News Flash

खोलीतला सुगंध

गंध हा वायुरूप होणाऱ्या रसायनांच्या रेणूंमुळे येतो. सर्वसाधारणपणे या रसायनांमध्ये टर्पिनॉइड, इस्टर, हायड्रोकार्बन हे वर्ग मोडतात.

|| सुधा मोघे-सोमणी,मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

आधुनिक युगात आपण दिवसातला ९० टक्के वेळ बंदिस्त जागेत व्यतीत करतो. गंध ही संवेदना प्रसन्न वातावरणनिर्मितीकरिता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे बंदिस्त जागेत कुठल्या ना कुठल्या प्रकारचे रूम फ्रेशनर आपण वापरतो. गंधाची संवेदना आपल्याला कशी होते ते समजून घेऊ यात.

गंध हा वायुरूप होणाऱ्या रसायनांच्या रेणूंमुळे येतो. सर्वसाधारणपणे या रसायनांमध्ये टर्पिनॉइड, इस्टर, हायड्रोकार्बन हे वर्ग मोडतात. वायुरूप रसायनांचे रेणू हवेच्या लहरींनी पसरतात. आपल्या श्वसनामार्फत हे रेणू नाकात शिरतात आणि नाकातील त्वचेवरील चेतापेशींच्या (न्यूरॉन्स) संपर्कात येतात. या चेतापेशी मेंदूला संवेदना पाठवतात, ज्यामुळे आपल्याला गंधाची जाणीव होते. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सुगंध आणि दरुगध यात फरक करता येत नाही. जशी बाळाची वाढ होते तशी त्याची गंधांमध्ये फरक करण्याची क्षमता प्रगल्भ होत जाते. त्यामुळे प्रत्येक माणसाची सुगंधी आणि दरुगधीची संकल्पना वेगवेगळी असते. सर्वसाधारणपणे प्रौढांना १ लाख कोटी गंधांमध्ये भेद करता येतो. हे जरी खरे असले तरी फुले, फळे यांसारख्या गोष्टींचा गंध सर्वानाच आवडतो. त्यामुळे रूम फ्रेशनर म्हणून वापरासाठी कंपन्या फळे, फुलांमधील गंधांच्या रेणूंची निवड करतात. उदाहरणार्थ, लिंबू, संत्र्याच्या सुगंधासाठी लिमोनिन नावाचे रसायन वापरण्यात येते.

गंधित रसायनांचे रेणू हवेच्या लहरींमध्ये पसरविण्याच्या विविध युक्त्या रूम फ्रेशनरमध्ये करण्यात येतात. सुगंधी तेले, औषधी वनस्पती, गोंद, लाकडाचा भुसा यापासून बनविण्यात येणारी अगरबत्ती आणि धूपबत्ती हे रूम फ्रेशनरचे सगळ्यात जुने प्रकार म्हणता येतील. यात ज्वलनाने गंधित धूर बनविण्यात येतो जो हवेत सामावतो. दुसरा रूम फ्रेशनरचा प्रसिद्ध प्रकार म्हणजे सुगंधित वडय़ा. या वडय़ा गंधित रसायने आणि वायुरूप होणाऱ्या म्हणजेच संप्लवनशील घन हायड्रोकार्बनने (उदा Napthalene, Dichlorobenzene) बनविलेल्या असतात. जेव्हा हायड्रोकार्बनचे रेणू वायूरूप होतात तेव्हा ते गंधित रेणूंना आपल्याबरोबर घेऊन हवेत मिसळतात. एरोसोल किंवा स्प्रे हा रूम फ्रेशनरचा सध्या लोकप्रिय असलेला प्रकार. यात गंधित रसायन द्रावकात मिसळण्यात येतात आणि हे मिश्रण हवेतील दाबापेक्षा जास्त दाबाखाली धातूच्या बाटलीत बंद करण्यात येते. जेव्हा आपण बाटलीवरील बटण दाबतो तेव्हा गंधित रसायनाच्या द्रावणाचा फवारा हवेत फेकला जातो.

रूम फ्रेशनरचा नवीन विकसित झालेला प्रकार म्हणजे जेल. यात द्रव स्वरूपातील गंधित रसायनांचे रेणू घन पदार्थात अडकलेले असतात. घन पदार्थातील सूक्ष्म भोकांमुळे हे द्रव स्वरूपातील गंधित रेणू केशाकर्षणाने घन पदार्थाच्या पृष्ठभागावर येतात आणि हवेत सामावतात. हे जेल स्वरूपातील रूम फ्रेशनर खूप वेळ मंद सुगंध देतात.

रूम फ्रेशनरमध्ये रसायन असतात म्हणून ते वापरणे शरीरास हानीकारक आहे का? तर तसे नाही. कारण रूम फ्रेशनर्समध्ये गंधित रसायनांची मात्रा खूप कमी असते. अगदी बंदिस्त खोलीतसुद्धा रूम फ्रेशनर वापरल्याने अपाय होण्याची शक्यता नाही. पाणीसुद्धा एक रसायन आहे. ते जीवदायी असले तरी जास्त मात्रेत प्राशन केल्यास अपायकारक ठरते. तसेच रूम फ्रेशनरचा अतिरिक्त वापर टाळलेला बरा. झाडांच्या मुळांशी अनेक सूक्ष्मजीव वास करतात. हे जीव आपल्या चयापचयादरम्यान (metabolism) अनेक सुगंधित रसायने बनवितात. त्यामुळे घरात आणि अंगणात झाडे लावणे हा सर्वात प्रभावी आणि परिणामकारक रूम फ्रेशनर आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2019 3:30 am

Web Title: home room freshener akp 94
Next Stories
1 बुंदीची झटपट भाजी
2 आणि विजेते आहेत..
3 सजण्याचा उत्सव
Just Now!
X