रसिका मुळय़े rasika.mulye@expressindia.com

प्राण्यांची आणि स्वत:ची काळजी घेणे हा बहुतेक प्रश्नांवरचा उपाय आहे. तो करोनाच्या पार्श्वभूमीवरही लागू पडतो.

सध्याच्या साथीच्या वातावरणात घरातील प्राण्यांची काळजी वाटणे वा भीती वाटणे स्वाभाविक आहे. मात्र योग्य काळजी घेतल्यास आजारपणाचा धोका टाळता येतो. मुळात आता जगाला भीतीने ग्रासलेला करोना हा कुत्री, मांजर किंवा पाळीव प्राण्यांकडून संक्रमित होत नाही. त्याचप्रमाणे माणसांमुळे प्राण्यांनाही लागण होण्याची उदाहरणे नाहीत, असे पशुवैद्यांनी स्पष्ट केले आहे. करोना नाही तरी इतर काही आजार प्राण्यांपासून संक्रमित होऊ  शकतात. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे आणि स्वच्छता राखणे नेहमीच उत्तम, असे बैलघोडा रुग्णालयाचे पशुवैद्यक डॉ. जे. सी. खन्ना यांनी सांगितले.

रेबिज, लेप्टोस्पायरोसिस असे साधारण ८ ते १० आजार प्राण्यांकडून पसरू शकत असल्याचे सिद्ध झाले आहे. जिवाणू, विषाणू, बुरशी, परजीवी कीटक यांच्यामुळे प्राणी त्यांच्या पालकांनाही त्रास होऊ  शकतो. प्राणी चावला वा त्याने ओरबाडले तर वेळ न काढता डॉक्टरांकडे जाऊन उपचार करावेत. प्राण्यांच्या लाळेतील घटक माणसाला हानिकारक ठरू शकतात.

प्राण्यांची आणि स्वत:ची काळजी घेणे हा बहुतेक प्रश्नांवरचा उपाय आहे.

स्वच्छता : प्राण्यांची स्वच्छता राखणे, ते वावरत असलेल्या परिसराची, त्यांच्या बसण्याच्या जागेची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. प्राण्यांच्या मल-मूत्रातूनही अनेक आजार पसरतात. त्यामुळे मांजरे किंवा कुत्र्याच्या पिल्लासाठी लिटर बॉक्स वापरण्यात येत असेल तर त्यातील वाळू नियमित बदलावी.

त्याचबरोबर जंतूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे, स्वच्छतेसाठीची रसायने यांचा प्राण्यावर दुष्परिणाम होणार नाही याची खातरजमा करावी.

सवयी : प्राण्यांना पुरेसा व्यायाम अवश्यक असतो. त्यामुळे कुत्र्यांना फिरायला न्यायलाच हवे. मात्र त्या दरम्यान प्राणी कुठेही तोंड लावणार नाहीत, खडे किंवा माती खाणार नाहीत हे पाहावे.

आहार : रोज वेळोवेळी सकस आणि ताजे खाणे प्राण्यांना द्यावे. मांस देताना ते व्यवस्थित शिजवून द्यावे. त्याचप्रमाणे शिळे, आंबूस झालेले पदार्थ प्राणी खाऊ  नयेत यासाठी काळजी घ्यावी. पिण्याचे ताजे आणि स्वच्छ पाणी नेहेमी उपलब्ध ठेवावे. पाणी नैसर्गिक तापमानातच असावे. अति थंड किंवा अति उष्ण पाणी देऊ  नये. प्राणी आजारी वाटल्यास, त्याला तातडीने पशुवैद्यांकडे न्यावे.