08 August 2020

News Flash

रसायनशास्त्र आणि सौंदर्यप्रसाधने

लिपस्टिक/लिपबाम हे वृक्षापासून मिळवले जाणारे कोको बटर किंवा शिआ बटर व रंगद्रव्य यांचे मिश्रण आहे.

घरातलं विज्ञान : क्रांती आठल्ये : मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

स्त्रियांनी रंगभूषा अर्थात मेकअप करण्याची पद्धत सर्वप्रथम इजिप्तमध्ये सुरू झाली. मेकअप करणे ही एक कला आहे. मात्र या कलेसाठी आवश्यक असलेली सौंदर्यप्रसाधने विज्ञानाचे अंग आहेत. या विज्ञानाविषयी आज आपण जाणून घेऊ.

नीटनेटके राहणे हे सर्वानाच आवडते. त्यात काळाबरोबर आपल्या त्वचेची, केसांची काळजी घेणे व त्यांचे सौंदर्य विविध सौंदर्यप्रसाधने वापरून खुलवणे हेही आजच्या जीवनशैलीत आवश्यक ठरत आहे. हे करण्यासाठी टाल्कम पावडर, लिपस्टिक, नेलपॉलिश इत्यादी सौंदर्यप्रसाधने आपण वापरतो. टाल्कम पावडर म्हणजे खनिजयुक्त माती ज्यात प्रामुख्याने मॅग्निशिअम सिलिकेट आहे. मॅग्निशिअम सिलिकेट त्वचेची आद्र्रता राखण्यात मदत करतो. लहान बाळाची त्वचा संवेदनशील असल्याने त्यात खनिज घटक अत्यल्प प्रमाणात असतात.

लिपस्टिक/लिपबाम हे वृक्षापासून मिळवले जाणारे कोको बटर किंवा शिआ बटर व रंगद्रव्य यांचे मिश्रण आहे. ओठ शुष्क पडू नयेत म्हणून यांचा वापर केला जातो. आपल्या पूर्ण त्वचेवर ‘सेबॅशिअस ग्लॅण्ड्स’ असतात ज्यातून तेलाचा विसर्ग होतो. त्वचेला तकाकी देणे व ती कोमल ठेवणे हे या तेलाचे कार्य असते. या ग्लॅण्डस ओठांवर नसल्यामुळे ओठ लवकर शुष्क पडतात. लिपस्टिक किंवा लिप बाम हे ओठांवर एक संरक्षक थर तयार करतो. त्यामुळे ओठ ओलसर राहतात व शुष्क पडत नाहीत. याचा वापर केल्याने ओठ कोमल राहण्यास मदत होते. यात रंगद्रव्यमिश्रित केल्याने ओठांना पाहिजे तो रंग देता येतो. असेच सर्रास वापरले जाणारे प्रसाधन आहे नेल पॉलिश. यात इथाइल अ‍ॅसिटेट व ब्युटाइल अ‍ॅसिटेट यांचा द्रावक म्हणून वापर केला जातो. या द्रावकांमध्ये बहुवारिक व रंगद्रव्यमिश्रित असतात. हे बहुवारिक आपल्या नखांवर एक पातळ थर पसरवण्यात मदत करतात. यातील द्रावकाचे वायुस्थितीत रूपांतर होते व बहुवारिक आणि रंगद्रव्य नखांची शोभा वाढवतात. रंगद्रव्य मग हे लिपस्टिक, नेल पॉलिशमधील असो हे विविध खनिजांपासून मिळवले जातात. चांगल्या प्रतीच्या (ब्रॅण्डेड) सौंदर्यप्रसाधनांमध्ये या खनिजांचे प्रमाण अतिशय कमी असते व इतर सर्व घटक देखील उच्च प्रतीचे असतात. ही प्रसाधने हानीकारक घटकविरहित असतात. आजच्या नवीन पिढीत लोकप्रिय असलेली आय लायनर ! डोळे आकर्षक दिसण्याकरिता याचा वापर होतो. आय लायनर म्हणजे मेण, नैसर्गिक गोंद, विशिष्ट माती व रंगद्रव्य हे आय लायनरचे घटक आहेत. यात मेण असल्याने ते पाण्यात विरघळत नाही व डोळ्यांवर बराच वेळ टिकून राहते. स्वस्त मिळणाऱ्या प्रसाधनांमध्ये हानीकारक घटकांचे प्रमाण उदा: टॉल्विन, फॉर्माल्डिहाइड, डाय ब्युटाइल थॅलेट यांचे प्रमाण अधिक असते. हे कार्सिनोजेन अर्थात कॅन्सरला कारणीभूत ठरतात. या घटकांमुळे प्रजनन संस्थेवर देखील विपरीत परिणाम होतो. सर्वामध्ये उठून दिसण्याकरिता मेकअप आजच्या जगात गरज झाली आहे. फक्त ते विकत घेताना वर दिलेल्या सूचना लक्षात ठेवाव्यात. पुढील लेखात आपण केसांसाठी उपलब्ध असणाऱ्या प्रसाधनांविषयी चर्चा  करू या.

( ‘घरातलं विज्ञान’ या सदरात प्रसिद्ध झालेला ‘खोलीतला सुगंध’ हा लेख डॉ. सौरभ पाटणकर यांनी लिहिला आहे.दि. २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या या लेखात अनवधानाने ‘सुधा मोघे-सोमाणी’ यांचे नाव प्रसिद्ध झाले आहे,  याची नोंद घ्यावी.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 4:53 am

Web Title: home science akp 94 2
Next Stories
1 नवलाई
2 युरोपियन स्टार्टर्स
3 क्रिकेटचे राजकारण
Just Now!
X