01 June 2020

News Flash

अपस्मार

लहानपणापासून फिट्स येतात अशी तक्रार करणारे अनेक रुग्ण पाहायला मिळतात.

घरचा आयुर्वेद : वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक

ayurvijay7@gmail.com

लहानपणापासून फिट्स येतात अशी तक्रार करणारे अनेक रुग्ण पाहायला मिळतात. फिट्स येणे ही एक समस्याच त्या कुटुंबात निर्माण झालेली असते. या समस्येला तोंड देता देता त्या रुग्णाची आणि त्याच्या कुटुंबातील इतरांचीही सहनशीलता कमी होत जाते. आयुर्वेदामध्ये फिट्सच्या विकारावर उपचार असून या व्याधीला अपस्मार असे नाव देण्यात आलेले आहे. रुग्णाच्या स्मृतीवर याचा परिणाम होत असल्याने याला अपस्मार असे म्हणतात.

अपस्माराची कारणे – आयुर्वेदीय शास्त्रकारांनी अपस्माराची अनेक कारणे आपल्या संहितातून सांगितली आहेत. विविध इंद्रियांचा हीनयोग-अतियोग मिथ्यायोग हे एक महत्त्वाचे कारण आहे. दुसरे कारण म्हणजे मलिन, अहितकारक असा आहारही याला कारणीभूत ठरतो. विरुद्ध आहारामुळेही अपस्मार होऊ शकतो. विरुद्ध आहारामध्ये केळी-दूध तसेच इतर फळे-दूध, दूध आणि आंबट पदार्थ तसेच मासे आणि दूध अशा मिश्रणांचे सतत सेवन केल्याने हा विकार होऊ शकतो. विरुद्ध आहार ही एक विशेष आयुर्वेदीय संकल्पना आहे. या विरुद्ध आहारामुळे शरीरात अनेक विकृती निर्माण होऊ  शकतात. अपस्मार ही त्यापैकीच एक विकृती होय. आपल्या दिनक्रमातील अहितकारक आचरण हेदेखील अपस्मारास कारणीभूत ठरते. तसेच शरीराबाहेर पडणाऱ्या मलमूत्र आदी गोष्टींचा रोध केल्यासही ही विकृती निर्माण होऊ  शकते. भय, उद्वेग, क्रोध, शोक यांचा मनावर विपरीत परिणाम झाल्याने आणि अन्य कारणांनी रज व तम हे मनोदोष वाढल्याने अपस्मार उत्पन्न होतो.

दोन अवस्था – या व्याधीच्या दोन अवस्था बघावयास मिळतात. १) वेगावस्था २) अवेगावस्था.

वेगवस्था म्हणजे प्रत्यक्ष अपस्माराचा झटका येतो ती अवस्था. ही अवस्था काही काळच टिकते व पुन्हा शांत होते. अवेगावस्थेत रुग्ण सामान्य स्थितीत असतो. शरीरात वात, पित्त, कफ हे तीन दोष असतात. या तिघांपैकी ज्या दोषाची वृद्धी या अपस्मार व्याधीत होते. त्याप्रमाणे त्या दोषांची लक्षणे वेगवस्थेत आपल्याला दिसून येतात आणि त्यावरून अपस्माराचे विशिष्ट निदान करणे सोपे जाते. वातदोषाचे अधिक्य या व्याधीत असल्यास याचे झटके वारंवार येतात. प्रत्येक वेग (झटका) थोडा काळच टिकतो. यामध्ये रुग्ण बडबडतो, रडतो, त्यास श्वास लागतो. त्याच्या तोंडाला फेस येतो, तो दात खातो, त्याची बोटे वाकडी तिकडी होतात. पित्तदोषाची वृद्धी त्यामध्ये असल्यास रुग्णाच्या तोंडास पिवळसर फेस येतो आणि त्यास अतिशय तहान लागते.

कफदोषामुळे होणाऱ्या अपस्मारामध्ये वेगवस्था ही फार काळ टिकते आणि दोन वेगात फार अंतर असते. रुग्णाच्या तोंडातून लाळ गळते. या अपस्माराच्या प्रवृत्तीमुळे रुग्णांमध्ये स्मृतीभ्रंश (स्मरणशक्ती कमी होणे) उत्पन्न होतो, मनाने तो अतिशय हळवा, दुर्बल बनण्याची शक्यता असते.

आयुर्वेदीय उपचारांची दिशा – आयुर्वेदाने वेगावस्थेतील व अवेगावस्थेतील अशी दोन्ही प्रकारची चिकित्सा सांगितलेली आहे. वेगावस्थेत तीक्ष्ण असे नस्य (नाकात औषध टाकणे) दिले जाते. नाकात घालण्यासाठी पिंपळी, सैंधव, कुष्ठ, वेखंड, जेष्ठमध यांची चूर्णे वापरली जातात. अर्थात हे वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नये. केवळ वेगावस्थेची चिकित्सा करून तात्पुरते बरे वाटते, पण वेगावस्था येऊ  नये किंवा वेग कमी तीव्रतेचा यावा यासाठी अवेगावस्थेत रुग्ण असतानाही आयुर्वेदाने यामध्ये अनेक वनस्पतींचा उपयोग सांगितलेला आहे. या वनस्पतींमध्ये ब्राह्मी, जाटामांसी, शंखपुष्पी, वेखंड याचा समावेश आहे. या वनस्पतींपासून बनविलेले काढे, काही चूर्णे अपस्माराच्या रुग्णांसाठी वापरण्यात येतात.

सिद्ध तुपाचा उपयोग :

विविध वनस्पतींच्या काढय़ानी, रसांनी सिद्ध केलेले साजूक तूप अपस्मारावर उत्तम काम करते. ब्राह्मी घृत, वचा घृत, कल्याणक घृत अशा विविध तुपांचा वापर अपस्मारावर केला जातो. यामुळे स्मृती चांगली होते. झटक्यांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. मनोदौर्बल्य कमी होते, असे विविध फायदे या आयुर्वेदीय चिकित्सेचे होतात. यापूर्वी अपस्माराची सांगितलेली कारणे टाळण्याचा प्रयत्न करणे हादेखील चिकित्सेचा मोठा भाग आहे. लाहानपणापासून हा त्रास अधिक असल्यास वेळीच दक्षता घ्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2019 3:23 am

Web Title: home ayurveda akp 94 2
Next Stories
1 फुटाण्याच्या डाळीचे लाडू
2 अर्धमत्स्येन्द्रासन
3 स्कूटरचे‘स्मार्ट’अवतार
Just Now!
X