29 October 2020

News Flash

उदबत्तीचा अतिवापर नको!

इजिप्तमधल्या देर-अल-बहरी देवळातील शिल्पांवरील चित्रांमध्ये उदबत्तीचे अस्तित्व प्रथम आढळले.

घरातलं विज्ञान : मधुरा जोशी मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

बहुतांश घरांत दिवा आणि उदबत्ती लावून दिवसाची सुरुवात होते. आल्हाददायक वातावरण आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी उदबत्ती सर्रास वापरण्याची पद्धत आपल्याकडे आहे. हिंदू संस्कृतीमध्ये उदबत्तीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पूजा, धार्मिक विधी व उत्सव यामध्ये उदबत्ती हमखास वापरली जाते. ही हळुवारपणे दीर्घकाळ जळते व सुगंध पसरवते. ऊद, अगरू लाकूड इत्यादीचा वापर होतो म्हणून तिला उदबत्ती किंवा अगरबत्ती असे म्हणतात.

इजिप्तमधल्या देर-अल-बहरी देवळातील शिल्पांवरील चित्रांमध्ये उदबत्तीचे अस्तित्व प्रथम आढळले. कालांतराने अथर्ववेदात आणि ऋग्वेदात उदबत्तीचा उल्लेख प्रसन्नतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी केला आहे. पुढे आयुर्वेदात रोगनिवारणासाठी उपचार पद्धती म्हणूनसुद्धा उदबत्ती वापरली गेली. अलीकडे, उदबत्तीचा उपयोग डास पळवण्यासाठीसुद्धा केला जातो. लाकडाची काडी, डिंक, भुश्शाचा लेप आणि सुगंधी द्रव्य हे उदबत्तीतील मुख्य घटक. प्रथमत: लाकडाची काडी डिंकात घोळून त्यावर भुश्शाचा लेप लावला जातो व ही काडी वाळवून किंवा ओली असतानाच तिला सुगंधी द्रवात बुडवून ती वाळवली जाते. ही काडी पेटवली असता त्यातून सुगंधी धूर पसरतो. उदबत्तीतून निर्माण झालेल्या वायुरूप रसायनांचे रेणू आपल्या नाकातील त्वचेवरील चेतापेशींच्या संपर्कात येतात आणि या चेतापेशी गंधाची संवेदना मेंदूपर्यंत पाठवतात, म्हणून आपल्याला सुगंधाच्या संवेदनेची जाणीव होते. उदबत्तीचा सुगंध मनाला तर प्रसन्न करतो, पण आरोग्याला लाभदायक आहे का? तैवान येथील चेंग कुंग विद्यापीठातील एका संशोधनानुसार उदबत्तीच्या धुरात अति सूक्ष्म कण, दूषित वायू आणि सेंद्रिय संयुगे असतात. सूक्ष्म कण हवेत मिसळतात आणि श्वासाद्वारे फुप्फुसात जाऊन तिथेच अडकतात. शरीरातील जिवंत पेशींसाठी हे कण अतिशय अपायकारक ठरतात. एवढेच नव्हे तर धुरामध्ये कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड व नायट्रोजन डायऑक्साइड असे घातक वायूसुद्धा असतात. उदबत्तीच्या अतिवापरामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, दमा, त्वचाविकार, मज्जासंस्थेचे कार्य बिघडणे, हृदयाची कार्यक्षमता कमी होणे व इतर बरेच वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. वर्षांनुवर्षे, घरगुती प्रदूषक हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेची बाब ठरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी अंदाजे एक दशलक्षांहून अधिक लोकांच्या मृत्यूचे कारण ‘क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह रेस्पिरेटरी डिसीज’ आहे. या आजारात श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे व फुप्फुसांना सूज येणे अशी लक्षणे आढळतात. या रोगाचे मुख्य कारण धूम्रपान व घरगुती प्रदूषक आहेत. उदबत्तीच्या धुरामध्ये असेच घातक प्रदूषक आढळतात.

काही संशोधनांनुसार या धुराने कोणताही अपाय होत नाही असेही प्रकाशित झाले आहे. प्रतिबंध हे उपचारांपेक्षा कधीही बरेच! म्हणून उदबत्तीचा अतिरिक्त वापर टाळावा आणि शक्यतो, उदबत्तीचा वापर मोकळ्या हवेच्या ठिकाणी करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 2:06 am

Web Title: home science akp 94 3
Next Stories
1 झुकिनी क्रिस्पस्
2 नियमांची नवलाई!
3 जीवन जगण्याची नशा..
Just Now!
X