अँड्रॉइड फोन हे एक ‘खुली किताब’ आहे. ‘ओपन सोर्स’ यंत्रणा असल्यामुळे अँड्रॉइड वापरकर्त्यांना फोनमध्ये आवश्यक ते बदल करता येतात. पण हे करण्यासाठी त्यांना ‘डेव्हलपर्स ऑप्शन’ हा छुपा पर्याय आधी सुरू करावा लागतो. काय आहे हा पर्याय?

अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना हवे तसे बदल करता येतात. स्क्रीनसेव्हर, वॉलपेपरपासून ‘थीम’ बदलण्यासोबतच मोबाइलवर कोणते अ‍ॅप वापरायचे, हेही त्यांना ठरवता येते. पण याखेरीज अँड्रॉइड फोन तुम्हाला आणखी एक स्वातंत्र्य देतो. ते म्हणजे, तुमच्या फोनचा पूर्ण चेहरामोहराच बदलून टाकण्याचे. तांत्रिक भाषेत याला ‘रूट’ करणे असे म्हणतात. स्मार्टफोन ‘रूट’ करून त्यावर अधिक प्रभावी ऑपरेटिंग सिस्टिम इन्स्टॉल करणे किंवा ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रोग्रॅमिंगमध्ये बदल करून ती आपल्या मनाजोगती करून घेणे, या गोष्टी ‘रूट’ केल्यानंतर साध्य करता येतात. अर्थात ‘फोन रूटिंग’ची ही प्रक्रिया गुंतागुंतीची असून त्यातील थोडीशी चूक तुमच्या फोनला कायमस्वरूपी बाद करू शकते. तसेच रूटिंगमुळे तुम्ही तुमच्या फोनच्या कंपनीकडून मिळणाऱ्या वॉरंटीचेही उल्लंघन करता. त्यामुळे हा पर्याय केवळ तज्ज्ञमंडळीच अवलंबू शकतात.

‘फोन रूटिंग’ कसे करतात, हे आम्ही येथे सांगणार नाही. अपुऱ्या किंवा अर्धवट माहितीच्या आधारे आणि तांत्रिक ज्ञान नसताना कोणत्याही वापरकर्त्यांने ‘फोन रूटिंग’चा विचारही करू नये. मात्र, ‘फोन रूटिंग’च्या या प्रक्रियेतील सर्वात पहिला टप्पा म्हणजे ‘डेव्हलपर्स ऑप्शन’ सक्रिय करणे. ‘डेव्हलपर्स ऑप्शन’ म्हणजे फोनच्या मूलभूत सॉफ्टवेअरमध्ये बदल घडवू शकणारा पर्याय. ‘डेव्हलपर्स ऑप्शन’ सुरू करणे हे अतिशय सोपे आहे आणि त्यात तुम्ही कोणत्याही प्रकारचा वॉरंटी भंग करत नाही. ‘डेव्हलपर्स ऑप्शन’ची उपयुक्तता काय, हे जाणून घेण्याआधी तो कसा सक्रिय म्हणजेच ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करावा, हे आपण जाणून घेऊ.

तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘अबाऊट फोन’ या पर्यायावर क्लिक करा. तो पर्याय खुला झाल्यानंतर तुम्हाला फोनची माहिती, आयएमईआय क्रमांक याखेरीज ‘बिल्ड नंबर’ नावाचा पर्याय दिसेल.

या पर्यायावर सात वेळा क्लिक करताच तुमच्या फोनमधील ‘डेव्हलपर्स ऑप्शन’ सक्रिय होतात. ही प्रक्रिया इतकी साधी आणि सोपी आहे. एकदा हा पर्याय सक्रिय झाला की तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये तुम्हाला ‘डेव्हलपर्स ऑप्शन’ दिसू लागतो.

लक्षात ठेवा

* ‘डेव्हलपर्स ऑप्शन’चा पर्याय सक्रिय करण्यात काही वावगे नाही. मात्र, त्याचा विचारपूर्वक वापर करणे आवश्यक आहे.

* या पर्यायाअंतर्गत असलेल्या पर्यायांमध्ये बदल करणे हे तुमच्या फोनच्या मूलभूत यंत्रणेत बदल करण्यासारखे आहे. त्यामुळे हे करताना पुरेशी माहिती घेऊनच करा.

ल्लतुमचा फोन जुना झाला असल्यास आणि त्याची वॉरंटी संपली असेल तरच तुम्ही ‘डेव्हपर्स ऑप्शन’च्या माध्यमातून मोठे बदल करण्याचा विचार करा.

उपयुक्तता काय?

* मगाशी म्हटल्याप्रमाणे फोन ‘रूट’ करण्यासाठी सर्वप्रथम डेव्हलपर्स ऑप्शन सुरू करावे लागतात. मात्र, याखेरीज याचे आणखी उपयोग आहेत.

* या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही ‘यूएसबी डीबगिंग’ हा पर्याय सुरू करू शकता. त्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाइल कोणत्याही संगणकाशी जोडून त्यातील फाइल ‘शेअरिंग’ करू शकता.

* या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही फोनच्या ‘अ‍ॅनिमेशन’चा वेग कमी जास्त करू शकता. फोनमधील अ‍ॅप किती लवकर सुरू व्हावेत, याची प्रक्रिया ‘अ‍ॅनिमेशन’ ठरवते. त्यामुळे फोन सुरू होण्यास विलंब होत असल्यास किंवा काही अ‍ॅप चालू होण्यास विलंब लागत असल्यास ‘अ‍ॅनिमेशन’चा वेग कमी करून तुम्ही हा विलंब दूर करू शकता.

* ‘डेव्हलपर्स ऑप्शन’च्या माध्यमातून तुम्ही तुमचे ‘जीपीएस लोकेशन’ दडवून ठेवू शकता. त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भागात चालू शकत नसलेले अ‍ॅपही सुरू करू शकता.