नीलेश लिमये nilesh@chefneel.com

पाऊस दणकून पडतो आहे. अशा पावसात दुपारी मस्त चहा पिता पिता सोबत ताजा केक मिळाला तर काय बहार येईल ना! मग लगेच लिहून घ्या ही पाककृती आणि पटकन तयार करा हा साधासोप्पा हॉट मिल्क केक.

साहित्य

* ४ अंडी

* २ कप मैदा

* दीड कप साखर

* १ चमचा बेकिंग पावडर

* १०० ग्राम लोणी

* १ कप दूध

* चवीसाठी व्हॅनिला इसेन्स

*  सजावटीसाठी कॅरेमल सॉस.

कृती

आधी ओव्हन सुरू करा. १८० अंश सेल्सिअसवर प्रीहिट करा.  साधारण अर्धा किलो केक बनेल एवढे केकचे भांडे घ्या. त्याला थोडे लोणी लावून घ्या. त्यावर मैदा शिंपडून संपूर्ण भांडे आतल्या बाजूने मैद्याने माखून घ्या.

आता एका वाटीत साखर आणि अंडी फेटून घ्या. दुसऱ्या वाटीत मैदा, बेकिंग पावडर एकत्र करा आणि साखर-अंडय़ाचे मिश्रण त्यात घाला. एकीकडे थोडय़ाशा कोमट दुधात लोणी विरघळवून घ्या. आता मैद्याच्या मिश्रणात हे लोणीमिश्रित दूध घाला. चांगले ढवळा. छान एकजीव होऊ द्या. त्यात थोडासा व्हॅनिलाचा स्वाद घाला. मिश्रण बेकिंग ट्रेमध्ये काढून घ्या. ओव्हनमध्ये साधारण अर्धा तास बेक करा. केक गार झाल्यानंतर गरमागरम कॅरॅमल सॉस किंवा चॉकलेट सॉससोबत खायला घ्या.