा वापर वाढल्यानंतर सामान्य लोकही या इलेक्ट्रिक गाडय़ांची दखल घेऊ  लागले. त्याकाळच्या कार निर्मात्यांनी याची दखल घेतली. ते इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार उत्पादनाबाबत प्रयोग करू लागले. पोर्शेचे संस्थापक फर्डिनांड पोर्शे यांनी पी-१ ही गाडी निर्माण केली. ही त्यांची पहिलीच गाडी होती. थॉमस एडिसन यांनी देखील या काळात इलेक्ट्रिक कारसाठी उच्च क्षमतेच्या बॅटरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. १९१४ मध्ये फोर्ड यांनी परवडणारी इलेक्ट्रिक कार निर्माण करण्यासाठी एडिसन यांच्यासोबत हातमिळवणी केली. परंतु यात गमतीचा भाग म्हणजे १९१२ साली आलेय फोर्ड यांच्या मॉडेल टी किंमत ही ६५० डॉलर एवढी होती. तर इलेक्ट्रिक कारची किंमत या किमतीच्या तीनपट म्हणजेच १७५० डॉलर एवढी होती. दरम्यान पेट्रोल इंजिनमध्ये अनेक सुधारणा होत होत्या. या काळात तेलाचे मोठे साठे आढळत होते आणि इलेक्ट्रिक गाडय़ांच्या अधिकाधिक प्रसारासाठी चांगल्या रस्त्यांचे जाळे विकसित होणे गरजेचे होते. या सर्व बाबींचा परिणाम इलेक्ट्रिक कारच्या विकासावर झाला. कालांतराने या गाडय़ांबाबत असेलेले उद्योजकांचे कुतूहल कमी होऊ  लागले. १९३५ पर्यंत इलेक्ट्रिक गाडय़ा अगदीच नामशेष झाल्या. १९७० च्या इंधन तुटवडय़ादरम्यान इलेक्ट्रिक कारबाबत पुन्हा विचार होऊ लागला. जनरल मोटर्सने १९९० च्या दशकात ई व्ही १ या  इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू केले. यानंतर अनेक कार उत्पादकांनी इलेक्ट्रिक कार संकल्पनेवर काम केले आणि ‘टेस्ला’ने या गाडय़ांना एका वेगळ्याच रूपात जगासमोर आणले आहे.