|| अमित सामंत

बुडापेस्ट शहरात १२०हून अधिक गरम पाण्याचे झरे आहेत. रोमनांनी या गरम पाण्याच्या झऱ्यांच्या बाजूला वस्ती केली होती. ऑटोमन सम्राटांनी हे गरम पाणी वळवून स्थापन केलेले हमामखाने आज बुडापेस्टच्या संस्कृतीचा एक भाग झाले आहेत. बुडापेस्टला भेट देणाऱ्या पर्यटकांचे ते मुख्य आकर्षण ठरत आहेत.

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट हे शहर त्यातील हमामखान्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. हमामखाने म्हणजे सार्वजनिक स्नानगृह. हमामखाना हा अरेबिक शब्द आहे. ऑटोमन (तुर्की) साम्राज्याचे अविभाज्य अंग असलेल्या हमामखान्यांचा प्रसार जगभर इस्लामी राजवटीत झाला. भारतातही मुघलांनी हमामखाने बांधले होते. परंतु त्यांच्या आधी अनेक शतके अस्तित्वात असलेल्या सिंधू संस्कृतीतही हमामखाने होते. मोहेंजोदारो येथील उत्खननात हमामखान्यांचे (Great bath) अवशेष सापडले आहेत.

बुडापेस्ट शहर फॉल्ट लाइनवर वसलेले आहे त्यामुळे तिथे १२०हून अधिक गरम पाण्याचे झरे आहेत. रोमनांनी या गरम पाण्याच्या झऱ्यांच्या बाजूला वस्ती केली होती. त्याचे पुरावे उत्खननात मिळाले आहेत. सोळाव्या शतकात तुर्कानी बुडापेस्टवर आक्रमण केले आणि हा प्रदेश जिंकून घेतला. ऑटोमन सम्राटांनी बुडापेस्टमध्ये हमामखाने बांधले. गरम पाण्यांच्या झऱ्यांचे पाणी वळवून हमामखान्यात खेळवण्यात आले. बुडापेस्टमधल्या हमामखान्यांचा उपयोग आंघोळीबरोबरच औषधोपचारांसाठीही करण्यात आला. त्यामुळे युरोपाच्या वेगवेगळ्या भागांतून या ठिकाणी औषधोपचार करून घेण्यासाठी राजघराण्यातील लोक, सरदार, व्यापारी येऊ लागले. त्यामुळे हे तुर्की हमामखाने युरोपात अल्पावधीत लोकप्रिय झाले. बुडापेस्टच्या संस्कृतीचा ते भाग झाले आहेत. आजही बुडापेस्टचे नागरिक या हमामखान्यांत वरचेवर येतात. हमामखाने सकाळी ६ वाजता उघडतात. बुडापेस्टचे नागरिक गर्दी होण्यापूर्वी सकाळीच हजेरी लावतात.

बुडापेस्ट शहराचे बुडा आणि पेस्ट हे दोन भाग आहेत. यामधून डॅन्यूब नदी वाहाते. बुडाच्या दिशेला असलेल्या भागात बुडा किल्ला आणि गिलर्ट हिल या दोन टेकडय़ा आणि डेन्यूब नदी आहे. मधल्या जमिनीच्या चिंचोळ्या पट्टय़ावर अनेक हमामखाने आहेत. रुडास बाथ, लुकास बाथ, गिलर्ट बाथ इत्यादी अनेक हमामखाने सोळाव्या शतकापासून आजवर कार्यरत आहेत. आता बऱ्याच हमामखान्यांना चेहरामोहरा बदलून त्यांना आधुनिक रूप देण्यात आले आहे.

जुन्या हमामखान्यांमध्ये अष्टकोनी जलतरण तलाव असून त्याच्या आठ कोपऱ्यांत असलेल्या खांबावर वरचा घुमट तोलून धरलेला आहे. या घुमटात नैसर्गिक प्रकाश यावा यासाठी झरोके ठेवण्यात आले आहेत. बऱ्याच ठिकाणी या नैसर्गिक प्रकाशाची जागा विजेच्या दिव्यांनी घेतलेली आहे. याशिवाय इमारतीच्या बाहेर थेट आभाळाखालीही इमारतीच्या आत अणि बाहेरही तरणतलाव आहेत. काही तरणतलाव केवळ पुरुषांसाठी तर काही महिलांसाठी राखीव आहेत.

