घरात किंवा परिसरात झाडे लावताना सर्वात आधी आपण का आणि कुठे झाडे लावणार आहोत हे प्रश्न स्वतला विचारावेत. आपल्या कोणत्या खोलीत, खिडकीत, बाल्कनी किंवा गच्चीच्या कोणत्या भागात कोणत्या वेळी किती प्रकाश येतो, ऊन किती वेळ असते, याचा विचार/निरीक्षण करणे आवश्यक आहे. आपल्याकडे किती वेळ आहे आणि आपण झाडे कोणत्या उद्देशाने लावणार आहोत, याविषयी स्पष्टता हवी. तरच बागकामातून यश आणि आनंद मिळू शकतो.

  • आपण आपल्या बाल्कनीत, गच्चीत, हॉलमध्ये, बाथरूममध्ये, जिन्यावर, आवारात, इ. ठिकाणी अनेक प्रकारची झाडे लावू शकतो.
  • झाडांचा उपयोग विविध कारणांसाठी होऊ शकतो, उदा. शोभेसाठी, रंगसंगतीसाठी, सुगंधासाठी, सुंदर फुलांसाठी, अन्न/औषध मिळवण्यासाठी, इत्यादी.
  • झाडांमध्ये तीव्र किंवा मध्यम उन्हात वाढणारी, सावलीत वाढणारी झाडे असे विविध प्रकार आहेत. झाडाला आवश्यक असलेल्या प्रकाश, ऊन, सावलीची माहिती नसल्यास ती वाढत नाहीत.
  • यात बहुवर्षांयू आणि हंगामी असे प्रकार असतात. काही वनस्पतींची रोपे, कलमे, काहींचे कंद, तर काहींच्या बिया लावल्या जातात.
  • झाडे लावताना त्यांच्या वाढीच्या सवयी, आकारानुसार विविध आकारांच्या कुंडय़ा, पिशव्या, टोपल्या वापरता येतात.

पुढील भागात आपण झाडांच्या वाढीसंबंधी महत्त्वाची माहिती घेऊ, जेणेकरून आपल्याला घर/परिसरात विविध प्रकारची झाडे उत्तम पद्धतीने वाढविता येतील.