संकलन : चिन्मय पाटणकर, पूर्वा साडविलकर

महाविद्यालयात ‘डे’ रोजचेच झालेत. त्यामुळे ते साजरे करायची काही गरज नाही, असा एक सूर आहे, तर काय हरकत आहे, डे साजरा करण्यास, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्याविषयी..

कॉलेज की दुनिया रंगीन होती है.. प्रत्येक काळाला लागू पडणारं वाक्य! कारण महाविद्यलयीन काळ हा मजा-मस्तीचा असतो. वेगवेगळ्या प्रकारचे डेज साजरे करणं हा त्यातला मोठा भाग. स्नेहसंमेलनाच्या काळात अनेक महाविद्यालयांमध्ये साडी डे, ट्रॅडिशनल डे, चॉकलेट डे, प्रपोज डे, फिश-पाँड डे वगैरे विविध डेज साजरे केले जातात. पण आजच्या मोकळ्याढाकळ्या, समाजमामध्यमांचा गदारोळ असलेल्या काळात या दिवसांचं काही महत्त्व उरलंय का, असाही एक प्रश्न पडतो. मात्र, महाविद्यालयीन तरुणांमध्ये डेज साजरे करण्याबाबत मतभिन्नता असल्याचं दिसून येतं. काहींना हे दिवस आउटडेडट वाटतात, काहींना डेजचं स्वरूप बदलावंसं वाटतं.

महाविद्यालयीन काळात डेज साजरे करण्याची ‘प्रथा’ जुनीच..  शाळेच्या दिवसांत विद्यार्थ्यांना गणवेश वापरण्यावाचून पर्याय नसतो. तसाच पूर्वी काही महाविद्यालयांमध्ये अगदी पदवीपर्यंतही गणवेश होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडी मौज करता येण्यासाठी मुलींनी साडी नेसून येण्याचा, मुलांनी पारंपरिक वेश परिधान करण्याचा दिवस सुरू झाला. स्नेहसंमेलनाला जोडून सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत हा दिवस साजरा होऊ  लागला. अनेकांची प्रेमप्रकरणं याच महाविद्यालयीन काळात होत असल्याने आवडत्या मुलीला गुलाब आणि ग्रीटिंग कार्ड देऊन ‘विचारण्यासाठी’ रोझ डे आणि प्रपोज डे सुरू झाला. समाजमाध्यमे नसण्याच्या काळात महाविद्यालयाच्या मैदानावर, वर्गखोलीत, गच्चीत जाऊन मित्रमंडळींसह छायाचित्रं काढून घेण्यात एक विशेष गंमत होती. ती छायाचित्रंही वर्षांनुवर्ष जपली जात होती (आज ती मेमरी कार्ड, हार्ड ड्राइव्ह अ‍ॅप किंवा क्लाउडवर जपली जातात.) पुढे काही वर्षांनी ती छायाचित्रं काढून महाविद्यालयीन जीवन आठवणं, त्या दिवसांना, मित्रमंडळींबरोबर केलेल्या मजा-मस्तीला उजाळा देण्यातही एक प्रकारची भावनिकता आहे.

आज काळ बदलला असला, तरी ती भावनिकता आजही टिकून आहे आणि यापुढेही राहील. पण तंत्रज्ञानामुळे जगण्यावर काही ना काही परिणाम झाला आहे. त्यामुळेच शहरं असो वा ग्रामीण भाग, जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, फोर जी नेटवर्क आहे. पूर्वीच्या आणि आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास आणि मित्र-मैत्रिणी, भावनिकता हा समान दुवा आहे. मात्र, वातावरणात बदल झाला आहे. आताचं वातावरण पूर्वीपेक्षा जास्त मोकळंढाकळं खरंतर ‘बोल्ड ’ आहे. स्मार्टफोनमुळे जवळपास प्रत्येकाकडे कॅमेरा आहे. फोटो काढायला काहीही काळ-वेळ लागत नाही. पाउट करून सेल्फी काढण्यासारखे ट्रेंड यातूनच निर्माण झाले. पूर्वीच्या वेशभूषा-फॅशनच्या संकल्पनाही आताच्या काळात धूसर झाल्या आहेत. विद्यार्थी-विद्यार्थिनीही सदैव बदलत्या फॅशनला अनुसरून कपडे वापरतात. अलीकडे तर स्लॅप डे (एकमेकांना मारणे) सारख्या विचित्र दिवसांचीही डेजमध्ये भर पडली आहे.

पुण्यातल्या स. प. महाविद्यलयाचा मंगेश मानेला आताच्या काळात डेज साजरे करण्यात रस वाटत नाही. मंगेश म्हणतो, की आजची मुलं डेज वगैरे साजरी करण्याच्या पलीकडे गेली आहेत. कारण प्रत्येक मुलगा किंवा मुलगी त्यांना हवंतसं करू शकतात. पूर्वीपेक्षा जास्त मोकळीक आताच्या मुलांना मिळते. पूर्वीच्या काळी आताच्यासारखं वातावरण महाविद्यालयांमध्ये नव्हतं. त्यामुळे साडी डे, ट्रॅडिशनल डे वगैरे साजरे करण्यात गंमत होती. आता टिकटॉकसारख्या अ‍ॅप्लिकेशन्समधून मुलांची मजामस्तीच सुरू असते. समाजमाध्यमांत रोज काहीतरी घडत असतं. महाविद्यालयीन जीवनाचा डेज हा महत्त्वाचा असले, तरी त्याचा प्रतिसाद आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, त्याविषयी फारसं आकर्षणही वाटत नाही. पुढील काही वर्षांत महाविद्यालयांतून डेज साजरे करणं बंद झालं, तरी आश्चर्य वाटणार नाही. ठाण्यातल्या जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या उपेश कोथमिरेला डेजची संकल्पना बदलणं महत्त्वाचं वाटतं. ‘दरवर्षी डेजच्या संकल्पना बदलाव्यात. दररोजच्या महाविद्यालयीन दिवसांपेक्षा डेज साजरे करण्याचा काळ हा वेगळा आणि अविस्मरणीय असतो. त्यामुळे महाविद्यालयात दरवर्षी डेज साजरे व्हायला हवेत. मात्र, प्रत्येक वर्षी साडी डे, ट्रॅडिशनल डे, चॉकलेट डे हेच डे साजरे केले जातात. त्यामुळे दरवर्षी डेजमध्ये तोचतोपणा आलेला आहे. याच कारणाने दरवर्षी नवीन संकल्पनेच्या आधारावर डेज साजरे केले जावेत, असे माझे मत आहे. तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये इतर दिवसांपेक्षा वेगळा संवाद घडवणारा वेगळा दिवसदेखील साजरा करणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते अधिक घट्ट होऊ  शकते. या डेमुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना शिक्षकांसमोर येऊ  शकतात आणि सहजरीत्या शिक्षक विद्यार्थ्यांना या संकल्पनेवर मार्गदर्शन करू शकतात, असं उपेश सांगतो.

‘महाविद्यालयात डेज साजरे होणे गरजेचे आहे. कारण, या दिवसात अभ्यासाव्यतिरिक्त काही तरी वेगळं अनुभवण्यास मिळत असते. परंतु, डेज हे वर्षांतून एकदा येत असतात. त्यामुळे हे डेज विद्यार्थ्यांना मनसोक्त जगता आले पाहिजे. त्यामध्ये कोणतेही निर्बंध नसावेत. हे डेज फक्त वेशभूषेपुरते मर्यादित नकोत तर, या दिवसात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे खेळही आयोजित केले जावेत. यामुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर डेजच्या संकल्पना या जनजागृतीशी निगडित ठेवायला हव्यात,’ असं बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयाची विद्यार्थिनी लीना कदमला वाटतं.

निरासगता हरवलीय..

राजगुरूनगरच्या रत्नई महाविद्यलयाची निशा पंडितनं जरा वेगळा मुद्दा मांडला. ग्रामीण भागात डेजचं महत्त्व आजही टिकून आहे असं तिला वाटतं. ग्रामीण भागातल्या मुलींना शहरातल्या मुलींइतकी मोकळीक नसते, त्यामुळे मुलींना नटण्या—सजण्याची संधी या डेजच्या निमित्ताने मिळते. काही वर्षांंपूर्वीपर्यंत मुलं अगदी भाडय़ानं कपडे आणून डेज साजरे करायचे. या डेजसाठी आधीपासूनच तयारी करायचे. पण सध्याच्या स्मार्टफोनच्या काळात डेज ‘साजरे’ करण्यापेक्षा मुलं—मुली ‘शो ऑफ’च जास्त करतात. ग्रामीण भागातल्या महाविद्यलयांमध्ये आजही डेज साजरे केले जात असले, तरी त्यातली निरागसता हरवत चाललीय, असंही निरीक्षण निशानं आवर्जून नोंदवलं.