या हमामखान्यांमध्ये २५ अंश सेल्सियस ते ३२ अंश सेल्सियस तापमान असलेले चार वेगवेगळे पूल असतात. याशिवाय वॉटर जेट असलेले पूल, सौना बाथ, व्हर्लपूल, हॉट प्लॅटफॉम्र्स आहेत. इथे लॉकर भाडय़ाने घेऊन आपले सामान त्यात ठेवता येते. टॉवेल आणि बाथ किट येथे सशुल्क मिळते, पण आपण स्वत:चे नेणे उत्तम. येथील पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, हायड्रोजन काबरेनेट, सल्फेट, क्लोराइड आणि सोडियम हे घटक आहेत. हे पाणी मध्ययुगापासून सांधेदुखी आणि इतर आजार बरे करण्यासाठी वापरले जाते. त्यासाठी पहिल्या मजल्यावर वेगळे पूल आहेत. लुकास बाथमध्ये केबिन्स म्हणजे प्रायव्हेट पूलसुद्धा आहेत. जेट असलेल्या स्विमिंग पूलमध्ये आणि व्हर्ल पूलमध्ये भरपूर गर्दी असते. सर्व बाथ्समध्ये खाण्या-पिण्यासाठी रेस्टॉरंट आहेत. गरम पाण्यात डुंबण्यापूर्वी विविध प्रकारचे मसाज सशुल्क करून मिळतात.

याशिवाय पेस्ट बाजूला Széchenyi Thermal Bath हा युरोपातील सर्वात मोठा हमामखाना आहे. या ठिकाणी पर्यटकांची भरपूर गर्दी असते. सर्व हमामखाने सकाळी ६.०० ते रात्री १०.०० पर्यंत खुले असतात. दुपारी १२.०० नंतर बाथ्समध्ये पर्यटकांची गर्दी वाढायला लागते. संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी बाथ पार्टी असते. हमामखान्यातली गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन बुकिंग केलेले उत्तम. http://www.bathsbudapest.com या संकेतस्थळावर बुडापेस्टच्या सर्व हमामखान्यांचे वेळापत्रक, दरपत्रक आणि इतर माहिती उपलब्ध आहे. या संकेतस्थळावरुन आपल्याला हव्या त्या हमामखान्याची वेळ बुक करून ठेवता येते. बुडापेस्टमध्ये फिरण्यासाठी बुडापास मिळतो. या पासवर काही हमामखान्यात मोफत प्रवेश मिळतो.

बुडापेस्टचे हमामखाने ज्या भागात आहेत त्या भागातच बुडा कॅसल आणि गिलर्ट हिलवरील सिटाडेल ही दोन प्रसिद्ध ठिकाणे आहेत, ती पाहून आणि हमामखान्यात जावे.

मसाज आणि स्नानानंतर कडकडून भूक लागणे साहाजिकच आहे. बुडा आणि पेस्टला जोडणारा ऐतिहासिक चेन ब्रिज ओलांडल्यावर वॅसी उट्का या रस्त्याला भेट द्यावी. हा परिसर खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे खाऊगल्लीही आहे. या रस्त्यावर वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे पदपथांवर, रस्त्यावर अनेक रेस्टॉरंट्सनी टेबल खुच्र्या मांडून ठेवलेल्या असतात. सोबत मेन्यू कार्डही असते. त्यावर पदार्थाचे फोटो आणि त्यातील घटकांची नावे लिहिलेली असतात. हंगेरीयन पदार्थ श्निट्झेल (Schnitzel), गुलाश सूप, चिकन पॅप्रिका, डोबोस टोर्टे यांचा आस्वाद इथे घेता येतो. या शिवाय व्हॅसी स्ट्रीटवर सोवेनियर, हंगेरियन शर्ट, हंगेरियन वाइन्स स्कार्फ, टीशर्ट्स इत्यादी खास वस्तू मिळतात. विविध पदार्थाचा आनंद घेऊन आणि खरेदी करून तुम्ही दिवसाची सांगता करू शकता.