वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक ayurvijay7@gmail.com

पचन संस्थेसंदर्भात कोणते खाद्यपदार्थ वातूळ ठरतात आणि कोणते ठरत नाही यासंबंधी रुग्णांमध्ये जिज्ञासा आढळून येते. याचे कारण अपचनाचा त्रास बहुतांश जणांना सतावत असल्याचे दिसून येते. आयुर्वेदाने या विकाराचे वर्णन सविस्तरपणे केले आहे. हा विकार निर्माण होण्याची कारणे, त्याची लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना या सर्वाचे शास्त्रीय वर्णन आयुर्वेद ग्रंथामध्ये आढळते.

पचन संस्थेशी निगडित असलेल्या या विकाराची कारणे कळत न कळत घडत असतात. हल्लीच्या धावपळीच्या जगामध्ये खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे? हा विचार मात्र त्यासंदर्भात घातक ठरतो. अपचनाचा त्रास हा मुख्यत: खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी, वेळी-अवेळी व्यायाम इत्यादी कारणांमुळे होतो. आयुर्वेदशास्त्राने याला विष्टब्धाजीर्ण असे नाव दिलेले आहे. खाल्लेले अन्ननीट न पचल्याने हा अजीर्णाचा प्रकार निर्माण होतो आणि यामध्ये शरीरातील वात, पित्त आणि कफ या तीन दोषांपैकी वातदोष विकृत होतो आणि तो विकृत दोष या अपचनाच्या त्रासाला कारणीभूत ठरतो. पण या वातदोषाच्या विकृतीची कारणे समजून घेणे आवश्यक आहे.

जेवणाच्या अनियमित वेळा हे एक महत्त्वाचे कारण या आजाराचे आहे. दोन जेवणामध्ये योग्य तेवढे अंतर न ठेवणे हेदेखील पोटात विकृत वात निर्माण करते. सतत काहीतरी खात राहण्याने आधी खालेल्या अन्नाचे पचन व्हायला योग्य वेळ मिळत नाही आणि अजीर्ण होते. खाण्यामध्ये पाव, बटाटा, हरभऱ्याच्या डाळीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ, वाटाण्याची उसळ, पचायला जड असणारे पदार्थामुळे अपचनाचा त्रास अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते.

जेवण झाल्यावर लगेच काही वेळातच अशा रुग्णांना पोट जड झाल्यासारखे वाटते. अन्न नीट पुढे सरकत नसल्याची जाणीव होते. पोटात मधूनमधून वात फिरत असल्यासारखे वाटते. त्यामुळे कधी कधी पोटात दु:खल्यासारखे होते. मलावरोध होतो. वात नीट सरत नाही. काहींना ढेकर सारखे येणे इत्यादी त्रास उद्भवतात.

उपाय

उपायांचा प्रमुख भाग म्हणजे अपचन होण्यासाठी कारणीभूत असणारी वरील कारणांना टाळण्याचा प्रयत्न करणे. यामुळे अपचन न होता पचनही चांगले होईल. खाण्याच्या नियमित व योग्य वेळा असणे हादेखील या उपायांचा एक महत्त्वाचा भाग आहे. याचप्रमाणे गरम पाणी पिणे हा एक यावर उत्तम उपाय आहे. रसोनादिवटी, हिंग्वाष्ट्क चूर्ण, लवणभास्कर चूर्ण या औषधांचा उपयोग यामध्ये फायदेशीर आहे. मात्र ही औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावीत.