मनीषा पुरभे

मराठी, विज्ञान परिषद, अंबरनाथ.

पूर्वी स्वयंपाकघरात पाटा-वरवंटा, खलबत्ता, उखळ-मुसळ, दाणेकुटयंत्र, रवी ही उपकरणे वापरली जात होती. आता आधुनिक काळात मिक्सर-ग्राइंडर वापरले जाते. या एका यंत्राने बाकीची साधने मागे पडली. चाकाचा शोध हा मानवी प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. स्वयंपाकघरातील मिक्सर त्याचे एक ठळक उदाहरण आहे.

१८८५ मध्ये रूफुस इस्टमन नावाच्या शास्त्रज्ञाने हाताने कोणत्याही भांडय़ात वस्तू धरून मिश्रण करणारे एक यंत्र तयार केले. होबार्ट नावाच्या कंपनीने हे यंत्र बाजारात आणले. पुढे १९०८ मध्ये हर्बर्ट जॉन्सन या होबार्ट कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या अभियंत्याने पहिला स्टॅण्डिंग मिक्सर बनविला. एक बेकरीवाला पावाचे मिश्रण चमच्याने फेटत होता, ते पाहून त्याला ही कल्पना सुचली. या मिक्सरचे दोन भाग असतात. खालच्या भागात १८ हजार ते २० हजार आरपीएम या गतीने फिरणारी विद्युत मोटार आणि वरच्या भागात विविध कामांसाठी वापरले जाणारे जार (भांडे). या मिक्सरचे सुधारित प्रतिरूप म्हणजे फुड प्रोसेसर. त्यात गरजेनुसार पात्यांची रचना बदलण्यात येते. कांदा कापणे, भाजी चिरणे, किसणे, विविध प्रकारचे ज्यूस बनविणे, पीठ मळणे आदी क्रिया मिक्सरमुळे आपण चुटकीसरशी करू शकतो.

अनेकदा काम सुरू असताना मिक्सर अचानक बंद पडतो. मिक्सर बंद पडण्याचे हमखास कारण म्हणजे ओव्हरलोडिंग. तसे झाल्यास खालच्या बाजूला असलेलं लाल रंगाचं बटण दाबावं. त्यामुळे मिक्सर पुन्हा सुरू होतो. समजा, त्यानंतरही मिक्सर सुरू झाला नाही, तर तो उघडावा. ओव्हरलोडिंगच्या वायरचा संपर्क तुटल्याने असं होतं. तो संपर्क पूर्ववत जोडावा. कधी कधी अतिवापराने आतील कार्बन ब्रश खराब होतात. तेव्हा ते बदलून घ्यावेत. (बाजारात ते सहज उपलब्ध आहेत.)

मिक्सर वापरताना त्याची भांडी योग्य प्रकारे लॉक करावीत. गळकी भांडी वापरू नयेत. ओले वाटण, पाणी इ. मिक्सरवर सांडू देऊ नये. मिक्सर नेहमी धिम्या किंवा मध्यम गतीने चालवावा. शक्यतो अतिवेगाने चालवू नये. त्यामुळे मोटारवर ताण येत नाही. दळणासाठी असलेले धान्य नेहमी कक्ष तपमानाला आणून मगच दळावे. फूडप्रोसेसरमध्ये पीठ चांगलं मळलं जात नाही. भाज्या चांगल्या पद्धतीने चिरल्या जात नाहीत, असे आपण अनेकदा ऐकतो. अनेकदा आपल्या चुकीमुळे ते घडते. विशिष्ट भाजी चिरण्यासाठी योग्य तेच पाते वापरणे आवश्यक आहे. एकाच पात्याने सर्व कामे करू नयेत. धान्य दळताना भांडे ओव्हरलोड तर नाही ना, याची काळजी घ्यावी. पीठ मळताना प्रमाणापेक्षा जास्त पीठ भांडय़ात घेऊ नये. पात्यांची तसेच भांडय़ांची स्वच्छता राखावी. या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्यास मिक्सर अविरत सेवा पुरवीत राहिल, यात शंका नाही.