मनीषा बायस-पुरभे, मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

थंडीची चाहूल लागताच आपण ठेवणीतील उबदार  कपडे जसे स्वेटर, मफलर, ब्लँकेट बाहेर काढतो. जे आपले थंडीपासून रक्षण करतात. हे उबदार कपडे ज्या लोकरीपासून बनवले जातात ती बहुगुणधर्मी आहे.

लोकर शेळी, मेंढी, उंट, ससा इ. प्राण्यांपासून मिळवली जाते. लोकर ही प्रथिने, कॅल्शियम, सोडीअम व काही प्रमाणात स्निग्धपदार्थापासून बनलेली असते. लोकरीची गुणवत्ताही त्याच्या धाग्याच्या जाडीवर व लांबीवर अवलंबून असते. १५ ते २५ मायक्रॉन एवढया जाडीची लोकर ही उत्तम प्रतीची मानली जाते. जी स्पर्शाला देखील मऊ  असते. (अधिक जाडसर लोकरीपासून ब्लॅंकेट्स बनवले जातात.)

लोकर आपल्याला उबदार कशी राखते ते जाणून घेऊयात. आपण सस्तन प्राणी आहोत. सस्तन प्राण्यांचे गुण वैशिष्टय़े म्हणजे त्यांच्या शरीराचे तापमान कोणत्याही ऋतूत सारखेच असते. आपल्या शरीरात जी ऊर्जा निर्माण झालेली असते ती १०० टक्के वापरली जात नाही. ती थोडया प्रमाणात उत्सर्जित केली जाते. आपल्या शरीराचे तापमान हे साधारणत: ३७ अंश सेल्सियस तर त्वचेचे तापमान ३३ अंश सेल्सियस असते. या दोघांमधील फरकामुळे आपल्याला गरम होणे किंवा थंडी वाजणे या संवेदनांची जाणीव होते. बाहेरील वातावरणाचे तापमान १८० अंश सेल्सियस असेल तर आपल्याला ते आल्हाददायक वाटते. शरीराच्या व वातावरणाच्या तापमानातील फरक २५ पेक्षा जास्त झाला तर थंडी वाजणे ही संवेदना जाणवते व तेव्हा शरीर उष्णता उत्सर्जित करते. अशा परिस्थितीत आपण उबदार कपडे परिधान करतो. लोकर ही उष्णतेची दुर्वाहक आहे. तसेच हवेला देखील ती कोंडून धरते. हवा देखील उष्णतेची दुर्वाहक आहे. म्हणून शरीरातील बाहेर टाकली गेलेली उष्णता लोकर अडवून धरते व आपल्याला ऊब जाणवते.

लोकरीचा अजून एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ओलावा शोषून घेण्याची क्षमता. लोकर ही एकाच वेळेस आद्र्रताग्राही व आद्र्रतारोधी (hydrophilic, hydrophobic) आहे. म्हणजे आद्र्रतेला बाहेर टाकण्याआधी ती शोषून घेते. आपल्या वजनाच्या ३० टक्के पाणी शोषण्याची क्षमता लोकरीत असते व पाणी शोषल्यानंतरदेखील ती शुष्क भासते. धाग्याचा वरील पृष्ठभाग हा आद्र्रताविरोधी असतो. तो पाण्याची वाफ शोषून घेतो. म्हणून शरीरातील घाम लोकरीद्वारे शोषला जातो व आपल्याला उबदारपणा जाणवतो. पाणी शोषल्यामुळे व नंतर उत्सर्जित केल्यामुळे धाग्याची सारखी हालचाल होत असते. या हालचालीमुळे जर धाग्यावर धूळ लागलेली असेल तर ती पृष्ठभागावरून बाहेर टाकली जाते. धाग्याच्या आत जात नाही व अशा तऱ्हेने नैसर्गिकरित्या लोकर लवकर मळकट होत नाही व लोकर सूक्ष्मजीवांना आपल्या आत शोषून धरते व त्यांची वाढ थांबवते. लोकरीतील स्निग्ध पदार्थ लोकर धुताना हे सूक्ष्मजीव पाण्यात सोडतात तसेच लोकर रासायनिक क्रियेद्वारे विविध रसायनांना निष्प्रभ करते. म्हणून लोकरीचे कपडे खूप दिवस वापरले तरी देखील त्यांचा वास येत नाही.