घरबागेचा छंद जोपासा

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला.

त्यातील काही निवडक अनुभव..

विनायक पणशीकर, दादर (पश्चिम)

घरातील आबालवृद्ध आनंदाने जपतील असा ‘घरबाग’ हा उपRम आपण सर्वांनी राबविला पाहिजे. मातीत हात घालण्याची वर्षांनुवर्षे सुप्तावस्थेत असलेली मनिषा जागविण्याची वेळ आलेली असून आता हातात वेळही आहे. बारा इंची चौकोनी आणि खाली चार खूर असलेल्या दहा कुंडय़ा आणि माती विकत आणा. मेथी, पुदिना, कोथिंबीर, ओवा, कडीपत्ता, गवती चहा, आलं, लसूण, हिरवी-लाल मिरची(सिमला नव्हे) आणि तुळस लावा. माती भिजेल एव्हढेच पाणी रोज घालत राहा. (गळुन गेलेलं पाणी वायाच जातं याचे भान ठेवा). काही दिवसातच वाढ दिसून येईल. घराच्या मनालाही उभारी येईल. थोडय़ाच कालावधीत रोजची गरज भागत असल्याचे दिसल्याने मन प्रसन्न राहील. गॅलरी प्रशस्त असल्यास ८ ते १० इंच व्यासाची चार फूट लांबीची नळी सारखी उभी कुंडी मिळाली तर कारली, भेंडी,घोसाळी सारख्या वेलभाज्या देखील लावता येतील. लाखो घरांमधे पणतीने पणती उजवल्यास बाजारावरील अवलंबित्व कमी होईल. पर्यावरणालाही मोठाच फरक जाणवेल.

यात थोडी उस्तवारी, खर्च आणि मेहनत जरूर आहे, पण एकदाच.  रोपांची मशागत करावी लागणार आहे. पाचदहा रुपये टाकल्यास सगळे  काही मिळते, असा विचार करू नका. या बागकामामुळे  आनंदाचा निर्देशांक किती उंचावेल याची कल्पना करा.

सकारात्मकतेचा प्रसार

राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली

करोना साथीचा सामना करताना मिळालेल्या मोकळ्या वेळेत, एक सकारात्मक मार्ग म्हणून, काही निमित्ताने नातेवाईक व मित्रमंडळींशी कधी काही वाद झाले असल्यास त्यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी दिलजमाई करायची असे ठरवले आहे.  टीव्ही किंवा मोबाइल सकारात्मक माहिती मिळवण्यासाठीच बघायचे असे स्वनियंत्रण करायचे आम्ही ठरवले आहे. आमच्यातील हा सकारात्मक बदल करोना संकटामुळे मिळालेल्या सक्तीच्या निवांतपणामुळे झाला असे वाटते व आमचा उत्साह वाढत आहे. दिवसभराचा रिकामा वेळ घालवण्यासाठी बुद्धिबळ, कॅरम, हाऊजी, पत्ते, अंताक्षरी खेळणे, पुस्तके वाचणे, शब्दकोडी सोडवणे व शब्दसंग्रह वाढवणे, आळीपाळीने गोष्टी सांगणे, घरगुती पारंपरिक व्यायाम करणे, सक्तीची सुटी मिळाल्यामुळे भरपूर झोप-विश्रांती घेणे अशा प्रकारे व्यतीत करण्याचे ठरवले आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात वेळ मिळत नसल्यामुळे घरातील साफसफाई करणे राहून जाते, ती करणे, टाकाऊ वस्तूंची योग्य विल्हेवाट लावणे, वेळेअभावी राहून गेलेल्या छोटय़ामोठय़ा दुरुस्त्या करणे, नातवंडाला त्याच्या कलेची जोपासना करण्यास मदत करणे याच बरोबर समाज माध्यमांतून अफवांना आळा बसवण्यासाठी तत्संबंधी सकारात्मक संदेश सर्वाना पाठवत आहोत.

‘ते चौदा तास’ पुस्तकांच्या सान्निध्यात

गुरुनाथ  ताम्हणकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता संचारबंदीचे आवाहन केले. या आवाहनाला देशातील सुज्ञ जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. हा दिवस  सार्थकी कसा लावावा यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या    मालवण शाखेचे तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी वाचन संस्कृती जोपासावी, किमान एक पुस्तक वाचावे व त्या संदर्भात थोडक्यात टिपणी लिहावी असे आवाहन केले होते.

आम्ही संपूर्ण कुटुंबाने वाचन संस्कृती जपली. तेजल गुरुनाथ ताम्हणकर यांनी अभिराम भडकमकर लिखित ‘बालगंधर्व’ या कादंबरीचे अंशत: वाचन केले. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर हिने ‘चातुर्यकथा’ या कथासंग्रहातील ‘वानरांना धडा’ या कथेचे वाचन केले. प्राण्यांवर दया करावी, मात्र त्यांचे अती लाडही टाळावेत हा संदेश या कथेतून मिळाला. मधू मंगेश कर्णिक यांच्या ‘चिवार’ या कथासंग्रहातील कथांचे वाचन गुरूनाथ चंद्रकांत ताम्हणकर यांनी केले.

‘कोमसाप’च्या या अभिनव उपक्रमामुळे घरातील सर्वांनी किमान एक पुस्तक वाचले. वाचनात दिवस कसा गेला हे समजलेही नाही. वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या कामात आम्हा सर्वांचा थोडासा हातभार लागला.

वेगवेगळ्या माध्यमातून चित्रांवर प्रयोग

शंकर देसाई, ऐरोली, नवी मुंबई</strong>

करोनाच्या बातम्यांमुळे आम्हीही धास्तावलो आहोत. मी ऐंशी पार केली असून पत्नीचे वय सत्तरीच्या आसपास आहे. तुम्हाला काय लागेल ते आम्हाला सांगा, तुम्ही दोघांनीही घराबाहेर पडायचे नाही असे मुला-नातवंडांनी सांगितले आहे.

मी चित्रकार आहे आणि चित्राशिवाय कोणताही विषय डोक्यात घोळत नाही. या सुट्टीत चित्रावर वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळे प्रयोग करायचे ठरविले असून रंग, पेस्टल, चारकोल, कॅनव्हास आदी साहित्य गोळा करुन प्रायोगिक चित्रे सुरु केली आहेत.

फावल्या वेळेत पेपर वाचणे, पुस्तके हाताळणे, टीव्ही पाहणे असे जरी असले तरी बाहेर जाणे नाही, भेटायला कुणी येत नाही त्यामुळे कामात अडथळा येत नाही.

अशीच पहिली संधी मला २००४ या वर्षी दोन महिन्याच्या विश्रांतीच्या काळात मिळाली होती. त्याकाळात मी चित्रांच्या मिनिएचर प्रकाराचा अभ्यास केला. आज माझ्याकडे त्या प्रकारातील ‘अष्टनायिका’ व ‘रागमाला’ चित्रांचा संग्रह तयार झाला  आहे. हृदयरोगाने ती संधी पहिल्यांदा दिली आणि आता करोनाने पुन्हा दुसरी संधी दिली आहे. या संधीचा मला फायदाच होईल असे वाटते.